Saturday, 31 August 2024

आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ø नागपूर येथे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण Ø ५२ लाख भगिनींच्या खात्यात १५६५ कोटींच्या लाभाची रक्कम जमा Ø महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उत्कृष्ट कार्य –नितिन गडकरी Ø योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात परिवर्तन – देवेंद्र फडणवीस Ø महिला कल्याणाच्या योजनांसाठी 75 हजार कोटी – अजित पवार नागपूर, दि. 31 : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात दिली. रेशीमबाग मैदानावर आज मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनींना अभिवादन करुन मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1 कोटी 7 लाख भगिनींच्या खात्यात लाभाची 3 हजार 225 कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. आज दुसऱ्या टप्यात 52 लाख भगिनींच्या खात्यात 1562 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने 1 कोटी 60 लाख महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. राज्याच्या तिजोरीचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळायलाच हवा. या योजनेच्या उत्तम अंमलबजावणीमुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या संबंधात कोणत्याही अपप्रचाराला महिलांनी बळी पडू नये. ही योजना भविष्यातही कायम स्वरुपी सुरु राहणार असून लाभाच्या रकमेत वाढ होणार आहे. सर्वसामान्य महिलांसाठी दीड हजार ही रक्कम मोठी आहे. या रकमेतून त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मोठी मदत होणार असून अर्थव्यवस्थेलाही या योजनेमुळे चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या लखपती दिदी योजनेत राज्यातील 50 लाखांहून अधिक महिलांना लखपती केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सरकार अत्यंत संवेदनशीलतेने निर्णय घेत आहे. तरुणांनाही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे. राज्य शासन अत्यंत संवेदनशिलतेने कार्य करीत आहे. शिक्षण शुल्क भरु न शकल्याने आत्महत्या कराव्या लागलेल्या तरुणीची माहिती मिळताच राज्य शासनाने शिक्षण शुल्कात पूर्ण सवलत देण्याच्या निर्णय घेतला. राज्यातील सरकार हे सर्वसामान्य जनतेसाठी देणारे आणि कृतीशीलतेने काम करणारे सरकार आहे. या सरकारने विविध घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी करतांनाच विकास आणि जनकल्याण याची सुयोग्य सांगड घातली आहे. या साऱ्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासमवेत त्यांच्या सुरक्षिततेचाही प्राधान्य दिले आहे. याबाबतच्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महिला सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य -नितीन गडकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून महाराष्ट्राने सर्वाधिक उत्तम काम केल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा एक मोठा प्रयत्न महाराष्ट्रात सुरु केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर कौतुक केले. राज्यातील महिलांमध्ये या योजनेमुळे उर्जा संचारली असून या लाभातून महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त झाले आहे. यातून त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. सामाजिक समतेसोबतच आर्थिक समता प्रस्थापित होण्यास या योजनेची मोठी मदत होणार आहे. शोषित, पीडीत आणि वंचित समुहातील महिलांना यातून जगण्याचा नवा विश्वास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या संकल्पनेतील अंत्योदयाचा सामाजिक विचार यानिमित्ताने प्रत्यक्षात येत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात परिवर्तन - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून नवी आश्वासकता व विश्वास राज्यातील बहिणींना मिळाला आहे. या योजनेला राज्यातील महिलांनी दिलेला अपूर्व प्रतिसाद लक्षात घेवून या योजनेच्या जोडीला आणखी काय देता येईल याचा प्रयत्न शासन करीत आहे. कोणत्याही स्थितीत ही योजना तेवढयाच सक्षमपणे राबवू असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरु केला आहे. महिला विकसित झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने भारत विकसित होणार नाही, हे लक्षात घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी सर्व पातळ्यांवर मदत करुन परिवर्तन घडविले जाईल. इतिहास बदलण्याची शक्ती महिलांमध्ये असते हे लक्षात घेवून त्यांच्या जीवनात विविध योजनांच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्याचे प्रयत्न केले जातील. त्यांच्या सन्मानाची जोपासना केली जाईल. अशी हमी देतानांच नागपुरच्या विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचीही श्री. फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. नागपूर शहरात झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याच्या निर्णयाचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. महिला कल्याणाच्या योजनांसाठी 75 हजार कोटी – अजित पवार या योजनेसंदर्भात करण्यात आलेल्या अपप्रचाराला आता उत्तर मिळाले असून तिच्या अंमलबजावणी संदर्भात पसरविण्यात आलेली नकारात्मकता अनाठायी असल्याचे सिद्ध झाल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारी असून ही भविष्यातही कायमस्वरुपी राबविण्यात येणार आहे. या योजनेसोबतच सिलेंडर वाटप, मोफत शिक्षण अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकार त्यासाठी 75 हजार कोटी रुपयाचा निधी खर्च करत आहे. महिलांना सबळ, सक्षम, सन्मानीत आणि सुरक्षित करण्याचे काम राज्यातील विद्यमान सरकारकडून करण्यात येत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सजग आहोत अशा शब्दात त्यांनी आश्वस्त केले. नागपुरात महिलांना 1 हजार 403 पिंक ई-रिक्षा –अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण या योजनेअंतर्गत राज्यातील ठरविलेल्या उद्दिष्टांपैकी जास्तीत-जास्त लाभ वितरीत करण्यात आल्याचे सांगितले. त्रुटींमुळे अर्ज बाद ठरल्यास महिलांना पुन्हा अर्ज करता येईल व कोणतीही महिला लाभापासून वंचित राहणार नाही, असा दिलासा त्यांनी दिला. राज्यात 10 हजार महिलांना पिंक-ई रिक्षा वितरीत करण्यात येणार असून यापैकी 1 हजार 403 रिक्षा नागपुरात वितरीत करण्यात येणार आहे. यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या नवरात्रोत्सवात अंगणवाडी सेविकांना विशेष लाभ देण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या खात्यात थेट लाभाचे वितरण या कार्यक्रमादरम्यान मंचाच्या मध्यभागी तयार करण्यात आलेल्या खास डिजीटल यंत्राची कळ दाबून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील 52 लाख महिलांच्या बँक खात्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभाचे थेट वितरण केले. या योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांना आर्थिक लाभ देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांना लाभ देण्यात आला आहे. 50 हजार महिलांचे अर्ज त्रुटींमुळे बाद ठरले असून या महिलांना पुन्हा अर्ज करता येईल व कोणतीही महिला लाभापासून वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना लाभाचे धनादेश वितरीत कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रातिनिधीक दहा लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनादेश वितरीत करण्यात आले. यासोबतच मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेच्या प्रातिनिधीक लाभही वितरीत करण्यात आला. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे रेशीमबाग येथील आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अदिती तटकरे यांनी केले. तत्पूर्वी ढोलताशांच्या गजरात व औक्षण करुन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी स्वागत झाले. येथे उभारण्यात आलेल्या विशेष मंचावर प्रवेश करताच महिलांनी हात उंचावून आणि राखी बांधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञभाव व्यक्त केला. त्यांनी उपस्थित महिलांवर पुष्पवृष्टी करुन महिलांचे अभिनंदनही केले. मध्यप्रदेशच्या खासदार माया नरोलिया, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, प्रवीण दटके, ॲड. आशिष जयस्वाल, समीर मेघे, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनूपकुमार यादव, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 000000

पर्यटनच्या नवीन धोरणातून रोजगार निर्मितीसह विविध क्षेत्राची होणार भरभराट - पर्यटन मंत्री गिरीश महाजन

