Tuesday, 10 July 2018

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर बनविणार -उद्योग मंत्री सुभाष देसाई




नागपूर, दि. 10 : विदेशातील उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. राज्यात  विविध उद्योगांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्माण होऊन तरुणांना नोकऱ्या मिळाव्या, असे महाराष्ट्र शासनाचे धोरण असून राज्याची आर्थिक शक्ती वाढविणे हा या मागचा उद्देश आहे. भारताची अर्थव्यवस्था भविष्यात तीन ट्रिलीयन डॉलर बनविण्याचे उद्दिष्ट आहे आहे. तसेच याच धर्तीवर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर बनविण्याचे स्वप्न आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयाचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गतप्रगतशील महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात उद्योग विभागाचे महत्वया विषयावर श्री.देसाई बोलत होते. यावेळी राज्यातील विद्यापीठातील अधिव्याख्याते, विद्यार्थी उपस्थित होते.
 श्री.देसाई म्हणाले, गुंतवणुकदारांना राज्यात उत्तम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ हे उपलब्ध आहेत. राज्यात इंजिनियर, मेडीकल, फार्मसी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण होत आहे. दरवर्षी एक हजार अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुमारे एक लाख विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. राज्यात उद्योग सुलभता मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्याची संख्या 75 वरुन 25 वर आणण्यात आली आहे.
उद्योग क्षेत्राची इन्स्पेक्टरराजच्या जाचातून सुटका झाली आहे. मैत्रीकक्षाच्या माध्यमातून उद्योजक व कारखानदारांचे विविध प्रश्न सोडविले जातात. उद्योग विभागामार्फत विविध लोकाभिमुख योजना राबवून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे एक लाख हेक्टर जमीन उपलब्ध आहे. राज्यात 280 एमआयडीसी क्षेत्र आहेत. या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  यासाठी 80 टक्के स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे.याठिकाणी 50 हजार लघु व मध्यम उद्योगाच्या माध्यमातून 15 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. मेक इन इंडियामध्ये उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असून यामाध्यमातून राज्यात 10 लक्ष कोटी गुंतवणुक होणार आहे.तसेच 20 लक्ष रोजगाराची निर्मिती होणार आहे, असेही श्री.देसाई यांनी सांगितले.
राज्याने स्टार्ट-अप योजना सुरु केली असून या योजनेतून अनेक स्टार्ट-अपस् ने आपल्या कल्पना, विचार प्रत्यक्षात आणल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. लघु उद्योगासाठी विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. यासाठी आर्थिक विकास महामंडळ, सिडबीच्या माध्यमातून लघुउद्योग व स्टार्टअपसाठी निधी त्वरित मिळत आहे.
शेतकऱ्यांना उद्योग क्षेत्राकडून अनेक उत्पादने तयार करुन लघु उद्योग उभारण्यासाठी साठवणुकीची प्रक्रिया, नाश पावणाऱ्या पिकांसाठी  बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. नागपूर येथे संत्रा टिकविण्यासाठी कोकाकोला सोबत करार करुन येथे उद्योग सुरु करण्यात आला आहे. शासनाचे या पुढे शेती प्रधान उद्योग हे लक्ष्य असेल, असेही श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.
श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्र हे वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये प्रगत राज्य आहे. या उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाच्यावतीने 32 वस्त्रउद्याने सुरु करण्याचा मानस असून अमरावती येथे नांदगाव पेठ हे पहिले वस्त्रोद्योग उद्यान सुरु करण्यात आले आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये खासगी उद्योगाला प्रोत्साहन दिले असून नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक हे क्षेत्र विकसित करुन समृद्ध असे दालन निर्माण होणार आहे. कौशल्य विकासाच्या माधमातून राज्यात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येत आहे. यासाठी महामंडळ स्थापन केले असून विविध संस्थाही स्थापन केल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून मुला-मुलींना प्रशिक्षित करणे हाच कौशल्य शिक्षणाचा उद्देश आहे. यासाठी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पुण्यामध्ये रोजगार मेळावा घेण्यात आला असून त्यात 11 हजार युवकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. 80 कंपन्यांकडून दोन हजार तरुणांना या ठिकाणी नोकरी मिळाली, असेही श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.
श्री देसाई यानी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.प्रास्ताविक विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यानी केले तर आभार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची विद्यार्थीनी रेणूका पिल्लारे यांनी मानले.
००००

No comments:

Post a Comment