Tuesday, 21 January 2020

दक्षता व गुण नियत्रंण मंडळाच्या प्रयोगशाळेला एनएबीएल नामांकन नामांकन मिळविणारी राज्यातील पहिली प्रयोगशाळा


प्र. प. क्र. 66                                               दिनांक 21 जानेवारी 2020



नागपूर, दि. 21 :  दक्षता व गुण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेला गुणवत्ता व तांत्रिक व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब केल्यामुळे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन गुणवत्ता परिषदेतर्फे एनएबीएल नामांकन जाहीर केले आहे. राज्यातील महाराष्ट्र शासनाची नामांकन मिळविणारी नागपूरची प्रयोगशाळा एकमेव ठरली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण मंडळांतर्गत प्रादेशिक प्रयोगशाळेमध्ये प्रचलित मानकानुसार बांधकाम साहित्याच्या अचूक चाचण्या करुन विश्वासार्ह अहवाल तयार करण्यात येतो. यामुळे पायाभूत सुविधांचा व बांधकामाचा दर्जासुद्धा गुणवत्तापूर्ण राहते. नागपूरच्या प्रादेशिक प्रयोगशाळेची स्थापना 1979 साली झाली असून या प्रयोगशाळेला आय. एस. ओ. 17025-2017 प्रमाणे  दर्जा प्राप्त आहे. राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन  प्रयोगशाळा प्रत्यायण बोर्ड गुणवत्ता परिषदेने या प्रयोगशाळेत एनएबीएल नामांकन प्राप्त झाले आहे.
एनएबीएल प्रणालीप्रमाणे बांधकाम साहित्यातील क्राँक्रिट(क्यूब), कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन्थ, स्टीलबार व बिटुमेनच्या स्थापना केल्या जातात व त्याचबरोबर  इतर बांधकाम साहित्याच्या चाचण्या सुद्धा या प्रयोगशाळेत केल्या जातात. बांधकाम साहित्याविषयी प्रयोगशाळेत तपासणीसाठी साहित्य स्वीकारले जात असून यासंबंधीचे शुल्क स्वीकारण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केल्या जातो. बांधकाम साहित्याची  तपासणी करताना क्राँक्रिट(क्यूब) साठी सीटीएम, स्टीलबारसाठी युटीएम व बिटुमेन चाचणीसाठी व्हिस्कोमीटर या मशिनसाठी स्कॅडा या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्यामुळे अचूक अहवाल तयार करण्यास मदत होते. प्रादेशिक प्रयोगशाळेत अद्ययावत पद्धतीचा अवलंब करण्यात येत असून अनुभवी व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध असल्याची माहिती दक्षता  व गुण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. नितीन टोणगांवकर यांनी सांगितले.
दक्षता व गुण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक प्रयोगशाळा एनएबीएल नामांकन मिळविणारी महाराष्ट्र शासनाची प्रथम एकमेव प्रयोगशाळा ठरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता डॉ. नितीन टोणगांवकर तसेच कार्यकारी अभियंता गजानन येनकर, दक्षता व गुण नियंत्रण मंडळाच्या गुण नियंत्रण प्रमुख श्रीमती प्रगती माटे-नाईक, सर्वश्री पुल्लरवार, भाले, पुसदेकर, मोहोड, श्रीमती लोणारे यासोबतच तांत्रिक कर्मचारी सर्वश्री बुद्धे, पाटील, गेडाम, श्रीमती मडावी यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे प्रयोगशाळेला नामांकन मिळाले आहे. नामांकनासाठी व्यवस्थापक सल्लागार श्री. लाखे तसेच  श्रेयस क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टिमच्या श्रीमती क्रांती  धारकर, एम. एम. नाविद यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
नामांकन मिळाल्याबद्दल अधिकाऱ्यांचा गौरव
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयोगशाळेला राज्यातील पहिल्या व एकमेव एनएबीएल प्रणाली मिळाल्याबद्दल मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी  दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. नितीन टोणगांवकर यांचा गौरव केला. या प्रणाली  अंतर्गत प्रयोगशाळेतील इतर चाचण्या सुद्धा घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.  
00000

No comments:

Post a Comment