Saturday, 2 February 2019

स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यशाळेत उलगडल्या स्वच्छ शहरांच्या गाथा कचऱ्यावर प्रक्रियेला घनकचरा व्यवस्थापनामध्ये भर द्यावा - आर.ए. राजीव


 
मुंबई, दि. 2 : घन कचरा व्यवस्थापनामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करणे व त्याची वाहतूक करणे याबरोबरच त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी प्रादेशिक प्रक्रिया सुविधा तयार करणे आवश्यक असल्याचे मत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी आज येथे व्यक्त केले.
इराफ – इन्व्हायर्मेंट रिसर्च फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्वच्छ महाराष्ट्र मिशन, निती आयोग व सीएसआयआर-निरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छ भारत अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापनया विषयावरील परिसंवादात श्री. राजीव बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सीएसआयआर-निरीचे संचालक राकेश कुमार होते. या परिसंवादात इकोप्रो इन्व्हायमेंटल सर्व्हिसचे संचालक व इंदोर महानगरपालिकेचे सल्लागार असद वारसी, पुणे महानगरपालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी केतकी घाटगे, नाशिक महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, कर्जत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे, इराफचे जीआयएस तज्ज्ञ राहूल देशमुख आदींनी सहभाग घेतला.
            श्री. राजीव म्हणाले, गेल्या काही काळात वेंगुर्ला, माथेरान, पुणे, कर्जत, इंदोर, नाशिक आदीसारख्या शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य झाले आहे. घन कचरा व्यवस्थापन करत असताना कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करणे यावरच जास्त भर देण्यात आला आहे. मात्र, सर्वाधिक महत्त्वाच्या असणाऱ्या कचऱ्यावरील प्रक्रियेसंदर्भात बहुतांश शहरे जागृत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सर्वच शहरांनी कचऱ्यावरील प्रक्रियेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
            कचऱ्यावर प्रक्रियेसाठी काही ठिकाणी कालबाह्य तंत्रज्ञान वापरण्यात येते. त्यामुळे नवनव्या तंत्रज्ञान व कल्पनांचा यासाठी विचार करायला हवा. तसेच यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारीतून प्रकल्प उभारण्यापेक्षा अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) या तत्वाचा स्विकार करणे आवश्यक ठरले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राजकीय इच्छाशक्ती, लोकचळवळ व प्रसासकीय पाठिंब्यांने इंदूर झाले स्वच्छ शहर
इंदूर महानगरपालिकेचे सल्लागार असद वारसी यांनी स्वच्छ इंदूरच्या यशामागची गाथा उलगडून सांगितली. ते म्हणाले, राजकीय इच्छाशक्ती, भक्कम प्रशासकीय पाठिंबा व अंमलबजावणी आणि अभियानास लोकचळवळीचे स्वरुप दिले तर शहरांमधील घन कचरा व्यवस्थापनात यश मिळवू शकतो. इंदोर शहराला धूळमुक्त, कचरा कुंडीमुक्त व कचरामुक्त करण्यासाठी या तीन सूत्रांचा वापर केला. त्यामुळे देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरचा गौरव झाला. लोकांचा सहभागाबरोबरच कचरा साचण्याच्या ठिकाणे शोधणे, कचऱ्याची वाहतूक करणे आदीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. कचरा निर्माण होणाऱ्या स्थानापासून कचऱ्याच्या विलगीकरणावर भर द्यायला हवा, हे ओळखून मिशनमोडवर त्यासाठी विशेष मॉडेल व यंत्रणा निर्माण करण्यात आले. स्वयंसेवकांच्या व जागृत नागरिकांच्या माध्यमातून कचरा विलगीकरण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, या विषयी वारंवार नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
            छोट्या छोट्या युनिटमधून कचऱ्यावर प्रक्रिया करून ओल्या कचऱ्यापासून दररोज सुमारे 160 टन खताची निर्मिती करण्यात येते आणि हे खत शेतकऱ्यांना रास्त दरात देण्यात येते. प्लास्टिक व इतर कचऱ्यांचा पुनर्वापरावर भर देण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.
            पुणे महानगरपालिकेच्या वतीने घन कचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या आराखड्याची माहिती श्रीमती घाटगे यांनी दिली. त्या म्हणाल्या, पुणे शहरातील कचरा गोळा करण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबतच कागद, काच, कचरा ट्रेड युनियनच्या कामगारांची मदत घेण्यात येते. पुण्यात दररोज सुमारे 2 हजार ते 2100 मेट्रिक टन कचरा गोळा होतो. या कचऱ्याचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. कचरा वाहतुकीसाठी जीपीएस लावलेल्या वाहनांचा वापर केला जातो. शहरामधील 97 टक्के कचरा गोळा केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्वच्छ कर्जत, माथेरान व वेंगुर्ला
कर्जत, माथेरान व वेंगुर्ला शहरामध्ये राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची माहिती श्री. कोकरे यांनी दिली. त्यांनी सांगितले, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची सोय करण्यात आली होती. ओला व सुका कचरा वेगळा करून देण्यासाठी नागरिकांची मानसिकता तयार केली. जे लोक कचरा वेगळा करून देत नाहीत, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकतात, त्यांच्यावर प्रसंगी दंडाची कार्यवाही केली. त्यामुळे नागरिकांना शिस्त लागून कचरा विल्हेवाट करण्याचे काम सोपे झाले. ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले. तसेच प्लॅस्टिक, थर्मोकोलचा कचऱ्याचा वापर अभिनव पद्धतीने केला गेला. या कचऱ्याचा वापर रस्ते बांधणीसाठी करण्याचे तंत्र यशस्वी झाले. माथेरान येथे 2003 पासून कचरा व्यवस्थापनासंबंधीचे नियम होते. मात्र, कर्जत व वेंगुर्ला येथे त्यानंतर असे नियम करण्यात आले. या दोन्ही गावांमध्ये सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वापरास बंदी घातल्यामुळे घन कचरा व्यवस्थापनाचे काम उत्कृष्ट पद्धतीने करता आले असल्याचे श्री. कोकरे यांनी सांगितले.
श्री. देशमुख म्हणाले, कचरा गोळा करणे, त्याची विल्हेवाट लावणे, यासाठी जीआयएस तंत्रज्ञान व ड्रोनचा वापर केल्यास घनकचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होते. कचरा गोळा होण्याची ठिकाणे, प्रत्येक घरामध्ये कोणत्या प्रकारचा कचरा गोळा होतो, त्याचे विलगीकरण होते की नाही, गोळा केलेला कचऱ्याचे योग्य ठिकाणी प्रक्रियेसाठी पाठविला जातो की नाही, या सर्व कामासाठी दोन्ही तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे.
यावेळी नाशिकमध्ये राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची माहिती श्री. माळी यांनी दिली. श्री. कुमार यांनी प्रास्ताविकात घन कचरा व्यवस्थापनमधील आव्हाने, वेगवेगळ्या यंत्रणांनी केलेली कार्य याचा उहापोह केला.
00000

No comments:

Post a Comment