पर्यटन धोरण-२०२४ : अॅडव्हांटेज विदर्भ कॉनक्लेव्ह 1 लाख कोटी गुंतवणूक व 18 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा नागपूर दि.31 : राज्य शासनाच्या नवीन पर्यटन धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पर्यटन क्षेत्र उंच भरारी घेण्यासाठी सज्ज असून या क्षेत्रात उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर्फे आयोजित पर्यटन धोरण-२०२४ अॅडव्हांटेज विदर्भ कॉनक्लेव्ह चे आयोजन येथील दक्षिण मेट्रो एअरपोर्ट स्टेशनच्या सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन मार्गदर्शन करत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई, पेंच प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला, असोसिएशनचे पदाधिकारी आशिष काळे व गिरीधर मंत्री याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्राला देशातच नव्हे तर जगातील सर्वोतम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचे आहे. यासाठी सर्वांना सोबत घेवून व प्रत्येक बाबीचा सर्वकष विचार करून राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन पर्यटन धोरण आणले आहे. यातून राज्यात 1 लाख कोटी गुंतवणूकीची व त्यासोबतच 18 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. यासाठी राज्यात विविध ठिकाणी पर्यटन महोत्सव आयोजित करून पर्यटकांना आकर्षित करण्यात येणार आहे. विविध परिषदांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन धोरणातून विविध वित्तीय प्रोत्साहन व पुरस्कार देण्यात येत आहे. यात भांडवली गुंतवणूक, व्याज अनुदान, विद्युत देयक, स्टँम्प ड्युटी, इको टुरिझम, महिला उद्योजक, ग्रामिण पर्यटन संस्था आदी विविध बाबींवर सुट व प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. रस्ते व दळणवळणाची साधने पर्यटनवाढीसाठी आवश्यक आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशांतर्गत चांगले रस्ते निर्माण करून पर्यटनाला चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भाला निसर्गाची देन लाभली असून येथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पर्यटन स्थळे, गडकिल्ले, पूरातन मंदिरे आणि वने व वन्य पशू पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. विदर्भात पर्यटन वाढीसाठी गुंतवणूक करून सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. देशातील सर्वोत्तम पर्यटन धोरण - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राने देशातील सर्वोत्तम पर्यटन धोरण आणल्याबद्दल पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले. पर्यटनातून विदर्भात समृद्धी व रोजगार निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून अभिनव पद्धतीने नवनवीन कल्पकतेच्या माध्यमातून पर्यटनाचा विकास करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. येणारा काळ पर्यटन उद्योगाचा असून पर्यटन धोरणातील वित्तीय प्रोत्साहनामुळे पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी आता ‘स्काय इज द लिमीट’ प्रमाणे अमर्याद संधी उपलब्ध झाल्या आहेत. रिसोर्ट व हॉटेल चालकांनी स्वच्छता व गुणवत्तापूर्ण सेवा आणि त्यासोबतच पार्किंग व पंचतारांकित टॉयलेट उभारण्यास प्राधाण्य देण्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला संबंधीत अधिकारी, पर्यटन व हॉटेल क्षेत्रातीत संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 00000

Friday, 30 August 2024

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज आगमन

Ø ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ कार्यक्रमाला उपस्थिती नागपूर, दि. ३०: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता शासकीय विमानाने आगमन होईल. विमानतळावरुन रेशीमबागकडे प्रयाण करतील. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत रेशीमबाग येथे आयोजित ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या कार्यक्रमासाठी दुपारी २ वाजता आगमन होईल. कार्यक्रमानंतर सायंकाळी ४ वाजता विमानतळासाठी प्रयान करतील. सायंकाळी ४.३० वाजता येथून शासकीय विमानाने मुंबईसाठी प्रयाण करतील. 0000

Thursday, 29 August 2024

स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ‘..माझी लाडकी बहीण’ ठरली दिशादायी

नागपूर दि. 29: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने सुरु झालेली महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ही आशु नेवारे सारख्या गरीब व होतकरु मुलींसाठी वरदान ठरली आहे. पदवी शिक्षण घेणाऱ्या आशु नेवारेला या योजनेच्या आर्थिक लाभाने नवी उमेद मिळाली आहे. रामटेक तालुक्यातील पवनी येथील आशु नेवारे हिला स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करीत असताना या योजनेच्या आर्थिक लाभाने बळ मिळाले. घेतलेल्या शिक्षणाचे भविष्यामध्ये फळ मिळावे यासाठी सातत्याने अभ्यासाची दिनचर्या बाळगणाऱ्या आशुला अभ्यासपूरक आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरिता या योजनेचा लाभ झाला. थोडी मरगळ दूर होऊन उंच भरारी घेण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे त्या सांगतात. भविष्यात काही ठोस करुन दाखविण्यासाठी आशु सारख्या असंख्य मुली महाराष्ट्रात सज्ज झाल्या आहेत. 000000

मुलांच्या भविष्याची योजनेची उमेद ‘..लाडकी बहीण योजने’ने दिली

नागपूर दि. 29: नुकतेच कन्यारत्नाचे सुख प्राप्त झालेल्या कल्पना कोडवते यांनी मुलीच्या भविष्याची काळजी म्हणून काही योजना आखल्या आणि त्याला साथ मिळाली ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजने’ची. अशा शब्दांत नागपूर जिल्ह्याच्या कल्पना कोडवते यांनी समाधान व्यक्त केले. रामटेक तालुक्यात पेंच व्याघ्र प्रकल्पा लगतच्या सिल्लारी गावातील कल्पना कोडवते यांच्या बँक खात्यात या योजनेंतर्गत रक्षाबंधनाच्या दिवशी 3000 रुपये जमा झाले. हे पैसे व यापुढेही दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये मुलीचे आरोग्य व संगोपन तसेच भविष्यात शिक्षणासाठी जपून ठेवल्याचे नियोजनपूर्ण विचार कौतुकास्पद ठरतात. मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरू केल्याने त्यांचे मनापासून आभार मानन्याचा कृतज्ञ बाणाही श्रीमती कोडवते यांच्या रुपाने दिसून आला. गरीबांना या योजनेमुळे मिळलेला आधार खूप मोलाचा ठरत आहे. पुढे दर महिन्याला मिळणारा 1500 रुपयांचा निधी हा भविष्य उज्ज्वल करणारा ठरेल. याचीच प्रचिती कल्पना यांच्या माध्यमातून अनुभवायला मिळाली. 0000

यशकथा ‘बहीण’म्हणून आमचा स्वीकार करणारे उदार मनाचे मुख्यमंत्री

नागपूर दि. 29: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना लाडकी बहीण म्हणून स्विकारल्याचा अत्यानंद असल्याची बोलकी प्रतिक्रिया आहे, कामठी भागातील येरडा येथील रहिवासी पूजा सलाम यांची. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चे उद्दिष्ट पूर्ण होत असल्याचे सर्वत्र चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना राखीची ओवाळणी म्हणून ३००० रुपयांचा निधी राखीच्या दिवसीच बँक खात्यात जमा झाल्याचे पूजा सलाम यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आम्हा महिलांना बहीण म्हणून स्वीकारल्याने गोरगरीब महिलांना महिन्याला १५०० रुपयांची मदत या योजनेच्या माध्यमातून होणार आहे, याचे समाधान आहे. त्याकरिता आम्ही सर्व महिला मुख्यमंत्र्यांच्या आभारी असल्याचा कृतज्ञभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. ०००००

Wednesday, 28 August 2024

‘पीएम किसान पोर्टल’वर नोंदणीकृत शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मोबाईल क्रमांक अद्यावत करण्याचे आवाहन

Ø विभागातील ६ हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी दिला चुकीचा मोबाईल क्रमांक नागपूर, दि. 29: अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ व राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ घेण्यासाठी पीएम किसान पोर्टलवर नोंदणीकृत शेतकऱ्यांनी येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत मोबाईल क्रमांक अद्यावत करण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी केले आहे. विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करतेवेळी लाभार्थी शेतकऱ्यांनी चुकीचा किंवा एकच मोबाईल क्रमांक अनेक शेतकऱ्यांच्या नावे नोंदविण्यात आल्याची बाब समोर आली असून ६ हजार ३० शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. यात विभागातील वर्धा जिल्ह्यातील ४९९, नागपूर जिल्ह्यातील ८७२, भंडारा जिल्ह्यातील ५३०, गोंदिया जिल्ह्यातील ९३१, चंद्रपूर जिल्ह्यातील १६२४ आणि गडचिरोली जिल्ह्यातील १५७४ नोंदी आढळल्या आहेत. यामुळे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसंबंधीत कोणतेही एसएमएस प्राप्त होत नाही. या शेतकऱ्यांची यादी संबंधीत गावाच्या कृषी सहायकांकडें उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने दिली आहे. शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांक अद्यावत करण्याकरिता केंद्र शासनाच्या पी. एम. किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नरमध्ये अपडेट मोबाईल क्रमांकाची सुविधा उपलब्ध असून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अद्यावतीकरण करता येणार आहे. "पी.एम.किसान सन्मान निधी योजना" व राज्य शासनाच्या "नमो शेतकरी महासन्मान निधी" या दोन्ही योजनेचा लाभ मिळविण्याकरिता शेतकऱ्यांना पी. एम. किसान पोर्टलवर ई-केवायसी व लँड सीडींग तसेच बँक खात्याला आधार जोडणी करणे अनिवार्य आहे. १ डिसेंबर २०१८ पासून सुरू असलेल्या केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनें’तर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये तर याच योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनामार्फत अतिरिक्त ६००० रुपये जमा करण्यात येतात. वर्षाला जमा होण्याऱ्या एकूण १२००० रुपयांपैकी दर चार महिन्यांच्या अंतराने केंद्र शासनातर्फे २००० रुपये व राज्य शासनाकडून २००० रुपये अशी एकूण ४००० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. 00000

"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने"च्या टप्पा-२ आयोजनाबाबत विभागीय आयुक्तांनी घेतला सर्व विभागांकडून तयारीचा आढावा

