नागपूर, दि.22 : रामटेक उपविभागांतर्गत रामटेक, पारशिवनी व मौदा तालुक्यातील शंभर शेतकऱ्यांचा 5 दिवसीय प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम नाशिक जिल्हयातील निफाड तालुक्यात शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान व संरक्षित शेती या विषयावर आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी 30 जानेवारीपर्यंत त्यांचे संबंधित रामटेक, पारशिवनी व मौदा तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे.
प्रक्षेत्र प्रशिक्षणात फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, आंबा, पेरु सघन लागवड, फळबाग व्यवस्थापन, बहार व्यवस्थापन, कांदाचाळ, संरक्षित शेती, एकात्मिक किड व रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणी प्रश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत समाविष्ट घटक जसे फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षित शेती, प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादीचा लाभ घेतलेले तसेच लाभ घेवू इच्छित असलेले शेतकरी, तसेच शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करु शकतात. या प्रशिक्षणासाठी प्रती शेतकरी प्रती दिन एक हजार रुपये याप्रमाणे पाच दिवसासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. यामध्ये प्रशिक्षणार्थींची प्रवास, भोजन व निवास व्यवस्था करण्यात येईल.
तालुकानिहाय लक्षांकाच्या मर्यादेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची सोडत काढून जेष्ठता सुचीनुसार प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येईल. महिला, अनुसूचित जाती व जमाती प्रर्वगातील शेतकऱ्यांना, तसेच शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गटास प्राधान्य देण्यात येईल. जास्तीत जास्त इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी दिनांक 30 जानेवारी 2020 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन रामटेकचे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment