Friday, 23 November 2018

विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी - नितीन गडकरी


विदेश शिष्टमंडळांना आवाहन
नागपूर दि.23 : भारत सध्या विकासप्रक्रियेत प्रचंड वेगाने प्रगती करत असून, देशात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आहे. या विकासप्रक्रियेत विदेशी गुंतवणूकदारांना सहभागी होण्यास सांगून विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.   
            केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची विविध विदेशी शिष्टमंडळांनी  मानकापूर स्थित विभागीय क्रीडा संकुल येथे इंडियन रोड काँग्रेसच्या वतीने आयोजित  79 व्या अधिवेशनात भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी विदेशी शिष्टमंडळांशी बोलत होते.
            यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भारताचा भर आहे. त्यामध्ये देशातील रस्ते महामार्ग, रेल्वे, जहाजबांधणी, बंदरे, नद्यांमधून करण्यात येणारी जलवाहतूक, विमानतळे बांधणीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे देशातील पायाभूत सुविधा उभारणी आणि त्यांचे बांधकाम, त्यात लागणारे साहित्य यामुळे गुंतवणुकीत प्रचंड वाव आहे. उज्वल भारताच्या पायाभरणीत गुंतवणुकदारांनी सहभागी व्हावे. विदेशी गुंतवणुकीची मेक इन इंडियाआणि मेड इन इंडियाला गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
            यावेळी विदेशी शिष्टमंडळाने देशात गुंतवणूक करण्यात उत्सूक असल्याचे सांगितले. शाश्वत विकासासाठी त्यांच्या कंपन्याकडून विकास प्रक्रियेत रस्ते बांधणी, विमानतळे, बंदरे, जहाजबांधणी, रेल्वे बांधकाम आणि  जलवाहतुकीसाठी आवश्यक ती सर्व साधनसामुग्री उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरुन बनविलेली असल्याचे सांगितले.  
            या विदेशी शिष्टमंडळात इंग्लंड, जर्मनी, कॅनडा, भूटान, अमेरिका, श्रीलंका, फ्रान्स, डेन्मार्क, स्वीडन, इटली, ऑस्ट्रीया, दुबई, इस्त्रायल यासह एकूण 22 देशांतील शिष्टमंडळांचा सहभाग होता.
*****

No comments:

Post a Comment