Ø नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे दिले निर्देश Ø ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात होणार लाभाचे थेट वाटप Ø जिल्ह्यातील ५० हजार लाभार्थी महिला होणार सहभागी नागपूर, दि. २८ :'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे येत्या ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आयोजनाच्या तयारीबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज विविध प्रशासकीय विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले. येथील रेशीमबाग मैदानावर हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या विशेष कार्यक्रमात ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाचे थेट वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व नागरी भागातील ५० हजार महिला या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या आयोजनाबाबत श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित दुसऱ्या आढावा बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पहिल्या आढावा बैठकीत देण्यात आलेल्या सूचनानुसार अंमलबजावणीबाबत विविध विभागांकडून माहिती देण्यात आली. मुख्य कार्यक्रमस्थळी उचित व्यवस्था व सुरक्षा, या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला लाभार्थ्यांची आसन व्यवस्था, प्रसार माध्यमांची व्यवस्था, स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था आदींसह शासनाच्या विविध विभागांकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत श्रीमती बिदरी यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या. सर्व विभागाने नियोजित जबाबदाऱ्या काटेकोर व वेळेत पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ०००००

Tuesday, 27 August 2024

महिलांना सक्षम बनविणारी ‘..लाडकी बहीण योजना’ कायमस्वरूपी राहावी

नागपूर दि. 28: प्रामाणिक प्रयत्नाने पुढे जाणाऱ्या महिलांना उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून केले आहे, अशा भावना बहुतांश महिला व्यक्त करीत आहेत. याचेच उदाहरण शोभून दिसाव्या अशा नागपुरच्या कामठी परिसरातील येरखेडा येथील नीलिमा शेंदरे यांचा हा स्वानुभव. मनातील इच्छा कधीतरी पूर्ण होतील तरी का! हा भाबळा नकारात्मक आशावाद घेवून जगणाऱ्या माझ्या सारख्या सर्वसामान्य महिलांचा भ्रम या योजनेच्या माध्यमातून तुटला आहे. महिलांना छोट्या- छोट्या क्षेत्रात व्यवसाय करण्याची संधी या योजनेच्या निमित्ताने निर्माण झाली आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्याची काळजी घेण्याकरिता ही मदत उपयुक्त ठरणार आहे. आम्हा बहिणींना २ महिन्यांचा एकूण ३००० रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी राखीच्या पूर्व संध्येलाच भेट दिल्याने खूप आनंदी आहोत. भविष्यातही ही योजना अशीच सुरू राहावी ,ज्यामुळे आम्हाला आधार व आमच्या पंखांना बळ मिळेल अशा, नीलिमा यांच्या प्रांजळ भावना म्हणजे त्यांच्या सारख्या अनेक होतकरू महिलांचा प्रातिनिधिक आवाजच ठरला आहे. ०००००

‘..लाडकी बहीण’च्या माध्यमातून मतिमंद मुलीला मिळाला आधार

नागपूर दि. 28: महिलांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्यांना पूरक पोषण मिळावे हा ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या व्यापक उद्देशापैकी एक महत्वाचा उद्देश सफल होत असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. ध्येयपूर्तीकरिता शासनाने सजगतेने व जलद गतीने योजनेची सूत्रे हाताळली. आणि याचे सुपरिणामही बघायला मिळत आहेत. महिला-मुलींच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत आनंदाश्रू पाहून उद्देश्यपूर्तीच्या दिशेने योजनेची वाटचाल होत असल्याचे आजूबाजूला पदोपदी उदाहरणे दिसून येत आहेत. यात ठळक शोभावे असे नागपूर येथील कामठीच्या पंचफुला पाटील यांचे उदाहरण. काबाळकष्ट करून प्रपंच पुढे घेवून जाताना मतिमंद मुलीची जबाबदारीही त्यांच्यावर आली. यात भर म्हणून स्वतःच्या आरोग्याच्या समस्यांचा ससेमीरा सुटत नसल्याने त्या चिंतीत आहेत. तुलनेने पंचफुला यांचे कमाईचे साधन तुटपुंजे अर्थात भांडे विकून त्या आपला निकराचा जीवन प्रवास करीत आहेत. अशात त्यांना मोलाची साथ मिळाली ती ‘..लाडकी बहीण योजने’ची. स्वतः सोबत आपल्या मुलीची काळजी घेण्याकरिता या दोघींना योजनेतून प्रत्येकीच्या बँक खात्यात 3000 रुपयांचा निधी जमा झाल्याचा आनंद व समाधान अवर्णनीय असल्याचे पंचफुला सांगतात. आपल्या सारख्या असंख्य महिलांच्या जीवनाला एक प्रकारे संजीवनी प्रदान करणारी ही योजना असल्याचे सांगून मतिमंद मुलीच्या संगोपनासही या योजनेमुळे मोठी मदत होणार असल्याचे त्या सांगतात. 0000

विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर सीमेलगत मध्य प्रदेशातील जिल्ह्यांचे पूर्ण सहकार्य

 नागपूर व मध्य प्रदेश सीमेलगत जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक नागपूर, दि.२७: आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या सिमेलगत मध्यप्रदेशमधील जिल्ह्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल व समन्वय राखण्यात येईल,असा विश्वास आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मध्य प्रदेशाच्या सीमा लगत जिल्ह्यांशी समन्वयाद्वारे विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान पार पाडण्याच्या उद्देशाने पेंच अभयारण्याच्या सिल्लारीगेट परिसरातील अमलतस सभागृहात बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.दिलीप पाटील- भुजबळ, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच सावनेर, काटोल आणि रामटेकचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी उपस्थित होते. तसेच मध्य प्रदेशातून जबलपूर झोनचे पोलीस महानिरीक्षक अनिल कुशवाह यांच्यासह सिवनी, छिंदवाडा आणि पांढुर्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. इटनकर यांनी यावेळी सादरीकरण केले. ते म्हणाले, रामटेक विधानसभा मतदारसंघातील ९ गावे, काटोल विधानसभा मतदारसंघातील ११ गावे आणि सावनेर विधानसभा मतदारसंघातील १६ गावांच्या सीमांना मध्यप्रदेशातील सिवनी, छिंदवाडा आणि पांढुर्णा जिल्ह्याच्या सीमा लागल्या आहेत. विधानसभा निवडणूक काळात सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी या सीमावर्ती जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून उचित समन्वय सहकार्य मिळावा असेही ते म्हणाले. त्यांनी जिल्ह्यातील अवैध रेती उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने उभारलेल्या चेक पोस्ट, गोवंश तस्करी रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, बनावट रॉयल्टी व मादक पदार्थांच्या तस्करी संदर्भातील माहितीचेही सादरीकरण केले. हर्ष पोद्दार यांनी फरार आरोपी, अवैध अग्निशस्त्र, विविध गुन्ह्यांमध्ये फरार गुन्हेगार आदी संबंधी सादरीकरण केले व सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस प्रशासनाकडून सहकार्य व समन्वयाची अपेक्षा व्यक्त केली. डॉ.दिलीप पाटील-भुजबळ आणि अनिल कुशवाह यांनी उभय राज्यांच्या पोलीस विभागाकडून आगामी विधानसभा निवडणूक काळात माहितीच्या आदान- प्रदानासह उचित समन्वय राखण्याची ग्वाही देत निवडणूक प्रक्रिया शांततेत व कायदा सुव्यवस्था राखून यशस्वी करण्यात येईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी आभार मानले. ०००००

Monday, 26 August 2024

हा तर औषधउपचार घेण्यासाठी मिळालेला विश्वास! अत्रीबाई हिवनाती यांनी व्यक्त केली कृतज्ञता

नागपूर दि. 25 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेतून शैक्षणिक, आरोग्यासह स्वप्नपूर्तीसाठी योजनेतून मिळालेल्या रकमेचा विनियोग करता येईल, अशा भावना महिला लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. विविध व्याधींनी त्रस्त असल्यामुळे सतत दवाखान्याचा खर्च असतो. त्यासाठी मुलावर अवलंबून रहावे लागते. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या लाभामुळे या पैशाच्या माध्यमातून स्वतःचे उपचार घेता येईल, अशा विश्वास कामठी तालुक्यातील मु. चिचोली पो. पिपला येथील अत्रीबाई हिवनाती यांनी व्यक्त केला आहे. आज आरोग्याचा खर्च खूप वाढला आहे. तसेच यासाठी परावलंबित्व वाढले आहे. मात्र आर्थिक सहाय्य मिळाल्यास महिलांना खूप मदत होऊ शकते, अशा प्रतिक्रिया नागपूर जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे अत्रीबाई ह्या होय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे परावलंबी न राहाता स्वतःचे उपचार घेता येईल, अशा भावना व्यक्त करीत त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून आमच्या खात्यात रक्कम जमा झाली. त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभारी आहे. ही योजना सुरु करुन मुख्यमंत्री साहेबांनी आम्हा सर्व महिलांना खूप आधार दिला असून यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 00000

