वृ.वि.353
मुंबई, दि. 1 : उद्योजकांनी स्वत:चा व्यवसाय उभारताना आपत्ती संदर्भात काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात असलेली ट्रिलीयन डॉलर उद्योग क्षमता लक्षात घेवून या क्षेत्रात अधिक उद्योजकांनी यावे, असे आवाहन (यु.एन.आय.एस.डी.आर) युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर रिक्स रिडक्शनचे आशिया पॅसिफिक प्रमुख डॉ. अनिमेश कुमार यांनी केले. चौथ्या जागतिक आपत्ती निवारण परिषदेतील ‘डिझास्टर रेझिलीयंट बिझनेस’ या परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात आयसीआयसीआय लोमबार्डचे गौरव अरोरा, एचसीएल टेक्नॉलॉजीचे चिफ कन्टीन्युटी आफिसर अरुनोब मित्रा, गुजरात पेट्रोकेमिकलचे कार्यकारी संचालक एन. बोस बाबू,फिकीचे वरिष्ठ सल्लागार ब्रिगेडीयर डॉ. बी. के. खन्ना आदींनी सहभाग घेतला.
डॉ. अनिमेश कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितले, आपत्ती निवारण क्षेत्रातील जगभरातील संशोधन आणि ज्ञान एकत्रित उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही यंत्रणेला आवश्यकता भासल्यास याचा उपयोग करता यावा. कार्पोरेट क्षेत्र, शासकीय यंत्रणा आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रित काम करण्यावरही त्यांनी भर दिला.
श्री. अरोरा यांनी उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे विमा कवच आणि त्याचे महत्व या विषयावर मत मांडले, ते म्हणाले, एखाद्या उद्योगाला असलेल्या पहिल्या तीन जोखमेमध्ये नैसर्गिक आपत्तीने नुकसान होणे याचा समावेश आहे. यात विमा केलेले आणि न केलेले दोन्ही प्रकारे आर्थिक नुकसान होते. केवळ विमा आहे या आधारावर न राहता उद्योग उभारताना आपत्तीचा सामना करण्यासाठी सक्षम अशा पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. प्रतिबंधक उपाय योजना राबविणे ही यशस्वी उद्योगाची गुरूकिल्ली असल्याचेही ते म्हणाले.
एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनीत ‘रिस्क मॅनेजमेंट’ यासाठी विशेष अधिकारी नेमले आहेत, असे सांगून श्री. मित्रा म्हणाले, उद्योगाचे आयुष्य पूर्वी किमान 60-70 वर्षे एवढे गणले जायचे. बदलत्या परिस्थितीत आता हे आयुष्य कमाल 16 वर्ष एवढे मर्यादित होत आले आहे. प्रत्येक उद्योजकाने त्याचा व्यवसाय हा भविष्यातील गरजा लक्षात घेवून त्यासाठी पुरेसा आहे किंवा नाही याचा सारासार विचार करावा. ‘रिस्क इंटिलिजेंट’ या क्षेत्रात ‘रिस्क एक्सपर्ट’ म्हणून जाणकारांनी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी विषद केले.
श्री. एन. बोस बाबू यांनी गॅसचे पाईप टाकताना येणाऱ्या अडचणीबद्दल सांगितले. ते म्हणाले, पाईपलाईन टाकताना ते क्षेत्र पुरग्रस्त, भूस्खलन होणारे, ओलीताखाली किंवा समुद्राच्या जवळ नसावे अशा मार्गदर्शक सुचना असतात, मात्र त्या भागाची गरज बघता सर्व बाबींचे पालन करणे प्रत्यक्ष शक्य होत नाही. अशा वेळी स्थानिक प्रशासन आणि परिस्थिती याचा मेळ घालून निर्णय घ्यावा लागतो. महाविद्यालयातील शिक्षण आणि प्रत्यक्ष काम यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळते. यासाठी प्रत्यक्ष कामासाठी लागणारे व्यावसायिक प्रशिक्षण व्ययक्तिक पातळीवर देणे गरजेचे आहे.
फिकीचे वरिष्ठ सल्लागार ब्रिगेडीयर डॉ. बी. के. खन्ना यांनी सांगितले, आपत्तीनंतर सुमारे 40 टक्के व्यवसाय हे पुन्हा उभे राहू शकत नाहीत. यु.एन.आय.एस.डी.आरने केलेल्या जागतिक पाहणी अहवालानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक हानीमध्ये गेल्या काही वर्षात नाट्यमयरित्या सुमारे 151 टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. फिकी आणि यु.एन.आय.एस.डी.आर यांच्या सहयोगाने ‘अराईज’ या उपक्रमांतर्गत देशातील कोणत्याही नागरिकाला अथवा स्वयंसेवी संस्थेला आपत्त्ती निवारणाच्या कामात विनामुल्य सहभाग घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
००००


No comments:
Post a Comment