नागपूर, दि. 25 : नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ‘कालिदास महोत्सवा’चे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात दिनांक 27 ते 29 नोव्हेंबर 2018 मध्ये आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलावंत कालिदास महोत्सवात आपली हजेरी लावून आपला कलाविष्कार सादर करतील.
कवि कालिदास यांनी अमर काव्य ‘मेघदूतम’, ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ सारख्या अजरामर नाटकांची रचना केली. कालिदास महोत्सव ‘परंपरेचा पुन्हा आविष्कार’चा ब्रीदवाक्य घेऊन नवीन संकल्पनासह रसिकांच्या भेटीला येत आहे. कालिदास महोत्सव नागपूर व रामटेकपर्यंत न राहता महाराष्ट्राची ओळख व्हावी, यासाठी या महोत्सवाचे आयोजन भव्य स्वरुपात करण्यात येत आहे.
विदर्भाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाकडे लक्षवेध करणे व पूर्व विदर्भ आणि नागपूरला राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून स्थापित करणे, असे उद्देश समोर ठेवून आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव महाकवि कालिदास व ऐतिहासिक वारसा संपन्न विदर्भ भूमि यांचे नात्याचा पुनरुच्चार करीत आहे. वर्ष 2015 मध्ये ‘मेघदूतम्’, वर्ष 2016 मध्ये ‘कुमारसंभव’ वर्ष 2017 मध्ये ‘त्रृतुसंहार’आणि यंदा 2018 मध्ये ‘शकुंतला- भारतीय स्त्रीचे सूर’ अशा कवि कालिदास यांच्या कालजयी ग्रंथांचा आधार घेवून भारतीय शास्त्रीय संगीत परंपरातील गायन, वादन व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
कालिदास महोत्सवाच्या माध्यमातून या भागातील समृद्ध सांस्कृतिक, साहित्यिक व पुरातत्व वारसाकडे लोकांचे लक्ष वेधण्यात कालिदास महोत्सव यशस्वी झाला आहे.
कालिदास महोत्सव आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महानगरपालिकेच्या सौजन्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवामध्ये 27 नोव्हेंबर रोजी अनुराधा पाल यांचे ताल वाद्य वृंद, आरती अंकलीकर यांचे शास्त्रीय गायन, 28 नोव्हेंबर रोजी पद्मश्री देवयानी यांचे भरतनाट्यम् नृत्य व कौशिकी चक्रवर्ती यांचा कौशिकी आणि सखी या कार्यक्रमाचे आयोजन आहे तर समारोपाच्या दिवशी संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन तर परवीन सुलताना यांचे शास्त्रीय गायन आहे. कानासोबत मनाला देखील सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.
****
No comments:
Post a Comment