'..लाडकी बहीण योजने'मुळे छोट्या उद्योगाला बळ

तुटपुंज्या आर्थिक स्त्रोतांमध्ये जीवनाचा गाडा पुढे रेटणाऱ्या महिलांना मोलाचा आधार देणारी योजना म्हणून ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’ आता राज्यभर लौकिक मिळवत आहे. याचीच प्रचिती नागपुरातील सदर छावनी भागाच्या रहिवासी रुहअफजा (40) यांच्या स्वानुभवातून दिसून आली. छोटासा होजियरीचा व्यवसाय त्या दैनंदिन घरकामासह सांभाळतात. या योजनेची माहिती कळताच त्यांनी अर्ज केला. अशात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला बँक खात्यात ३ हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज मोबाईलवर धडकला. स्वातंत्रदिन आणि रक्षाबंधणाचा सर्वत्र उत्साह असताना बँक खात्यात पैसे जमा झाल्याच्या मेसेजने मी ही आनंदीत झाले आणि या योजनेचा लाभ मिळाल्याने हरकुन गेल्याच्या त्यांच्या भावना बोलक्या ठरल्या. महिना संपला की घर खर्चासाठी पतीकडे हात पसरताना नाकर्तेपणाची भावना मनात यायची, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या बहिणीला हक्काचे १५०० रूपये महिन्याला मिळणार असल्याने आत्मसन्मान मिळाला. माझा आनंद गगणात मावेना, त्याने मी गलबलून गेले. आता पतिकडे हात पसरावा लागणार नाही आणि स्वत:च घरखर्चही भागवू शकणार हा आत्मविश्वास आला. होजीयरीच्या छोटया व्यवसायाला पुढे घेवून जाण्याची इच्छाही आपसूकच आली. योजनेच्या लाभामुळे आत्मविश्वासाने भरारी घेण्यास मी सज्ज झाले. माझ्या सारख्या असंख्य महिलांनाही गगण भरारी घेण्याकरिता ही योजना वरदानच ठरेल !, असा विश्वासही रुहअफजा यांनी व्यक्त केला. त्यांच्या चेहऱ्यावर तो ठसठसीतपणे दिसत होता. ०००००००० 000000

Friday, 23 August 2024

१०वी आणि १२वी पुरवणी परिक्षेसाठी पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरु

१०वी आणि १२वी पुरवणी परिक्षेसाठी पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरु • २ सप्टेंबर पर्यंत करता येणार गुणपडताळणी अर्ज नागपूर, दि. २३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुरवणी परीक्षा निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी)करिता पुनर्मुल्यांकनाची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेऊन ५ दिवसांत अर्ज करता येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. जुलै-ऑगस्ट २०२४ दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागात झालेल्या इ.१० वी व इ. १२ वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २३ ऑगस्टला जाहीर झालेला असून पुनर्मूल्यांकनासह, गुणपडताळणी व छायाप्रतीकरिता २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२४ पर्यंत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. श्रेणी/गुणसुधार योजनेतंर्गत नोंदणी फेब्रुवारी-मार्च २०२४ मधील इयत्ता १०वी, १२ वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसुधार योजनेतंर्गत परीक्षेस प्रविष्ट होण्याची प्रक्रिया जुलै-ऑगस्ट २०२४, फेब्रुवारी-मार्च २०२५ व जुलै-ऑगस्ट२०२५ तर जुलै-ऑगस्ट २०२४च्या विद्यार्थ्यांकरिता फेब्रुवारी-मार्च २०२५, जुलै-ऑगस्ट २०२५ व फेब्रुवारी-मार्च २०२६ याप्रमाणे सुविधा उपलब्ध असतील. फेब्रुवारी-मार्च २०२५ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२वी)च्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजेनेचे प्रविष्ट विद्यार्थी व इतर पात्र विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे मंडळामार्फत स्वीकारण्यात येतील. 000000

नागपूर येथे "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने"च्या . टप्पा-२ चा ३१ ऑगस्टला भव्य आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

 जिल्ह्यातील ५० हजार महिला होणार सहभागी  विभागीय आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांकडून घेतला तयारीबाबत आढावा  ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात होणार लाभाचे थेट वाटप नागपूर, दि. २३ : महिला सक्षमीकरणाकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे भव्य आयोजन येत्या 31 ऑगस्ट रोजी येथील रेशीम बाग मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होईल. या विशेष कार्यक्रमात ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाचे थेट वाटप करण्यात येणार आहे. शहरी व नागरी भागातील ५० हजार महिला या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे ,महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,नागपूर सुधार प्रण्यासचे अध्यक्ष संजय मिणा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था आदींसह शासनाच्या विविध विभागांकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत श्रीमती बिदरी यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या.खासकरून त्यांनी पुणे येथे पार पडलेल्या या योजनेच्या शुभारंभ व लाभार्थ्यांना वाटपाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमा प्रमाणेच नागपुरातील कार्यक्रम यशस्वी व नेटका करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. सर्व विभागाने नियोजित जबाबदाऱ्या काटेकोर व वेळेत उत्तमरीत्या पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नुतनीकृत सभागृहाचे उद्घाटन तत्पूर्वी, श्रीमती बिदरी यांच्या हस्ते विभागीय आयुक्तालयातील नुतनीकृत सभागृहाचे फित कापून उद्घाटन झाले. नूतनीकरणानंतरचे या सभागृहातील ही पहिलीच बैठक ठरली. ०००००

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी विभागात २४ लाख लाभार्थी - विजयलक्ष्मी बिदरी

 अर्ज न केलेल्या बहीणींनी ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे  प्राप्त अर्जापैकी ९९.८७ टक्के अर्ज मंजूर  जुलै पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जदारांच्या खात्यात रुपये ३ हजार जमा नागपूर, 23: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी विभागात २४ लाख ५ हजार २६३ लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले असून प्राप्त झालेले अर्जाची तालुका व जिल्हा समितीतर्फे छाणनीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. या योजनेच्या लाभासाठी अद्यापपर्यंत ऑनलाईन अर्ज न करणाऱ्या भगीनींनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला विभागातील बहीणींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या योजनेचया लाभापसून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनातर्फे तालुका व जिल्हा स्तरावर विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधीत विभागांना देण्यात आल्या आहेत. अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया निरंतन सुरु असून अर्ज न केलेल्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या १७ लाख २१ हजार १३६ अर्जांची छाननी करण्यात आली असून त्यापैकी १७ लाख १८ हजार ६६७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विभागात सरासरी ९९.८७ टक्के अर्ज मंजूर झाले असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे ३ हजार रुपये जमा करण्याला सुरुवात झाली आहे. दुसत्या टप्यात विभागात ६ लाख ८४ हजार १२७ अर्ज प्राप्त झाले असून या अर्जांची सुध्दा तालुका स्तरावरील समीतीतर्फे तपासणी करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून आजपर्यंत ३ लाख ९६ हजार ७७९ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या थेट बँक खात्यात अनुदानाचे दोन हप्ते जमा करण्यात आले आहे. अनुदान वाटपाचा राज्यस्तरीय पहिला कार्यक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे दुसरा कार्यक्रम नागपूर येथे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांचया अध्यक्षतेखाली समीती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचया मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य असून जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी विभगात २४ लाख ५ हजार २६३ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले आहे यामध्ये नागपूर जिल्ह्यात ८ लाख ८७ हजार १५, भंडारा जिल्ह्यात २ लाख ६८ हजार ८९, चंद्रपूर जिल्ह्यात ४ लाख १३ हजार ४६४, गडचिरोली जिल्ह्यात २ लाख २६ हजार ३२८, गोंदिया जिल्ह्यात ३ लााख ३४ हजार ३०० तर वर्धा जिल्ह्यात २ लाख ७६ हजार ६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्पयातील ९९.८७ टक्के अर्जावरील प्रक्रीया पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील १ ऑगस्ट पासून प्राप्त् झालेल्या अर्जापैकी ५८ टक्के अर्जांची छाननी पूर्ण होऊन मंजूरीची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली. 000000

