Thursday, 7 February 2019

महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडून २.९२ कोटी रुपयांचा लाभांश धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द





रोपवन निर्मितीदर्जेदार बियाणांचा पुरवठा आणि वानिकीक्षेत्रात अग्रगण्य

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांनी सन २०१७-१८ चा महामंडळाचा रुपये २.९२ कोटी रुपयांचा लाभांश धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी वन मंत्री सुधीर मुनगंटीवारग्रामवकिास मंत्री पंकजा मुंडेवित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकरवन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेव्यवस्थापकीय संचालक डॉ. एन रामबाबू यांच्यासह महामंडळाचे इतर अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित लि.ची स्थापना १९७४ मध्ये करण्यात आली असून देशातील वानिकी क्षेत्रातील ही एक अग्रगण्य कंपनी आहे. यात पाच प्रदेश  कार्यरत असून त्यामध्ये १४ वन प्रकल्प, १ औषधी वनस्पती विभाग आणि एक आगार विभाग यांचा समावेश आहे. एफडीसीएमच्या वानिकी कामांसाठी महाराष्ट्र राज्याच्या एकूण वनक्षेत्राच्या ६ टक्के वनक्षेत्र त्यांना भाडेपट्ट्यावर देण्यात आले आहे.

महाराष्ट्र वानिकी प्रकल्पांतर्गत वानिकी बीज केंद्राची स्थापना नागपूर येथे करण्यात आली आहे. दर्जेदार बियांचा पुरवठा करून रोपवनांची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने हे केंद्र काम करते. या केंद्रामध्ये दर्जेदार बियांचे संकलन, संस्करण, चाचणी, प्रमाणीकरण व साठ्याची सोय उपलब्ध आहे. आजपर्यंत १८७५ हेक्टर बीज क्षेत्र निवडण्यात आले आहे. तर १४३४ हेक्टर बीज उत्पादन क्षेत्र स्थापित झाले आहे. एफडीसीएम (FDCM)अंतर्गत महाराष्ट्र फॉरेस्ट सीड सेंटर, नागपूर ची ॲमेझॉनच्या www.amazon.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात  आली आहे. ऑक्टोबर २०१७ पासून प्रक्रिया केलेल्या साग बियाणांची ॲमेझॉन मार्फत ऑनलाईन विक्री सुरु करण्यात आली आहे.
हरित महाराष्ट्राच्या निर्मितीत एफडीसीएमचे भरीव योगदान
- सुधीर मुनगंटीवार
            वन विभागाच्या तीन वर्षातील ५० कोटी वृक्षलागवडीच्या कामात एफडीसीएम सहभागी असून रोपवन निर्मिती असेल, वन संरक्षण असेल, बीज संकलन असेल  किंवा टर्न की प्रकल्प असेल अशा विविध माध्यमातून काम करताना एफडीसीएमने कामाचा उत्तम दर्जा राखत हरित महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये भरीव योगदान  देत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. देशातील वानिकी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून एफडीसीएमकडे पाहिले जाते असेही ते म्हणाले.
एफडीसीएम लि.च्या सीड युनिट, वन प्रकल्प विभाग- नागपूर व रोपवाटिका चुलबंद, वन विभाग गोंदिया यांना आयएसओ नामांकन प्रमाणीकरण करण्यात आले आहे. एफडीसीएम लि. हे संपूर्ण देशात वानिकी क्षेत्रात आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले महामंडळ आहे. आय.एस.ओ प्रमाणीकरणामुळे वन विकास महामंडळाच्या बियाणे आणि रोपांबाबत ग्राहकांमध्ये विश्वासनीयता वाढली आहे. सप्टेंबर २०१८ पासून भारतीय मानक ब्युरो, मुंबई ISO 9001 :२०१५  नुसार बीजघटक, नागपूर व चुलबंद रोपवाटिका या दोन स्थळांचे ISO 9001: 2015  मध्ये श्रेणीवाढ करण्याची कार्यवाही सुरु आहे.
एफडीसीएम लि तर्फे दरवर्षी अंदाजे ४ हजार हेक्टर क्षेत्रावर रोपवनाची कामे हाती घेण्यात येतात. त्यात अंदाजे २ हजार हेक्टर रोपवने सागाची असतात तर उर्वरित मिश्र रोपवने असतात. आतापर्यंत ५.३४ लाख हेक्टर क्षेत्रावर रोपवनांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात १.४९ लाख हेक्टर मौल्यवान साग रोपवनांचा समावेश आहे. साग रोपवनांचे आजचे बाजारमूल्य ३५०० कोटी रुपये आहे. अशा विविध उपक्रमांमधून भविष्यात  देशातील सर्वाधिक लाभ मिळवणारी कंपनी म्हणून एफडीसीएमचे नाव घेतले जाईल असा विश्वास चंदनसिंग चंदेल यांनी व्यक्त केला आहे. एफडीसीएम कडून स्वत:च्या उपयोगासाठी तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रासाठी १ ते १.५ कोटी रोपांची दरवर्षी निर्मिती केली जाते.
0000



No comments:

Post a Comment