* जागतिक दर्जाच्या ऑरेंज सिटी स्ट्रीट मॉलचे
भूमिपूजन
* दक्षिण-पश्चिममध्ये 378.25 कोटींच्या
विकासकामांचा शुभारंभ
* मिहानच्या टॅक्सीवेच्या कामाला सुरुवात
नागपूर, दि.2 : ऑरेंज सिटी मेट्रो मॉल हा
नागपूरच्या विकासासाठी महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. यासेाबतच दक्षिण-पश्चिम
भागाच्या सर्वांगिण विकासासह अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे
सर्वसामान्य जनतेला जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील व त्यांच्या जीवनात
आमुलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त
केला.
नागपूर मेट्रो व
महानगरपालिकेच्या ऑरेंजसिटी मेट्रो मॉल तसेच दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील
रस्ते, वीज, पाणी आदी सर्व आधुनिक सुविधांच्या विकासकामांचा शुभारंभ आज जयताळा
येथे झाला. या विकासकामांवर 378.25 कोटी रुपये खर्च होणार आहेत. मिहानचा टॅक्सी वे
सोबत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या बांधकामांची सुरुवात लवकरच होत
असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
जयताळा येथील बाजार चौक
येथे विविधविकास कामांचे भूमिपूजन व
लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन
गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे,
अनिल सोले, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे
अध्यक्ष संदीप जोशी, महाराष्ट्र राज्य
इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, स्थायी समितीचे अध्यक्ष
विकी कुकरेजा, नगरसेवक किशोर वानखेडे, जयश्री वाडीभस्मे, लक्ष्मी यादव, वास्तुविशारद
हाफीज कॉन्ट्रक्टर तसेच अन्य मान्यवर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयपीडीएस
योजनेअंतर्गत विविध ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्यांचे, 71 फुलोरा इकोस्मार्ट
टॉयलेटचे, मेट्रो मॉल निर्मितीचे, 74 ठिकाणी ग्रीन जीम तयार करणे कामाचे, तसेच रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंट क्राँक्रीट रस्ता,
पुलाचे बांधकाम, मलवाहिका, पेव्हमेंट, कंपाऊंड भिंत, प्रसाधनगृहे अशा विविध
बांधकामांचे भूमिपूजन व कंपोस्ट प्रकल्पाचे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राचे
तसेच आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
टिव्हीएस कंपनीने ‘सीएसआर’ निधी अंतर्गत ग्रीन जीमसाठी 3 कोटी रुपये दिले असून या
निधीचा धनादेश यावेळी मान्यवरांकडे सूपूर्द करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जयताळा भागातील विविध विकासकामांचे
भूमिपूजन व लोकार्पण होत असल्याने या भागातील नागरिकांसाठी ही बाब अत्यंत आनंदाची
आहे. मेट्रोमॉलच्या उभारणीद्वारे विविध सुविधा उपलब्ध होणार असून याबरोबरच मोठ्या
प्रमाणावर रोजगार निर्मितीही होणार आहे. या भागातील रस्ते सिमेंट क्राँक्रीटचे
करण्यात येणार असून वीज वितरण कंपनीचे वायरींग अंडरग्राऊंड करण्यात येणार आहे. या
भागात सर्व आवश्यक विकासकामे करण्यावर भर देण्यात येत असून याद्वारे या भागाचा
चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. ‘मिहान
प्रकल्पाच्या’ आरक्षणातून हा भाग आता मुक्त
होणार असून येथील 70 घरांचे पुनर्वसन याच भागात करण्यात येणार आहे. टाकळीसीम येथील
झोपडपट्टयामधील घरे वाचविण्यासाठी येथील रस्ता 40 फुटांचा करण्यात येणार आहे.
एकात्मता नगर येथील झुडपी जंगलांच्या जमिनीवरील घरांनाही सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्णयानंतर मालकी हक्क पट्टेवाटप करण्याची प्रक्रिया करता येऊ शकणार आहे.
एकंदरीतच सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येणार असून विविध
पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे नागपूर शहर व जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय दर्जा
प्राप्त करुन देण्यात येणार आहे.
मिहान प्रकल्पामध्ये आगामी काळात 30 हजार रोजगारनिर्मिती उपलब्ध होऊ शकणार
आहे. सोनेगाव तलावाचा परिसर सुशोभित व विकसित करण्यासाठी 18 कोटींचा निधी उपलब्ध
करुन देण्यात आला असून लवकरच अधिकचे 18 कोटी रुपयेही देण्यात येणार असल्याचेही
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सर्वसामान्यांच्या विकासाचा
ध्यास घेऊन विविध सोयीसुविधांचे फायदे सर्वसामान्यांना व गरिबांना मिळावेत यासाठी
विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीवर भर देण्यात येत असून त्याअंतर्गत
लंडन स्ट्रीट, मेट्रो मॉल यासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत आहे. लंडन
स्ट्रीट प्रकलपाद्वारे महापालिकेला महसूल उपलब्ध होणार असून गरीब व
मध्यमवर्गीयांना येथे घरेही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मेट्रो मॉलसारख्या
प्रकल्पांमुळे जवळपास 5 हजार तरुणांना रोजगार निर्मिती उपलब्ध होऊ शकणार आहे. ब्रॉडगेज रेल्वेच्या ट्रॅकवरच आता ब्रॉडगेज
मेट्रोही धावू शकणार आहे. अजनी परिसरात पॅसेंजर हब तयार करण्यात येणार आहे.
शहरातील विविध मार्केट परिसरांचा नागपूर मेट्रोद्वारे विकास करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी लवकरच इलेक्ट्रीक बसमध्ये मोफत प्रवास उपलब्ध
करुन देण्यात येणार आहे. मिहान प्रकल्पांमध्ये जवळपास 23 हजार तरुणांना रोजगार
उपलब्ध झाला असून आगामी काळातही याचप्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकणार असल्याचे
श्री. गडकरी यांनी सांगितले.
यावेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन
केले. नगरसेवक किशोर वानखेडे यांनी आभार मानले.
** * * * **
No comments:
Post a Comment