नागपूर, दि. 28 : राष्ट्रीय बाल
स्वास्थ कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या प्रत्येक बालकाचे आरोग्य तपासणी करून
घ्यावी. तसेच दरवर्षी 10 टक्के
बालकांमध्ये हृदय विकारासारखे लक्षण आढळून येतात अशा बालकांना महात्मा फुले
जनआरोग्य योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटीची
सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, जिल्हाआरोग्य
अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी असिम इनामदार, आरोग्य
सेवा उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. देवेंद्र पातुरकर,
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बागडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक दीपिका गोरडे
यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाले की, बालकांचे आरोग्य हे महत्वाचे आहे. राष्ट्रीय
बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत एकही बालक
आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही याबाबत सर्वांनी जागृत राहून काम करावे.
प्रत्येक आरोग्य केंद्रात आशा सेविका कार्यरत आहेत. आशांच्या माध्यमातून
आरोग्य विषयी जनजागृती करण्यात येत आहे, परंतु राष्ट्रीय बाल स्वास्थ
कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे
निर्देशही त्यांनी उपस्थितांना दिले.
पाचगाव, सिरसी आरोग्य केंद्राचे लवकरात लवकर काम पूर्ण करून वेळेत रूग्णसेवेसाठी
उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले.
*****
No comments:
Post a Comment