Saturday, 7 July 2018

विभागातील 21 तालुक्यात अतिवृष्टी



* नागपूर शहर व ग्रामीण भागात सर्वाधिक 282 मि. मी. पाऊस
* जनजीवन पूर्व पदावर
* नुकसान भरपाईसंदर्भात प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात

          नागपूर दि.07 : विभागात मागील चोवीस तासात नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील 21 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीण मध्ये 282 मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी 60.4 टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
विभागात मागील चोवीस तासात जिल्हा निहाय झालेल्या पावसामध्ये नागपूर जिल्ह्यात सरासरी 132.61, वर्धा 61.05, भंडारा 33.37, चंद्रपूर 92.27, गोंदिया 19.27 तर गडचिरोली जिल्ह्यात 21.54 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक नागपूर जिल्ह्यात 10 तालुक्यात 65 मि.मी पेक्षा जास्त पाऊस झाला असून यामध्ये हिंगणा तालुक्यात 272.70, सावनेर 116.40, रामटेक 170.40, पारशिवनी 193, मौदा 90, उमरेड 131.40, कुही 100.60, कामठी 84.80, कळमेश्वर 62 तर काटोल 18.20, नरखेड 32, भिवापूर 19 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
वर्धा जिल्ह्यातील तीन तर चंद्रपूर जिल्ह्यातील सात तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
अतिवृष्टीमुळे हिंगणा तालुक्यातील 15 गावातील 3 हजार 450 कुटुंब बाधित झाले असून 945 बाधित घरांचा समावेश आहे. काल पडलेल्या अतिवृष्टीमुळे 480 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. यामध्ये तुरकमारी, वडगाव, विरुळ, इरमिती, रायपूर, टाकळघाट, सुपरीबेला आदी गावांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने या गावांमध्ये बाधित कुटुंबांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे.
नागपूर ग्रामीण मधील पूरामुळे 20 गावे बाधित झाली असून 284 बाधित कुटुंबे आहेत. तसेच 284 घरे बाधित झाले असून 39 कुटुंबांना ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. यामध्ये गोगली येथील 12, विहीरगाव येथील 23, बेलतरोडी 4 कुटुंबांचा समावेश आहे. अतिवृष्टी व पूरामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आले असून सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. बेसा येथे एक व्यक्ती मृत आढळून आला असून पिपळा येथे 7 जनावरे मृत झाली आहेत. बाधित घरातील धान्यांचेही नुकसान झाले असून सर्वेक्षणाचे काम सुरु आहे.
*****

No comments:

Post a Comment