Monday, 27 August 2018

हरित ऊर्जेचे स्वप्न साकारण्यात सी सी आयच्या सोलार पॉवर प्रकल्पाचे मौलीक योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





मुंबई, दि. 27 :हरित ऊर्जेबाबतचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारण्यात क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने सोलार पॉवर प्लांटच्या रुपाने दिलेले योगदान हे मौलीक असून हा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सी सी आय) च्या ब्रेबॉर्न स्टेडियम रुफ टॉपवरील 820 केव्हीच्या सोलार प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सी सी आयचे अध्यक्ष परीमल उदानी, उपाध्यक्ष राकेश कपूर, खजिनदार राजन हिरानंदानी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जगापुढे ग्लोबल वॉर्मिंगचे मोठे आव्हान आहे. त्याच्याबाबत आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  हरित ऊर्जा वाढविण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न साकारण्याचे आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यात सी सी आयने या प्लांटद्वारे घेतलेला पुढाकार हा अभिनंदनीय आहे. याची प्रेरणा इतरांनी घ्यावी. या प्लांटच्या रुपाने सदैव इतिहास घडविणाऱ्या सी सी आयच्या नावलौकीकात आणखी एका नव्या इतिहासाची भर पडली आहे, असे गौरोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
तसेच या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आपण दहा वर्षाचे असताना निर्लान विरुद्ध मफतलाल ही क्रिकेट मॅच पाहिले असल्याची आठवण सांगत त्यांनी भविष्यात हरित ऊर्जेच्याबाबत राज्यातील योगदानात संदर्भात आठवण निघाल्यास या स्टेडियमवरील  पॉवर प्लांटचे आपण उद्घाटन केले असल्याचे आपण अभिमानाने सांगू, असेही ते म्हणाले. तसेच सीसीआयच्या अशा प्रकारच्या  कोणत्याही उपक्रमास शासन सदैव मदतीस राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
क्रिकेट स्टेडियमच्या रूफ-टॉपवर असलेला जगातील सर्वात मोठा सोलार पॉवर प्लॅन्ट असून ब्रेबॉर्न स्टेडियमच्या दक्षिण व उत्तर स्टँडवर 2 हजार 280 सोलार पॅनल लावण्यात आले आहेत. याची प्रती वर्ष 11.5 लाख युनिट वीज निर्माणक्षमता असून त्यामुळे अंदाजे 1.25 कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार आहे. दक्षिण मुंबईतील प्रदूषणमुक्त वातावरणासाठी या प्रकल्पाचे मोठे योगदान राहणार आहे. टाटा सोलार पॉवरच्यामार्फत  केवळ 120 दिवसात हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाख
या कार्यक्रमाचे औचित्य साधून सी सी आयच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. क्लबचे अध्यक्ष परीमल उदानी यांनी आपल्या प्रास्ताविकेतून क्लबच्या कार्याची व सोलार पॉवर प्लांट माहिती उपस्थितांना दिली. शेवटी राकेश कपूर यांनी आभार प्रदर्शन केले.
००००

No comments:

Post a Comment