Tuesday, 21 January 2020

महारेशीम अभियानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - भाग्यश्री बानायत 24 जिल्ह्यातील 4 हजार 982 गावांपर्यंत प्रसार 30 जानेवारीपर्यंत अभियानाला मुदतवाढ

प्र. प. क्र. 67                                                                                          दिनां 21 जानेवारी 2020



          नागपूरदि. 21: महारेशीम अभियानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 24 जिल्ह्यातील 4 हजार 982 गावांमध्ये रेशीम शेतीची माहिती देण्यात आली आहे. या अभियानाचा 1 लाख 22 हजार 231 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या अभियानाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा यासाठी 30 जानेवारीपर्यंत अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती रेशीम संचालक भाग्यश्री बानायत यांनी आज दिली.
            महारेशीम अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम शेतीकडे वळावे यासाठी राज्यात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान 21 जानेवारीपर्यंत राबविण्यात येत होते. शेतकऱ्यांचा या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे  अभियानाची मुदत वाढविण्यात येत असल्याचे श्रीमती बानायत यांनी सांगितले.
            रेशीम शेतीला महारेशीम अभियानामध्ये प्रोत्साहन मिळत असून उदिष्टापेक्षा दुप्पट नोंदणी शेतकऱ्यांनी श्वेच्छेने केली आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर रेशीम रथ तयार करण्यात आला असून रेशीम शेती संबंधित संपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. राज्यात सन 2020-21 या वर्षाकरिता 5 हजार एकर क्षेत्रामध्ये तुती लागवडीचा लक्ष्यांक शासनामार्फत देण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या लक्ष्यांकाची  पूर्तता करण्यासाठी सर्व संबंधित जिल्ह्यांना लक्षांक देण्यात आला असून त्या प्रमाणे जिल्ह्याची पूर्तता करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
            रेशीम संचालनालयामार्फत महारेशीम अभियान यंदा 30 जानेवारी 2020 पर्यंत संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहेत. रेशीम शेतीबाबत जनजागृती निर्माण होवून, याचे महत्त्व सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे यासाठी महारेशीम अभियान-2020, अंतर्गत नवीन तुती लागवड नोंदणी करण्याचे काम राज्यभर राबविण्यात येत आहे. महारेशीम अभियान गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. याला शेतकऱ्याचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  शासनाने दिलेल्या लक्ष्यांकाच्या दुप्पट रेशीम शेतीसाठी शेतकरी नोंदणी करीत आहेत.  रेशीम उद्योगाची राज्यात मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी व्हावी व त्याद्वारे राज्यातील रेशीम उद्योगाला वाढ होण्यासाठी ‘महारशीम अभियान 2017 पासून महारेशीम अभियान 2020’ राबविण्यात आले असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एकूण 4 हजार 982 गावांमधील 12 लाख 2 हजार 231 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली आहे. महारेशीम अभियानांतर्गत इच्छूक शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा रेशीम कार्यालयात संपर्क साधून तुती लागवडीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले आहे. 
*****

No comments:

Post a Comment