Tuesday, 20 August 2024

प्रशिक्षण योजनेत ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 7 हजार 347 उमेदवारांची निवड - विजयलक्ष्मी बिदरी 3 हजार 282 उमेदवार झाले रुजू नागपूर, दि.19 : विविध क्षेत्रात केवळ अनुभव नसल्यामुळे पूर्णवेळ रोजगार मिळत नाही. अशा युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही महत्त्वकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत विभागातील 7 हजार 347 युवकांची निवड करण्यात आली आहे. यापैकी 3 हजार 282 उमेदवार विविध आस्थापनांमध्ये रुजू झाले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी सुरू केलेल्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेत विभागातील 23 हजार 041 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शासकीय व खाजगी क्षेत्रात 25 हजार 857 रिक्तपदे अधिसूचित करण्यात आले आहे. युवकांनी या युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी केले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी 6 महिन्याचा कालावधी असून शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कालावधी 12 वी पास उमेदवारांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवीकाधारकांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येणार आहे. विभागात ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी 7 हजार 347 उमेदवारांची निवड करण्यात आली असून यामध्ये नागपूर जिल्ह्यात 1 हजार 165, वर्धा जिल्ह्यात 996, भंडारा 682, गोंदिया 1 हजार 668, चंद्रपूर 823 तर गडचिरोली जिल्ह्यातील 2 हजार 013 उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज सादर केल्यापैकी आतापर्यंत विभागात 3 हजार 282 उमेदवार विविध शासकीय आस्थापनांमध्ये रुजू झाले आहे. यापैकी सर्वाधिक वर्धा जिल्ह्यात 996, चंद्रपूर 621, गोंदिया 585 गडचिरोली 501, नागपूर 386 तर भंडारा जिल्ह्यातील 183 उमेदवारांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या पदामध्ये 20 हजार 717 शासकीय तर 5 हजार 140 खाजगी क्षेत्रात रिक्त जागांचा समावेश आहे. या रिक्त पदासाठी विभागातील सुशिक्षीत युवकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असेही श्रीमती बिदरी यांनी आवाहन केले आहे. कौशल्य विकास विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in यावर नोकरी सादर हा टॅब ओपन हाईल. यावर त्यानुसार नोंदणी फार्म भरणे आवश्यक आहे. आपली नोंदणी यशस्वी झाल्याबाबतचा संदेश आल्यानंतर नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. नोंदणी विनामुल्य आहे. विविध खाजगी आस्थापनांने आवश्यक असलेल्या मुनष्यबळाची मागणीसुध्दा या पोर्टलवर नोंदवावी. 00000000000

सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण Ø स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित नागपूर,दि.15 : अनेकांच्या बलिदानातून, संघर्षातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी अनेकांनी यातना सहन केल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या आजवरच्या वाटचालीत आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून एक मैलाचा टप्पा गाठला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारत हे ब्रीद घेऊन सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबध्दता ठेवली आहे. प्रगतीचे विविध टप्पे गाठतांना सामान्य माणसाच्या जीवनात परिर्वतन व्हावे यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त आयुक्त कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अतिरीक्त आयुक्त माधवी चवरे-खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील - भुजबळ, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस सहआयुक्त आश्वती दोरजे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाने केंद्र शासनासमवेत विविध उपक्रम, योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला. या प्रयत्नातून महाराष्ट्राची वाटचाल आता ट्रिलीयन डॉलरकडे झेपावली असून संबंध भारतात महाराष्ट्राने यात पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्याने साध्य केलेल्या प्रगतीची अनुभूती आपण सर्व घेत आहोत. हे विकासाचे पर्व आपण पाहात आहोत. येथील समृध्दी महामार्ग असेल, मेगा टेक्टाईल प्रोजेक्ट, मेट्रो आदींसह विविध सिंचन प्रकल्प महत्वाचे आहेत. सुमारे 88 हजार कोटीतून आपण वैनगंगा-नळगंगा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातून विदर्भातील दुष्काळ दूर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गत तीन वर्षात 5 हजार कोटींपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक आणू शकलो याचे समाधान असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाने लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून चांगले निर्णय व उपक्रम हाती घेतले आहेत. लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रतिमहा दीड हजार रुपये आपण देत आहोत. कालपासून याचा प्रतिनिधीक सुरुवात केली आहे. येत्या 17 तारखेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळेल. या एक कोटीमध्ये नागपूर जिल्ह्यातील 5 लाख महिलांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही आपण सुरु केली आहे. सुमारे 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपये असे विद्यावेतन आपण नोंदणीकृत युवकांना देत आहोत. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. मुलींसाठी 500 कोर्सेसच्या फिसची रक्कम शासन देत आहे. पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या घरावर सौर पॅनल बसविले त्यांना 300 युनीट मोफत वीज आपण देत आहोत. ज्यांची वीज 300 युनीटपेक्षा अधिक होत आहे. ती वीज आपले वीज महामंडळ विकत घेईल, असे त्यांनी सांगितले. सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना एक रुपया विमा अंतर्गत 278 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने मेयो, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथील विविध विकास कामांसाठी सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या निधीतून विविध वैद्यकीय सुविधा आपण निर्माण करीत आहोत. केंद्र सरकारकडून मेट्रोसाठी 683 कोटी, नाग नदीसाठी 550 कोटी रुपयांचा निधी आपल्याला मिळाला आहे. जिल्ह्यातील 35 हजार 750 लोकांना आपण प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत मान्यता दिली आहे. ओबीसींसाठी मोदी आवास योजनेत 6 हजार 747 घरांना मंजूरी देऊन यातील 1 हजार 54 घरे पूर्ण केली आहेत. अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी घटक योजनांसाठी आपण 1 हजार 219 कोटी रुपयांच्या निधीची नागपूर जिल्ह्यासाठी तरतूद केली आहे. देशातील अद्ययावत असे क्रिडा संकुल आपण साकारले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासनाला भक्कम करण्यासाठी 272 कोटी रुपये खर्चून नवीन इमारत आपण उभी करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एक वृक्ष मातेच्या नावाने ही चळवळ आता अधिक प्रभावीपणे लोकसहभागातून राबविली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती पदक प्राप्त , विशेष सेवा पदक प्राप्त अधिकारी, अंमलदार, आपले सरकार पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या दाखल्याचा त्वरीत निपटारा करणारे अधिकारी, अग्नीवीर सैन्य भरती मेळाव्यात उत्कृष्ट कार्य करणार व महाआवास योजना अभियान 2023-24 मध्ये योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक यांची आस्थेवाईक चौकशी केली.

Tuesday, 13 August 2024

तृतीयपंथीयांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध विभागांनी पुढाकार घ्यावा -विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर,दि. १३ : नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाच्या विविध विभागांनी तृतीयपंथीयांना शासनाच्या योजना, सेवा-सुविधांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यांमधून तृतीयपंथींय व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचे नाव विभागातील तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळासाठी सूचविण्याचे निर्देश दिले. श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातील तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, नियोजन उपायुक्त धनंजय सुटे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, विधी व न्याय, आरोग्य, आदिवासी, शिक्षण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. तृतीयपंथीयांसाठी जिल्हानिहाय राबविण्यात येत असलेल्या योजना, उपक्रम व देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती या बैठकीत देण्यात आली. विभागातील तृतीयपंथीयांना ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, आरोग्य तपासणी आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने तयार केलेल्या तृतीयपंथीयांसाठीच्या धोरणानुसार त्यांच्या सामाजिक समस्या, मानसिक आरोग्य, सामाजिक -आर्थिक उन्नतीच्या योजना, शिक्षण व रोजगार, आरोग्य, पुनर्वसन, मानवी हक्क अबाधित राखण्यास्तव विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील शासकीय विभागांनी पुढाकार घेण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी दिले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या विभागीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर तृतीयपंथींय व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीची नावे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत विभागात १८ गुन्हे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली ‘विभागस्तरावरील जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती’ची बैठकही झाली. ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३’ अंतर्गत, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण १८ गुन्हांची नोंद झाली. यातील ८ गुन्ह्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत तर उर्वरित १० प्रकरणांमध्ये पोलीस तपास सुरु असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग यांनी दिली. दरम्यान, जादुटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यशाळा व शिबीरांचे आयोजन करण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या. 0000000

