नागपूर, दि. 10
:हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या
ऑपरेशन ‘मुस्कान’ आणि ‘स्माईल’ अंतर्गत 20 हजार 112 बालके शोधून त्यांच्या
कुंटुबियांकडे सुपूर्द करण्यात आली. ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत. विशेषत:
झोपडपट्टी भागांमध्ये अशा ठिकाणी जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात
येतील, असे गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य
सुनील प्रभू यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना
राज्यमंत्री डॉ.पाटील म्हणाले, सन 2014 ते 2016 या कालावधीत 32 हजार 598 व्यक्ती
बेपत्ता झाल्या होत्या त्यापैकी 29 हजार 505 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. या
कालावधीत 16 ते 25 वयोगटातील 16 हजार 281 व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या त्यातील
14 हजार 141 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.
हरवलेल्या व्यक्ती सापडण्यासाठी मुंबईतील सर्व
पोलिस ठाण्यात प्रमाण कार्यपद्धती (एसओपी) ठरविण्यात आली आहे. सर्वोच्च
न्यायालयाच्या आदेशानुसार 18 वर्षाखालील हरविलेल्या लहान मुलांच्या बाबतीत तक्रार दाखल होताच
अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. चार महिन्याच्या आत हरविलेले मुल सापडले नाही
तर त्याबाबतचा तपास अनैतिक मानवी वाहतूक माहिती कक्षामार्फत करण्यात येतो.
मुंबइतील सर्व परिमंडळात असे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राजेंद्र
पाटणे, प्रताप सरनाईक, भारती लव्हेकर यांनी भाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment