Tuesday, 27 November 2018

‘एमएसएमई’चे मिशन मोडवर काम सुरु – व्ही. राधा


* मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसिसिंग इंडस्ट्री आणि डिक्की यांच्या
संयुक्त विद्यमाने अन्न प्रक्रिया व उद्योग परिसंवाद संपन्न
नागपूर दि. 27 :  केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसिसिंग इंडस्ट्रीतर्फे अन्न प्रक्रिया उद्योगातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी 100 दिवसीय आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे एमएसएमईचे मिशन मोडवर काम सुरु करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पेयजल व स्वच्छता विभागाच्या सहसचिव श्रीमती व्ही. राधा यांनी केले.
त्या मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसिसिंग इंडस्ट्री व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)च्या वतीने अन्न प्रक्रिया उद्योगावरील विविध जनजागृती कार्यक्रमाच्या परिसंवादात मार्गदर्शन करताना बोलत होत्या. हा परिसंवाद बानाई हॉल, उर्वेला कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे सहायक महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, विदेश व्यापार अधिकारी रामेश्वर बोरीकर, बँक ऑफ बरोडाचे व्यवस्थापक स्वप्निल देशमुख, डिक्कीचे विदर्भ अध्यक्ष गोपाल वासनिक, उद्योजक अमिताभ मेश्राम, डिक्कीचे व्हर्टीकल हेड विजय सोमकुंवर, लीड बँक व्यवस्थापक शरद बारापात्रे आणि  मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसिसिंग इंडस्ट्री दिल्ली येथील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना गृहोद्योगापासून सुरुवात करावी लागणार आहे. महिला आणि युवकांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविला आहे. या कार्यक्रमात देशातील 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेशअसल्यामुळे महिला आणि युवकांनी याचा लाभ घ्यावा. महिला घरी बसूनही उद्योग सुरु करु शकतात. त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु असल्याचे श्रीमती व्ही. राधा यांनी सांगितले.
 अन्नावर प्रक्रिया करुन त्या उत्पादनाचे मूल्यवर्धन करता येते. अन्नावर प्रक्रिया केल्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि दीर्घकालीन दर्जाच्या संवर्धनातून उत्पादकांना अधिकचे मूल्य मिळते. त्यासाठी उत्पादनाची चांगली पॅकेजींग करणे आवश्यक आहे. केंद्र शासन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी आणि उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्नशील असून, ते मिशन मोडवर काम करत आहे. त्यामुळे शासन अशा उद्योजकांसाठी मदत करण्यास तत्पर असून,  ते उदयोन्मुख उद्योजकांच्या आणि नव्याने उद्योग व्यवसायात येऊ इच्छिणारांच्या दारापर्यंत आले आहे. तसेच ते भविष्यातही उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी 59 मिनिटांमध्ये वित्तीय मदत करण्यास तयार आहे. त्यासाठी देशातील बँकाचाही सहभाग असल्याचे श्रीमती व्ही. राधा यांनी यावेळी सांगितले.   
यावेळी दलित उद्योजकांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून, सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. एस.सी., एस. टी.च्या उद्योजकांना सहज आणि सुलभ वित्तपुरवठा व्हावा, यासाठी जवळपास 15 पेक्षा जास्त बँका वित्तपुरवठा करण्यास तयार असल्याचेही यावेळी श्री. लोहकरे यांनी सांगितले.  
यापूर्वी कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे सहायक महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे यांनी  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, भारतीय खाद्यान्ने प्रक्रिया केल्यास उद्योजकांना उत्पादनाची चांगली संधी निर्माण करुन देऊ शकतात, असे सांगितले.  
त्यामध्ये देशात उत्पादित होणारी विविध फळे, त्यांच्यावर केलेली प्रक्रिया, भाजीपाला आणि त्यांच्यावर प्रक्रिया केल्यानंतर होणारा फायदा याबद्दल माहिती दिली.  तसेच मटन, कुक्कुटपालन, बेकरी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर केलेली प्रक्रिया, मध, साखर आणि यावर केलेल्या प्रक्रियेतून उत्पादित होणारे विविध पदार्थ, सेरेल आणि भुईमुगावर केलेली प्रक्रिया आदि उत्पादनावर विविध प्रक्रिया करुन येथील महिला आणि युवकांना त्यांचा उत्कर्ष साधता येऊ शकतेा, यासाठी आवश्यक असलेली वित्तपुरवठ्यासाठीची मदत करण्यास सदैव तत्पर असल्याचे यावेळी नागपाल लोहकरे म्हणाले.  
पूर्व विदर्भात पिकणारा बासमती आणि बिगर बासमती  तांदूळ हा महत्त्वपूर्ण घटक असून, यावर नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रक्रिया केल्यास त्याचा सर्वाधिक फायदा येथील उद्योजकांना मिळणार असल्याचे सांगत त्यांनी सीडलेस संत्रा आणि मोसंबीवर प्रक्रिया करुन ज्यूस उद्योगात उतरण्याबाबत नागपाल लोहकरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच वित्तीय मदतीसाठीच्या सहा स्टेप्सही त्यांनी यावेळी उपस्थित विदर्भातील उद्योजकांना यावेळी सांगितल्या.
नागपूर जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योग स्थापनेसाठी युवक-युवतींना, उद्योजकांना प्रोत्साहित करणे, त्यांना सहजपणे उद्योग स्थापनेसाठी अर्थसहाय उपलब्ध करून देणे, अन्न प्रक्रिया उद्योग स्थापनेसाठी आवश्यक विविध कायदेशीर बाबींची ओळख करून देणे, अन्न सुरक्षा कायदेविषयी माहिती देणे या उद्देशाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, असे डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके आणि डिक्की विदर्भचे अध्यक्ष गोपाल वासनिक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रदिप मेश्राम यांनी संचालन तर गोपाल वासनिक यांनी आभार मानले.
                                                       ****

No comments:

Post a Comment