विभागीय आयुक्तांचा आजीबाईंना दिलासा

Ø मुलांनी घरच हिसकावून घेतले आता कुठे जाणार ? आजीबाईंचा करुण सवाल Ø विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी नागपूर,दि.13 : मुलाने गाफिल ठेवत अंगठ्याचे ठसे घेवून घर व दुकान स्वत:च्या नावावर करुन घेतले. आता डोक्यावरचे छप्पर गेले, रहायला जागा नाही, कुठे आसरा घेणार ! अशा करुण भावना जरीपटका भागातील भोजवंताबाई शेंडे (८०) यांनी विभागीय आयुक्तांपुढे मांडल्या. या प्रकरणातील पोलीस चौकशीची सद्यस्थितीची माहिती घेवून आणि संबंधीत प्राधिकरणास अर्ज करण्यास सांगत तत्काळ मदतीसाठी विभागीय आयुक्तांनी या आजीबाईंना सोबत कर्मचारी देत उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविले. दरम्यान, विभागीय लोकशाही दिनात आज तीन तक्रारी प्राप्त झाल्या. या आजीबाईंचा प्रश्न विभागीय लोकशाही दिनाशी संबंधीत नव्हता तरीही तो समजून घेवून त्यावर उचित तोडगा काढून दिलासा देण्यात आला. संबंधित पोलीस उपायुक्तांकडून माहिती घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जेष्ठ नागरिक निर्वाह अधिनियमांतर्गत आजीबाईंना मदत देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी नागपूर शहराच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना थेट दूरध्वनीहून सूचना केल्या. सर्व सामान्यांना प्रशासनाकडून दिल्या जात असलेल्या सकारात्मक प्रतिसादाचा हा अनुभव घेताना आजीबाईंच्या डोळयात समाधान व चेहऱ्यावर प्रसन्नता दिसून आली. असा आहे अधिनियम राज्य शासनाने माता-पिता व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ लागू केला आहे. त्यामध्ये माता-पित्यांच्या व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण यासाठी हमी दिली आहे. या कायद्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाचे अथवा माता-पिता यांना मूलभूत गरज व सुविधा त्यांची मुले देत नसल्यास अगदी त्यांना आई वडिलांकडून प्राप्त मालमत्तेचे हस्तांतरण सुद्धा रद्द करण्यासंदर्भात या कायद्यात तरतूद आहे. तसेच मासिक निर्वाह भत्ता प्राप्त करण्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. तत्पूर्वी, भंडारा जिल्ह्यातील कोटांगले येथील नागरिकाची जुनी तक्रार आणि नागपूर महानगरपालिकेसंबंधीत आलेल्या दोन तक्रारी आजच्या विभागीय लोकशाही दिनात समोर आल्या. पहिल्या तक्रारीत प्रशासनाकडून मुद्देनिहाय उत्तर मागविण्यात आले. या तक्रारीशी संबंधीत तलाठी व नायब तहसिलदार उपस्थित होते तर तक्रारदार अनुपस्थित होते. नागपूर मनपा संदर्भातील तक्रारीबाबत विभागीय आयुक्तांनी मनपात तक्रारदाराची एक आठवड्याच्या आत निराकरण करण्याचे आदेश दिले. मनपाकडून संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर तक्रारदार अनुपस्थित होते. ००००

Friday, 9 August 2024

मतदार नोंदणी गतीने करा - विभागीय आयुक्त

 नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघाचा आढावा नागपूर, दि.12 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी केली जात आहे. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी विविध राजकीय पक्षांनी मतदार साक्षरता व मतदान प्रमाण वाढावे यासाठी उचित समन्वय साधून कामास गती आणावी, असे आवाहन नागपूर विभाग मतदार निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. छायाचित्रासहित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 (अहर्ता दिनांक 1 जुलै 2024 वर आधारित) च्या अनुषंगाने आयोजित प्रथम भेट अंतर्गत या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महीरे, सर्व विधासनभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉ. इटनकर यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदार नोंदणीबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रनिहाय सुरु असलेली मतदार नोंदणीची सद्यस्थिती, जिल्ह्यात नव्याने तयार झालेले 136 मतदार केंद्र, प्रस्तावित विलीन होणारी मतदान केंद्र तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान बैठका आदींबाबतही त्यांनी माहिती दिली. श्रीमती बिदरी यांनी मतदार नोंदणीच्या कामामध्ये राजकीय पक्षांना येत असलेल्या अडचणीं जाणून घेतल्या व त्या दूर करण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिले. राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी सहाय्यकाची नेमणूक करणे व प्रशासनाच्या समन्वयाने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यास सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदार संघांमध्ये कमी मतदान झाले आहे तिथे मतदार नोंदणी व मतदान जन-जागृती करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. दरम्यान, कोणताही पात्र मतदार मतदान यादीत नाव नोंदवायचा शिल्लक राहू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. भारत निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या सुधारित कार्यक्रमानुसार 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 6 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या आहेत. यानुसार पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणी यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करता येणार आहे. प्राप्त दावे व हरकतींचे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत निराकरण करण्यात येणार आहे 00000

Wednesday, 7 August 2024

‘सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रम’

· मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन · अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर नागपूर, दि.7: ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ पुणे (सारथी) यांच्यामार्फत ‘सरदार सूर्याजी काकडे सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रमासाठी’ ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत मराठा-कुणबी लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा लक्षित गटाच्या विद्यार्थ्यांना ‘सरदार सूर्याजी काकडे सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रम’ २०२४-२५ प्रशिक्षण तुकडीकरिता अर्ज करता येणार आहे. ५० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ महिने कालावधीसाठी अनिवासी स्वरुपाचे हे नियमित प्रशिक्षण राहणार आहे. या उपक्रमा संदर्भात विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून लक्षित गटातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन, नागपूर सारथीचे उप व्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे. 00000

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निर्लेखित साहित्याची आज विक्री

नागपूर, ०७ : सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयांतर्गत कार्यरत नागपूर विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निर्लेखित साहित्याची विक्री प्रक्रिया ८ ऑगस्ट २०२४ रोजी लिलाव पद्धतीने www.eauction.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. लिलावासंबंधीचे संपूर्ण वेळापत्रक, अटी-शर्ती आदी माहिती याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र लिलावधारकांना या प्रक्रियेत भाग घेण्याचे आवाहन,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहसंचालक के.एम. मोटघरे यांनी केले आहे. 0000000

Tuesday, 6 August 2024

‘राष्ट्रीय हातमाग’ दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते राज्यस्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण

नागपूर, दि. ०६: सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर स्थित वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्यावतीने ७ ऑगस्ट या ‘राष्ट्रीय हातमाग’ दिनाच्या औचित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट २०२४ रोजी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस व रेशीमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा यांनी दिली आहे. पारंपरिक हातमाग विणकर कामगारांना प्रोत्साहन देणे आणि हातमाग क्षेत्राचे सामाजिक आर्थिक महत्व अधोरेखित करण्याच्या उद्दिष्टाने ७ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने वस्त्रोद्योग आयुक्तालयातर्फे ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ऑगस्ट रोजी एमकेएसएस स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी देवनगर यांच्या सहकार्याने १० वा राष्ट्रीय हातमाग दिवस आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याहस्ते तथा वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा आणि रेशीम संचालनालयाच्या संचालक वसुमना पंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर पारंपरिक वस्त्रांचा फॅशन शो, प्रश्नमंजुषा, ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८’ चे सादरीकरण आदी कार्यक्रम होणार आहेत. विभागीय आयुक्तालयाच्या प्रांगणात हातमाग प्रदर्शन सामान्य जनतेपर्यंत पारंपरिक वस्त्रांची माहिती पोहचविणे व जनजागृती करण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात एक दिवसीय हातमाग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याहस्ते होणार आहे. राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेचे बक्षीस वितरण सदर परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे ९ ऑगस्ट रोजी १० व्या ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ कार्यक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस व रेशीमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात रेशीम संचालनालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. पंडा यांनी दिली. 00000

विभागात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करा - विभागीय आयुक्त

 जास्तीत-जास्त महिलांनी अर्ज करावे  विभागात १३ लाख अर्ज मंजूर  नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज मंजूर नागपूर, दि. ०६: राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' या महत्वांकाक्षी योजनेंतर्गत नागपूर विभागात १०० टक्के उदि्दष्ट पूर्ण करण्याचे तसेच ज्या पात्र महिलांनी अजूनपर्यंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज केला नसेल अशा सर्व महिलांना अर्ज करण्याचे आवाहन, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. विभागात आतापर्यंत १३ लाख ४ हजार ७८५ अर्ज मंजूर झाले आहेत. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये ६ ऑगस्ट २०२४ पर्यंत १३ लाख ४ हजार ७८५ अर्ज मंजूर झाले असून सर्वाधिक ३ लाख ४८ हजार २३४ अर्ज नागपूर जिल्ह्यातून मंजूर झाले आहेत. विभागात या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने कार्य करण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच पात्र महिलांनी या योजनेच्या लाभासाठी उपलब्धतेनुसार ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. दरम्यान, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागातील मदतकेंद्रांवर आजपर्यंत १७ लाख १७ हजार ८०२ अर्ज प्राप्त झाले असून यापैकी एकूण १३ लाख ४० हजार ७८५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर अर्जांमध्ये नागपुरचे सार्वधिक ३ लाख ४८ हजार २३४, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २ लाख ३७ हजार ५१३, गडचिरोली जिल्ह्यामध्ये १ लाख ४७ हजार ७७८, वर्धा जिल्ह्यामध्ये १ लाख ८६ हजार १९९, भंडारा जिल्ह्यामध्ये १ लाख ८ हजार ३०६ हजार ७१९ आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये २ लाख ७६ हजार ७५५ अर्जांचा समावेश आहे. 00000

वैद्यकीय प्रतिपुर्ती विमाछत्र योजनेच्या नुतनीकरणासाठी 30 दिवसांत विमा हप्ता भरण्याचे कोषागाराचे आवाहन

