समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या सर्व घटकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे काम छत्रपती राजाराम महाराज यांनी आपल्या कार्यांतून केले. पुराभिलेख संचालनालयामार्फत 'छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार' हे पुस्तक नुकतेच प्रसिध्द झाले आहे. या पुस्तकात नेमके काय वाचाल आणि या पुस्तकाची काय वैशिष्टये आहेत ते जरुर वाचा..
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्यकारभार केला. छत्रपती राजाराम महाराजांच्या या प्रेरणादायी कामाची महती आजच्या युगात आपणाला अनुभवायची असेल तर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील कागदपत्रे महत्वाची ठरतात. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील अनेक महत्वांच्या घटनांचे साक्षीदार असणारी कागदपत्रे यांचाही या पुस्तकात समावेश आहे. महत्वाची कागदपत्रे, निवडक भाषणे हे सर्व ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या पुस्तकात वाचकांना वाचण्यास मिळणार आहे.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व समूहापर्यंत योजना पोहोचण्यासाठी नेण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे विचार अत्यंत महत्वाचे आहेत. पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे यांच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आलेल्या ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ याचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. या प्रकाशन कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार राम कदम, समरजितसिंह घाटगे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे आदी उपस्थित होते.
पुराभिलेख संचालनालयात सन 1630 पासूनचे दुर्मिळ अभिलेख जतन करण्यात आले असून यामध्ये मराठी, मोडी, इंग्रजी, पर्शियन आणि उर्दू अभिलेखांचा समावेश आहे. पुराभिलेख संचालनालयामार्फत ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटीशकालीन राजकीय तसेच स्वातंत्रय चळवळ, पेशवेकालीन अभिलेख, साताऱ्याचे छत्रपती, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीसंबंधातील अभिलेख, निजामकालीन कागदपत्रे, नागपूरकर भोसले यांची कागदपत्रे असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टया महत्वाचा अभिलेख जतन करण्यात आला आहे.
‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ पुस्तकाची वैशिष्टये
• या पुस्तकात इ.स. 1922 ते 1940 या त्यांच्या 18 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीतील 46 भाषणे आहेत.
• राजर्षी शाहू महाराजांचे सन 1922 मध्ये अकाली निधन झाले. त्यानंतर कोल्हापूर संस्थानाची धुरा राजाराम महाराज यांच्याकडे वयाच्या 25 व्या वर्षी आली. पुढे छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्यकारभार सांभाळताना कोल्हापूर येथील जनतेच्या समस्यांचे निराकरण करुन त्याचे जीवन सुखमय करण्याकडे कल होता हेच त्यांनी वेगवेगळया ठिकाणी केलेल्या भाषणातून आपल्या समोर येते. ही सर्व भाषणे या पुस्तकात संकलित करण्यात आली आहेत.
• मुळातच छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्याची महती सांगणारी कागदपत्रे पुराभिलेख संचालनालयाच्या कोल्हापूर कार्यालयात जतन करुन ठेवण्यात आली आहेत. राजाराम महाराजांच्या काळातील ॲन्युअल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्टमध्ये संस्थानातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने तसेच ब्रिटीश अधिकारी यांचे कोल्हापूर संस्थानात भेटीच्या प्रसंगी राजाराम महाराजांना उददेशून केलेली भाषणे या पुस्तकात एकत्रितरित्या देण्यात आली आहेत.
• 13 मे 1922 साली छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्यकारभार हाती घेताना प्रजेला उददेशून काढलेला जाहीरनामा आहे. तर 31 मे 1922 साली छत्रपती राजाराम महाराज यांच्या राज्यरोहन प्रसंगी मान्यवरांना उददेशून केलेले राजाराम महाराज यांचे भाषण आहे.
• विशेष म्हणजे या पुस्तकात वेगवेगळे महत्वाच्या लोकांनी अनेकदा छत्रपती राजाराम महाराज यांची भेट घेतली. अशावेळी त्या भेटीदरम्यान त्यांनी केलेली भाषणे या पुस्तकात आहेत.
• या पुस्तकाच्या शेवटी चार पानांची नामसूची देण्यात आली आहे. ही नामसूची या पुस्तकातील भाषणे वाचताना उपयोगी पडतात.
• छत्रपती राजाराम महाराज यांचे पुरोगामी आणि दूरदृष्टी विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. 46 भाषणांचा संग्रह असलेल्या या पुस्तकातून आजच्या पिढीला छत्रपती राजाराम महाराज यांनी सामाजिक समता महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी केलेले काम समजण्यास मदत होणार आहे.
• वर्षा फडके-आंधळे, विभागीय संपर्क अधिकारी
००००
No comments:
Post a Comment