* बोर व्याघ्र प्रकल्प वर्धापन दिन सोहळा
नागपूर, दि. 28 : व्याघ्र क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत वन विभागाने
विविध व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावात ग्राम परिसर विकास समितीची स्थापना केली आहे.
या समितीच्या माध्यमातून कार्य करणारे व्याघ्र मित्र- मैत्रिणी हे जंगलातील वाघ
आणि वन अधिकारी, कर्मचारी यांच्यातील दूवा आहेत. व्याघ्र
मित्र- मैत्रिणी कुठलाही मोबदला न घेता स्वयंस्फुर्तीने जंगल संपदा वाचविण्यासाठी
कार्य करीत आहेत. त्यांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक
डॉ. रविकिरण गोवेकर यांनी केले.
स्थानीय
विद्यादिप सभागृह, सेलू येथे बोर व्याघ्र प्रकल्पाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात
आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी
वन्यजीव, पक्षी तज्ञ व लेखक गोपाळ ठोसर, मुख्य वनसंरक्षक अशोक गिऱ्हेपुजे, वर्धा वन विभागाचे उपवनसंरक्षक सुनील शर्मा, सामाजिक वनीकरण, वर्धा विभागाचे विभागीय वन अधिकारी
दत्तात्रय जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मानव आणि वन्यजीव
यांच्यातील संघर्षाचा जंगल संपदेवर परिणाम होतांना दिसून येत आहे. हा संघर्ष कमी
करण्यासाठी ग्रामवासियांनी वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी यावेळी केले.
पक्षी तज्ञ गोपाळ ठोसर म्हणाले, सन 1970 पर्यंत बोर अभयारण्यातील भौगोलिक परिस्थिती
वन्यजीवांकरिता उपयुक्त नव्हती. ही बाब लक्षात घेता क्षेत्रीय अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी वन्यजीव संरक्षणासोबतच बोर व्याघ्र प्रकल्प नावलौकिकास आणण्यास
पुढाकार घेतला. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाला नवी ओळख मिळाली आहे. जंगल संपदा
टिकवायची असेल तर पक्ष्यांच्या विविध प्रजाती नष्ट होण्यापासून वाचविल्या पाहिजे.
त्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
सन 2017-18 मध्ये
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पेंढरी, सालई (पेवठ) व
मरकसुर या समित्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कारस्वरुप 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपयाचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन
गौरविण्यात आले. ग्राम परिसर विकास समित्यांच्या 22 गावातील इयत्ता 10वी, 12वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी, उत्कृष्ट क्षेत्रीय कर्मचारी, पर्यटक मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय
व्याघ्र दिनानिमित्त आयोजित चित्रकला, निबंध स्पर्धेतील
प्राविण्यप्राप्त 47 विद्यार्थ्यांना बोर व्याघ्र प्रकल्पाची माहिती देणारे कम्पास
बॉक्स भेट देण्यात आले.
यावेळी उपस्थित
मान्यवरांनी समायोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व
वृक्ष पूजनाने करण्यात आले. पेंढरी ग्राम परिसर विकास समितीद्वारे स्वागत गीत
प्रस्तुत करण्यात आले. काजळी व पेंढरी येथील व्याघ्र मित्र परिवाराने बंजारा
नृत्यासह व वन्यप्राण्यावर आधारित नाटीका प्रस्तूत केली. पुनर्वसित गाव नवरगाव
तसेच ग्राम परिसर विकास समिती पेंढरी द्वारे केलेल्या कार्याच्या लघूपटाचे वर्धापन
दिन सोहळ्यात विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय वन अधिकारी राहुल
गवई यांनी केले. बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत विविध कामकाजाचे सादरीकरण सहाय्यक
वनसंरक्षक जी. पी. बोबडे यांनी तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी के. वाय. तळवेकर
यांनी मानले.
*****
No comments:
Post a Comment