Monday, 27 August 2018

राज्य शासनाच्या उद्योग स्नेही धोरणाचा तरूण उद्योजकांनी लाभ घ्यावा -उद्योगमंत्री सुभाष देसाई




मुंबई,दि.27 :देशात होणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीमध्ये राज्य अग्रेसर आहे. देशातून होणाऱ्या निर्यातीपैकी 33 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक असे वातावरण आहे. उद्योजकांना चालना मिळावी यासाठी वेग वेगळ्या क्षेत्रातील नवीन धोरण जाहीर करण्यात आली आहेत. याचा लाभ तरुण उद्योजकांनी घ्यावा, तसेच त्यांच्याकडे असलेल्या नवीन कल्पना व सूचना शासनाला कळवाव्यात असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले.
इंडियन मर्चंट चेंबरच्या यंग लिडरशिप फोरम मधिल 24 ते 40 वयोगटातील तरुण उद्योजकांनी आज मंत्रालयात उद्योगमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
श्री. देसाई पुढे म्हणाले, कुशल मनुष्यबळ घडवण्यावर राज्य शासनाचा भर असून अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्था यासाठी पुढे येत आहेत. औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्य शासन नवे औद्योगिक धोरण आखत आहे. तरुण उद्योजकांनी यासाठी काही सूचना असल्यास कळवाव्यात त्यांच्या सूचनांचा समावेश नवीन धोरणात करण्यात येईल.
            ते पुढे म्हणाले, राज्य शासन उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी नवनवे धोरण राबवत आहेत. त्यात फिनटेक पॉलिसी, महिलांसाठी विशेष औद्योगिक धोरण, लॉजिस्टिक पार्क, इलेक्ट्रिकल व्हेइकल धोरण आदींचा समावेश आहे. राज्य शासनाच्या नव्या औद्योगिक धोरणात नवनवीन क्षेत्राचा समावेश करण्यात येणार आहे.
फिनटेक धोरणावर आयटी तज्ज्ञ सुनिती नंदा यांनी मार्गदर्शन केले. बँका आणि उद्योग क्षेत्राचा मेळ घालण्यासाठी फिनटेक पॉलिस महत्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात रोजगाराची मोठी संधी आहे, त्यासाठी उत्पादन क्षेत्राने कात टाकण्याची गरज आहे. याशिवाय विकास आणि संशोधन क्षेत्रात काम होण्याची आवश्यकता आहे, असे मत विकास जैन यांनी व्यक्त केले.
फेलोशिप योजनेसंदर्भात प्रिया खान यांनी तरुण उद्योजकांना मार्गदर्शन केले.  त्या म्हणाल्या, अनेक तरुण शासनाचे काम समजावून घेण्यास इच्छुक आहेत. शासनासोबत काम करण्यास तयार आहेत. परंतु त्यांना शासकीय धोरणांची माहिती नसते. ती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक तरुण या योजनेत सहभाग घेऊ शकतो. सध्या ही योजना सुरू असून अनेक युवक युवती राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत काम करून शासकीय योजना राबवण्यात येत असलेल्या अडचणी समजावून घेत आहेत.
यावेळी उद्योग विकास उपायुक्त विकास जैन, उपसचिव संजय इंगळे, सहसचिव संजय देगावकर, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांच्या सह इतर अधिकाऱ्यांनी उपस्थित तरुण उद्योजकांशी संवाद साधला.
००००

No comments:

Post a Comment