 नव्या सदस्यांना 90 दिवसांचा प्रतिक्षा कालावधी नागपूर,दि 6 : वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचे ३० दिवसांत नुतनीकरण करणे आवश्यक असून या योजनेत नव्याने समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्यांना ९० दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन, प्रभारी वरिष्ठ कोषागार अधिकारी मोनाली भोयर यांनी केले आहे. शासकीय सेवेच्या अंतिम वर्षात पदार्पित अधिकारी-कर्मचारी तसेच ३० जून २०११ नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारक व कुटुंबांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना सुरू आहे. या योजनेच्या वर्ष २०२४-२५च्या नुतनीकरणास २५ जुलै २०२४ ते २४ जुलै २०२५ या कालावधीसाठी मान्यता देण्यात आली आहे. १ जुलै २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी, अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच गतवर्षी समाविष्ट असलेल्या सर्व सदस्यांना या योजनेमध्ये स्वेच्छेने सहभागी होता येणार आहे. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता १८-३५ वर्ष, ३६-४५ वर्ष, ४६-५८ वर्ष व सेवानिवृत्त या वयोगटानुसार विमा हप्त्याचे दर ठरविण्यात आले आहेत. योजनेच्या नुतनीकरणासाठी संबंधीत विमाधारकास कंपनीद्वारे लिंक मोबाईलवर एसएमएस अथवा ई-मेलद्वारे प्राप्त होणार आहे. विमा हप्त्याचे प्रदान लिंक द्वारे भुगतान करणे बंधनकारक आहे. संबंधीत विमा कंपनीला पेमेंट एनईएफटी/आरटीजीएस/ युपीआय अथवा क्रेडीट कार्डद्वारे प्रदान करता येणार असून डेबीट कार्डद्वारे पेमेंट प्रदान करता येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये विमा धारकांना अडचण आल्यास द न्यू इंडिया ॲश्युरन्स कं. लि. यांचेशी ८६५२४३५९३४/०२२-२६५९००७० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच या योजनेबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, संकेतांक क्र.२०२४०७२३१०४१११९६०५ द्वारे उपलब्ध आहे. 00000

Monday, 5 August 2024

महसूल पंधरावडा निमित्त ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालयासाठी’ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सरसावले हात

▪जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी घेतला सहभाग नागपूर, दि. 04: राज्यात दि. 1 ते 15 ऑगस्टपर्यंत सर्वत्र साजरा केल्या जाणाऱ्या महसूल पंधरवाडा निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्वच्छता उपक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री पियुष चिवंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, दिपमाला चवरे, संजय गिरी, मयुर ठेकेदार, रोहित ठाकरे, चंद्रकांत दुधपचारे व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये येथेही ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ उपमक्रम राबविण्यात आला. ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राबविण्यात आला. शासनाने घोषीत केलेल्या विविध महत्त्वाकांक्षी योजना या पंधरवड्यात जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या मनातील शंका दूर केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना अशा विविध योजनांची माहिती व लाभ सर्वसामान्य जनेतेपर्यंत पोहोचविला जात आहे. 1 ते 15 ऑगस्ट असणाऱ्या महसूल सप्ताहात 1 ऑगस्टला महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्याकडून अर्ज भरुन घेण्यात आले. 2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन चित्रफित व छायाचित्र तसेच सादरीकरण करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे सादरीकरण करण्यात आले. 4 ऑगस्टला स्वच्छ व सुदर माझे कार्यालय अंतर्गत विशेष मोहिम राबवून जिल्हा, तालुका, मंडळ व ग्रामस्तरावर कार्यालय व परिसराची साफसफाई करण्यात आली. सोबतच कार्यालय अभिलेख व दस्तऐवजांचे वर्गीकरण व्यवस्थापन निंदणीकरण व महत्वाच्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग व संगणीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. पुढील कालावधीत म्हणजेच 5 ऑगस्टला ‘कृषी मार्गदर्शन कार्यक्रम’ होणार असून 6 ऑगस्टला ‘शेती, पाऊस आणि दाखले’ याबाबत सादरीकरण होणार आहे. 7 ऑगस्टला ‘युवा संवाद कार्यक्रम’ होणार असून 8 ऑगस्टला ‘महसूल - जनसंवाद कार्यक्रम’ तर 9 ऑगस्टला ‘महसूल ई-प्रणाली कार्यक्रम’ होणार आहे. 10 ऑगस्टला जिल्हा सैनिक कल्याण विभागाचा ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. 11 ऑगस्टला ‘आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमाचे’ आयोजन होणार आहे. 12 ऑगस्टला समाज कल्याण विभागाचा ‘एक हात मदतीचा - दिव्यांगांच्या कल्याणाचा’ कार्यक्रम होणार असून 13 ऑगस्टला महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ‘संवाद व प्रशिक्षण’ होणार आहे. 14 ऑगस्टला ‘महसूल पंधरवाडा वार्तालाप’ कार्यक्रमाचे आयोजन होणार असून 15 ऑगस्टला महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संवाद मध्ये ‘उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह’ची सांगता होणार आहे. 00000

उड्डाणपुलामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

म्हाळगीनगर चौक व मानेवाडा चौक उड्डाणपुल बांधकामाचे भूमिपूजन नागपूर, दि. 3- मानेवाडा चौक, म्हाळगीनगर येथील उड्डाणपुलामुळे नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे. उड्डाणपुलामुळे रिंगरोड आता अधिक परिपूर्ण होईल. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते म्हाळगीनगर चौक व मानेवाडा चौक उड्डाणपुल बांधकामाच्या भूमिपूजन समारंभाचे उदयनगर चौक, रिंगरोड येथे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. गत दहा वर्षात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरात चांगले रस्ते, उड्डाणपूल निर्मितीतून जागतिक पातळीवरचा बहुमान नागपूरला दिला. चांगल्या रस्त्यांबरोबरच आरोग्य सुविधांवरही लक्ष देण्यात आले आहे. नागपुरातील सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपये निधी आपण दिला आहे. यातून वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा आपण नव्याने उपलब्ध करून देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, गेल्या अनेक काळापासून या भागात वाहतुकीची समस्या होती. उड्डाणपुलामुळे वाहतुकीची ही समस्या सुटेल. अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची उड्डाणपुलाची मागणी होती. आता उड्डाणपूलाचे भूमिपूजन झाल्यावर लवकरच हा उड्डाणपूल पूर्णत्वास येणार आहे. या भागातील दळणवळणाची सुविधा या माध्यमातून सुकर होणार असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला आमदार मोहन मते यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ***********

नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ साकारू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

६८४ कोटी रुपयांच्या निधीतून नागपुरात साकारणार अत्याधुनिक स्पोर्ट्स हब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली भूमीपूजन समारंभ संपन्न नागपूर दि. 3 – नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू विदर्भातून घडावेत यासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडासुविधा खेळाडूंना मिळाल्या पाहिजेत. यासाठी 684 कोटी रुपये निधी आपण उपलब्ध करून दिला असून नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ आपण लवकर साकारू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मानकापूर परिसरातील क्रीडा केंद्राच्या बांधकामाचे कोनशीला अनावरण आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आ. टेकचंद सावरकर, आ. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, मनपा आयुक्त अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडापटू ओजस देवतळे व मान्यवर उपस्थित होते. बालेवाडीसारख्या क्रीडा सुविधा व प्रशिक्षण नागपुरात मिळव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आता या क्रीडा केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक क्रीडासुविधा व प्रशिक्षण आपल्याला देता येईल. विदर्भातील खेळाडूंना त्यांच्या आवडत्या खेळामध्ये रुची वाढावी, त्यांच्या मनातील आधुनिक दालने इथे व्हावीत अशी आमची भूमिका आहे. करायचे तर वर्डक्लास हवे हा आम्ही आग्रह ठेवला असून सर्व प्रकारच्या सुविधा व प्रशिक्षण आम्ही या नवीन क्रीडा केंद्राच्या माध्यमातून देऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आधुनिक स्पोर्ट्स सुविधेसाठी नवा आयाम केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिला. नागपूरचे, विदर्भातील घडणारे खेळाडू आपल्या देशाचे नाव पुढे नेण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, स्वप्नवत वाटेल असे हे केंद्र असणार असून नागपुरसाठी ऐतिहासिक दिवस आहे. खेळातून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडते, तसा विकास होतो असे ते म्हणाले. या संपूर्ण क्रीडा केंद्राची जागा लक्षात घेता मोठ्या प्रमाणात रूफटॉपवर सौर पॅनलद्वारे ऊर्जा निर्मिती याठिकाणी आपल्याला करता येईल. शिवाय परिसरात झाडांच्या लागवडीतून हा परिसर अधिक निसर्गपूरक आपल्याला करता येईल असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, क्रीडा संकुलात नयन सरडे या खेळाडूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या. या खेळाडूची पेरू देशातील लिमा येथे होणाऱ्या वर्ल्ड ज्युनियर ऍथलिटिक्स स्पर्धासाठी निवड झाली. असे असेल क्रीडा केंद्र ४५० बेडेड (मुला-मुलींसाठी) होस्टेल सुविधा, अद्ययावत जिमनॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, संकुलात येणाऱ्या खेळाडू व नागरिकांसाठी अल्पोपहार व भोजन व्यवस्थेसाठी कॅफेटेरीया सुविधा, सर्व सुविधांसाठी आऊटडोअर व इनडोअर लाईटिंग सिस्टिम, सर्व क्रीडा सुविधांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हारवेस्टिंग, ग्रीन बिल्डींग रिक्वारमेंट फॅसिलीटी, सिवेज ट्रीटमेंट प्लान, लॅन्डस्केपींग इत्यादी सुविधा निर्माण करून देण्यात येत आहेत. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे, नवोदित खेळाडू व पालकांना क्रीडा क्षेत्राबाबत सामुपदेशन व मार्गदर्शन सुविधा, क्रीडापटू घडवण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी व सुविधा उपलब्ध होतील. पुढील 3 वर्षात हे केंद्र खेळाडूंसाठी उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. ***

