Wednesday, 6 March 2019

निवडणूक कालावधीत समाज माध्यमांवरील सनियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा - समाज माध्यम तज्ज्ञ निखील कारमपूरी



मुंबई, दि. 6 : निवडणूक कालावधीत समाज माध्यमांवरून केल्या जाणाऱ्या प्रचारावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सनियंत्रण करणे शक्य असून निवडणूकीदरम्यान जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीने याचा परिणामकारक उपयोग करावा, असे  समाज माध्यम तज्ज्ञ निखील कारमपूरी यांनी आज सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या निवडणूक विषयक कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी श्री. कारमपुरी बोलत होते.
श्री. कारमपुरी म्हणाले, प्रचाराचे माध्यमं बदलले आहेत. वृत्तपत्र, टि.व्ही. याशिवाय या निवडणूकीत समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या प्रचारावर सनियंत्रण ठेवणे हे यावेळच्या निवडणूकीतील मोठे आव्हान असणार आहे. यासाठी गुगल, फेसबुक यासारख्या अग्रगण्य समाज माध्यमांनी राजकीय मजकुरासाठी नियमावली तयार केली आहे. या माध्यमांवर जाहिरात करणारा मजकूर टाकतांना व त्यासाठी खर्च करताना राजकीय प्रतिनिधींना वेगळे अकांऊंट ठेवावे लागणार आहे.
अधिकृत ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब या समाजमाध्यमांवर  टाकला जाणारा मजकूर हा प्रमाणित केलेला असणे आवश्यक राहणार आहे. प्रचार करणारा मजकूर शोधता यावा यासाठी आधुनिक असे टुल्स आणि प्रोग्राम उपलब्ध आहेत. वापरण्यास सोप्या अशा काही टुल्सची माहिती करून घेतल्यास सनियंत्रण शक्य होणार आहे. व्हॉट्‍सअप सारखे माध्यम वैयक्तिक संपर्कासाठी असले तरी या माध्यमाचाही उपयोग प्रचार प्रसारासाठी होत असतो. या माध्यमांवरील मजकुरावर सनियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक लोकांच्या गृपचे सहकार्य घ्यावे असेही श्री. कारमपुरी यांनी सांगितले.
यावेळी महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, सुरेश वांदिले, संचालक (विशेष कार्य) शिवाजी मानकर, उपसंचालक गोविंद अहंकारी, सीमा रनाळकर, विभागीय उपसंचालक गणेश मुळे, मोहन राठोड, यशवंत भंडारे, किरण मोघे आदी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment