Thursday, 3 January 2019

प्रयागराज कुंभमेळा २०१९ साठी महाराष्ट्रातील जनतेचे स्वागत - उत्तरप्रदेश नगर विकास मंत्री सुरेश खन्ना


मुंबई, दि. ३ : मानवी संस्कृतीतील अ्दिवतीय सांस्कृतिक वारसा ठरलेला भारतातला कुंभमेळा उत्तर प्रदेश येथील अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज येथे १५ जानेवारी ते ४ मार्च 2018 दरम्यान आयोजीत करण्यात आला आहे. अध्यात्मासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्र येण्याचे पृथ्वीवरील हे एकमेव स्थान आहे. महाराष्ट्रातील जनतेने या कुंभमेळ्यास भेट द्यावी असे निमंत्रण उत्तर प्रदेशचे संसदीय कार्य आणि नगर विकास मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी दिले.
मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे सहा वर्षानंतर होणाऱ्या प्रयागराज कुंभमेळा २०१९ साठीचे निमंत्रण आणि माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. खन्ना बोलत होते. परिषदेस उत्तर प्रदेश नगर विकास विभागाचे सचिव संजय कुमार, सीआयआय महाराष्ट्र राज्य समितीचे माजी संचालक सुनील खन्ना आदी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे श्री. खन्ना यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डिजीटल निमंत्रण यावेळी दिले.
अधिक माहिती देताना श्री. खन्ना म्हणाले, जानेवारीत आयोजीत या भव्य आणि दिव्य अशा कुंभ मेळ्यास सांस्कृतिक, सुरक्षित आणि डिजीटल रूप देण्यात आले आहे. भारताचे संस्कृती आणि पर्यटन जगापर्यंत पोहोचविण्याचा या मेळ्यातून प्रयत्न केला जाणार आहे. ३ हजार २०० हेक्टर परिसरात आयोजीत या मेळ्यास १२ करोड भाविक उपस्थिती दर्शवतील, असा अंदाजही व्यक्त केला जात असून, महाराष्ट्रातील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी आशा श्री. खन्ना यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, जगभरातून एकूण १० लाख परदेशी पर्यटक १९२ देशातून उपस्थित राहणार आहेत. कुंभसाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी शासनाने निवास व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता, प्रवास यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुंभमेळा भागामध्ये आलीशान टेण्ट सिटी स्थापन करण्यात आली असल्याची माहितीही श्री. खन्ना यांनी यावेळी दिली.
०००

No comments:

Post a Comment