Friday, 2 August 2024

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कार्यरत -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला केंद्रित धोरण आखले ; तरुणांच्या हाताला काम उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण आशा सेविकांना मोबाईल तर युवकांना नियुक्तीपत्र प्रदान नागपूर, दि.2: राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. सर्व समाज घटकांच्या विकासासाठी राज्यशासन कार्यरत असून निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करत जनहिताचे निर्णय गतीने घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आभासी पद्धतीने जिल्ह्यातील तीन नवनिर्मित आरोग्य केंद्रांच्या इमारती व निवासस्थानांचे लोकार्पण झाले. तसेच ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’तील लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रे आणि आशा सेविकांना त्यांच्या हस्ते अँड्रॉईड मोबाईल वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, परिणय फुके, अनिल देशमुख, अभिजीत वंजारी, टेकचंद सावरकर, सुधाकर आडबाले, प्रवीण दटके, कृपाल तुमाने, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, माता व बालमृत्यू तसेच कुपोषण रोखण्यासाठी आशा सेविका मोलाचे योगदान देत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारीही त्या योग्यरित्या पार पाडत आहेत. त्यांच्या कामामध्ये सुकरता यावी आणि त्यांना विविध नोंदी घेता याव्या, माहितीचे संकलन करता यावे यासाठी जिल्हा खनिज निधीतून त्यांना मोबाईल वितरित करण्यात आले आहे. त्यांच्या मागणीनुसार येत्या काळात या मोबाईलसाठी जिल्हा खनिज निधीतून वार्षिक रिचार्जसाठी निधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आशा सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. या महिन्यापासूनच आशा सेविकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले. यासोबतच आशा सेविकांना 10 लाखांपर्यंतचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले . राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले आहे. या अंतर्गत ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अडीच कोटी महिलांना दर महिन्याला 1500/- रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्यात मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत देण्यात येत आहे. नुकतेच राज्य शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासकीय महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षणासह खाजगी महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये 507 अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून एसटी बसच्या तिकिटांमध्ये महिलांना 50% सुट देण्याचा निर्णय घेतला व त्याची प्रभावी अंमलबजावणीही होत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन सिलेंडर मोफत पुनर्भरण करुन देण्याची महत्वाकांक्षी योजना आणली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे राज्यातील 10 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिन्याला दहा हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीनंतर त्यांना प्रशिक्षण घेत असलेल्या कंपनी किंवा आस्थापनेमध्ये नोकरी मिळू शकेल. याशिवाय शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांतर्गत त्यांना स्वयंरोजगारासाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. गोर-गरीब जनतेला उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री आरोग्य कक्षाद्वारे गोरगरिबांना देण्यात येणाऱ्या सोयी -सुविधांविषयी त्यांनी माहिती दिली. महात्मा फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्वच नागरिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत करण्याची सोय करुन देण्यात आली आहे. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आभासी पद्धतीने काटोल तालुक्यातील झिल्पा आणि भोरगड तसेच पारशिवनी तालुक्यातील घाटपेंढरी येथील नवनिर्मित आरोग्य केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी पाच उमेदवारांना प्रातिनिधिकरित्या नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. प्रातिनिधिक स्वरुपात जिल्ह्यातील 130 आशा सेविकांना अँड्रॉईड मोबाईल वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी प्रास्ताविक केले, रेणुका देशकर यांनी सुत्रसंचालन तर जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी आभार मानले. 00000000

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी विभागात १६ लक्ष ४२ हजार १४३ अर्ज


 

Ø  तालुका समितीकडुन अर्जांची छाननी सुरु

     नागपूर दि.1:  मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नागपूर विभागात असून १६ लक्ष ४२ हजार १४३ अर्ज प्राप्त झाले आहेत. तालुकास्तरावर अर्जाची छाननी सुरु झाली असून आजपर्यंत १ लाख २ हजार ३८५ अर्जांना  तालुका समितीने मान्य करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.  

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी विभागात नारी शक्ती पोर्टलवर १६ लाख ४२ हजार १४३ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची तपासणी तालुका स्तरीय समितीतर्फे सुरु आहेत. तालुकास्तरीय समितीने १ लाखापेक्षा जास्त अर्ज स्विकृत केले असून १४ हजार ५०९ अर्ज अमान्य ठरविले आहे. जिल्हानिहाय नारी शक्ती ॲपवर प्राप्त झालेलया अर्जामध्ये भंडार जिल्हा २ लाख २हजार ३१८, चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ६७ हजार ७८९,गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ४७ हजार २३, गोंदिया जिल्ह्यात २ लाख ७८ हजार ६०४, नागपूर जिल्ह्यात ५ लाख ५२ हजार ९४३, वर्धा जिल्ह्यात १ लाख ९३ हजार ४६६ अर्ज प्राप्त झाले आहेत.

प्राप्त झालेल्या अर्जांची तालुकास्तरीय समिती कडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. या समितीमध्ये १० सदस्य असून यामध्ये ३ अशासकीय सदस्‍य आहेत. या समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसिलदार राहणार आहेत. या समितीकडे योजनेची देखरेख व सनियंत्रण करणे योजनेचा नियमित आढावा घेणे , योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही त्यासोबत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी, तपासणी व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुका समिीतीनंतर संबंधीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय समिती असून समितीच्या सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी राहणार आहेत.

0000

 

२७ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार


Ø  विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

     नागपूर दि.1: मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार 20 ऑगष्ट ऐवजी 27 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

सुधारित कायक्रमानुसार 2 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या आहेत. यानुसार पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणी यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे व जास्तीत-जास्त मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन मतदार यादी निरिक्षक तथा‍ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. प्राप्त दावे व हरकतींचे 26 ऑगष्ट 2024 पर्यंत निराकरण करण्यात येणार आहे.

00000

सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी बाबत अनुपालन करण्याचे आवाहन


 

नागपूर,दि. 31 : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी भविष्य निर्वाह निधीबाबत नोंद न झालेले क्रेडीट व अग्रीमाचे समायोजन करण्याचे आवाहन प्रधान महालेखाकार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्य शासनाचे वर्ग-4 चे कर्मचारी वगळता प्रधान महालेखाकार (ले. व ह.)-2  कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीमधील लेखे ठेवले जातात. अशा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह लेख्यांचे वर्ष 2023-24 करिता वार्षिक विवरण या कार्यालयाच्या https://smswebservicesagaemaharashtra२ .cag.gov.in/ords/e_portal/r/epensionportal/login संकेतस्थळावर तसेच राज्य शासनाच्या सेवार्थ पोर्टल https://sevaarth.mahakosh.gov.in वर  अपलोड करण्यात आले आहे. कर्मचारी आपले वार्षिक विवरण व मार्गदर्शीका या संकेतस्थळ व पोर्टलवर पाहु शकतात.

प्रधान महालेखाकार कार्यालयामधून कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात भविष्य निर्वाह निधी लेख्यामध्ये जमा अभिदान तसेच त्यांना दिलेली अग्रीम राशी, भविष्य निर्वाह निधीच्या अंतिम आहारणाच्या आवेदनाची प्राप्ती व प्राधिकृत होण्याबाबतचा मोबाईल संदेश प्राप्त होतो. त्यासाठी  राज्य शासनाच्या 17 मे 2019 च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना प्रधान महालेखाकार कार्यालयात मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केला नसेल त्यांना fm.mh२.ae@cag.gov.in या ई-मेलवर किंवा  पत्राद्वारे संपूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक, व सेवार्थ आयडीसह पाठविण्याचे आवाहन या कार्यालयाने केले आहे.

भविष्य निर्वाह निधी विविरणपत्र तसेच सेवार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे नाव व जन्मतारीख तपासून घेण्याचे व त्यात तफावत आढळ्यास सेवार्थ प्रणालीत सुधारित करुन आहरण व संवितरण अधिकाऱ्याद्वारे या कार्यालयास दुरुस्तीसह gpfpakrarngp@gmail.com वर पाठवावा असेही सांगण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या मासिक अभिदानाची राशी अथवा घेतलेल्या अग्रिम भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या  माध्यामातून कोषागाराकडे पाठविण्याचेही सांगण्यात आले आहे.

00000