Wednesday, 6 February 2019

कामगार विमा सोसायटीची स्थापना करण्यास प्राधान्य द्यावे - एकनाथ शिंदे







मुंबई, दि. 6 राज्यातील कामगारांना अतिविशिष्ट वैद्यकीय उपचारांसह आधुनिक वैद्यकीय सुविधा सुलभतेने व परिणामकारकरित्या पुरविण्यासाठी राज्य कामगार विमा सोसायटीची स्थापना करण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

कामगार राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र राज्याची प्रादेशिक मंडळाची 112 वी बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कामगार मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. शिंदे यावेळी म्हणालेया सोसायटीची स्थापना झाल्यामुळे महत्त्वाचे निर्णय जलदगतीने घेणे शक्य होईल. याशिवाय कामगारांना वैद्यकीय सुविधा अधिकसुलभतेने पुरविणे शासनास शक्य होईल. तसेच केंद्र शासनांतर्गत असलेल्या राज्य कामगार विमा महामंडळाकडून दरवर्षी देण्यात येणारा निधी सोसायटीत जमा होणार असल्याने रुग्णालय तसेच निवासी इमारतींची दुरुस्ती-देखभाल, आधुनिक वैद्यकीय उपचार आणि उपकरणांची उपलब्धता या रुग्णांलयामध्ये होऊ शकेल.

श्री. पाटील-निलंगेकर यावेळी म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा योजनेचा लाभ पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी कामगार राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी महामंडळाने अभ्यास करुन योजनेचा लाभ अधिकाधिक कामगार वर्गाला कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावे. महामंडळाने ठेवलेले उद्दिष्ट कशा प्रकारे साध्य करता येईल, याचा कृती आराखडा सादर करावा, असे आदेश दिले.
राज्यातील कामगारांच्या आरोग्य सुरक्षेच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील राज्य कामगार विमा महामंडळ यांच्याकडून राज्य कामगार विमा योजना राज्यातील एकूण 22 जिल्ह्यांमध्ये नोंदणीकृत कामगारांसाठी राबविण्यात येते. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून कामगारांच्या वैद्यकीय सुविधांवर खर्च करण्यात येत असला तरी वैद्यकीय सुविधांच्या नियोजनाची जबाबदारी सर्वस्वी राज्य शासनाची आहे. या सुविधा राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाने, विमा वैद्यकीय व्यवसायी आणि राज्य कामगार विमा योजना रुग्णांलयामार्फत राज्यात कामगारांना पुरवल्या जातात.
००००

No comments:

Post a Comment