Sunday, 26 January 2020

विभागासोबतच सर्व समाजघटकांच्या सर्वांगिण विकासाला शासनाचे प्राधान्य - डॉ. नितीन राऊत














·         भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन उत्साहात
·         सशस्त्र पोलिस दलाची मानवंदना, सांस्कृतिक कार्यक्रम 

नागपूर दि.26: महाविकास आघाडीच्या शासनाने शेतकरी, कामगार आणि तळागाळातील जनतेला  सन्मान आणि प्रतिष्ठा देण्यास प्राधान्य दिले आहे. विकासाच्या सर्वच क्षेत्रात नागपूरसह विभागाचा अग्रक्रम राहील. त्यासाठी सर्व पातळ्यांवर विविध उपक्रमांची निर्धाराने अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम येथील कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन झाले. त्यानंतर त्यांनी सशस्त्र पोलिस दलाची मानवंदना स्वीकारुन पथसंचलनाची पाहणी केली. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रश्मी बर्वे, खासदार डॉ. विकास महात्मे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलिस महानिरिक्षक के. एम. मल्लिकार्जून प्रसन्ना, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या सभापती शितल तेली-उगले, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.
देशाने संविधानाचा स्वीकार करुन लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. या समृध्द लोकशाही परंपरेचे रक्षण करणे आणि तिला जोपासणे हे आपले सर्वाचे कर्तव्य असल्याचे सांगताना डॉ.राऊत म्हणाले की, महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांनी देशाच्या अखंडतेसाठी बलिदान दिले आहे. सामाजिक परिवर्तनासाठी जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी केले. ते कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.
विकासाच्या सर्वच क्षेत्रात नागपूर जिल्हा आघाडीवर असल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले की, शासनाने शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील 52 हजार शेतक-यांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी अकराशे कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबांना संरक्षण देण्याची भूमिका आहे. समाजातील गरीब व वंचित कुटुंबांना विविध योजनांचा लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्याला प्राधान्य असून, शासनमान्य तसेच अनुदानित शाळेतील दहावीपर्यतचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याना मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे.  ग्रामीण भागातील शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व शाळा डिजिटल करण्यात येत आहेत.




जिल्हा विकास योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या विविध नाविन्यपूर्ण योजनाची घोषणा करताना डॉ. राऊत म्हणाले, नागपूर हे एज्यूकेशन हब म्हणून ओळखले जात आहे. त्यासोबत औद्योगिक क्षेत्रात मोठे उद्योग सुरु व्हावेत व बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ॲडव्हॉटेज विदर्भसारखा उपक्रम राबविण्यात येणार आहे.         नागपूर शहराच्या सर्वांगिण विकास करताना हे शहर स्मार्ट व सेफ म्हणून ओळख निर्माण करण्यासोबत जनेतच्या विकासाच्या संकल्पना पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सक्षम ड्रेनेज सिस्टीम, सार्वजनिक स्थळांचे सौंदर्यीकरण व स्वच्छता, अतिक्रमणमुक्त फुटपाथ,, शहरातील तलावांची स्वच्छता, नौकानयन सुविधा, कारंजे, लेजर शो, बहुमजली बसस्थानक बसस्टॅड व  पार्किंग मॉल, आधुनिक बाजार संकुलेआदी तयार करण्यासाठी नियाजन करण्यात येईल, असे सांगून डॉ. राऊत म्हणाले, जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच आयटीआयमधून विद्यार्थी दरवर्षी मोठ्या संख्येने उत्तीर्ण होतात. परंतु त्यांना रोजगार नाही, त्यांच्यासाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण  दिले जाईल. तसेच लघु उद्योग स्टार्ट अप तयार करण्यासोबतच मोठ्या उद्योगांना लागणारी छोटी सामग्री निर्मितीचे प्रशिक्षण दिल्यामुळे लघुउद्योगाचे नवे दालन तयार होईल.
 स्मार्ट सिटी प्रकल्पात लोकसहभाग वाढविणे, स्ट्रीट फूड - हातठेले यांना खाऊ गल्ल्लीत जागा देणे,  बसस्थानक-रेल्वेस्थानक-विमानतळ सौंदर्यीकरण करणे, यशवंत स्टेडियम व शहरातील उद्याने जागतिक दर्जाचे करण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यासोबत शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारणे, आधुनिक कचरा व्यवस्थापन, बी.पी.एल. धारकांना अत्याधुनिक आरोग्य सेवेसाठी शासकीय इस्पितळे सुसज्ज करणे, 108 ॲम्बुलन्स सेवा तत्पर करणे, नागरिकांच्या समस्येकरिता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उभारणे आदींबाबतही डॉ. राऊत यांनी यावेळी  संकल्प व्यक्त केला.  
   राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 4, 13 आणि 15 तसेच नागपूर शहर तसेच ग्रामीण पोलिस, लोहमार्ग, होमगार्ड, राज्य आपत्तकालीन सुरक्षा पथक, शहर वाहतूक शाखा, एनसीसी यांच्यासह प्रहार सैनिकी विद्यालय, वर्धमान सैनिकी शाळा, भोसला मिलीटरी स्कूल, राजकुमार केवलरामानी स्कूल जरीपटका, सेंट उर्सुला स्कूल, राजेंद्र हायस्कूल, तसेच श्वान पथक, वज्र वाहन यांच्यासह अग्निशमन दल यांचे पथसंचलन झाले. 
    पालकमंत्र्यांच्या हस्ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक मिलिंद तोतरे आणि बट्टुलाल पांडे यांना उल्लेखनीय पोलिस सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच कुणाल धुरट आणि सुधीर इंगोले यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. सीमा रेवाळे, डॉ. सोनाली वानखडे, डॉ. सुचित्रा मनूरकर, डॉ. सुरेश माने, डॉ. हर्षदा फटींग यांना राष्ट्रीय मुल्यांकन पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. जय कविश्वर, माहिनी बुटे, मालविका बन्सोड, हर्षदा दमकोंडावार, प्रतिमा बोंडे, यश कांबळे, हिमानी फडके, अभिषेक ठावरे या क्रीडापटुंना तर परीक्षित गोहिया आणि रमेश बंग या क्रीडा मार्गदर्शक विविध क्रीडा स्तरावर उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिपक साळीवकर यांनी केले. मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाला स्वातंत्र्यसेनानी, नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments:

Post a Comment