Tuesday, 30 June 2026

विशेष वृत्त: नागपूर विभागात शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात रासायनिक खतांची उपलब्धता

कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकानिहाय ऑनलाईन माहिती जाहीर नागपूर, दि. ३० : खरीपाच्या चालु हंगामात शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात रासायनिक खतांची उपलब्धता राहील, या दृष्टीने कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने आपल्या संकेतस्थळावर रासायनिक खतांच्या उपलब्धतेची अद्ययावत जिल्हा, तालुका आणि केंद्रनिहाय आकडेवारी उपलब्ध केली आहे. नागपूर विभागात शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात खतांचे साठे उपलब्ध आहेत. अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सोबतच विविध योजना आणि उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न कृषी विभागामार्फत होत आहेत. खरीपाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पेरण्यांसाठी शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत अडचण येऊ नये, यासाठी कृषी विभागाने यासंबंधीची ऑनलाईन माहिती उपलब्ध केली आहे. प्रत्येक जिल्हा, तालुकानिहाय खतांच्या उपलब्धतेची माहिती त्यावर उपलब्ध असून कृषी सेवा केंद्रांचे संपर्क क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत माहिती देताना नागपूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी समाधान धुळधुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध आहेत. काही प्रमाणात डीएपीची अडचण आहे. ती दूर करण्यासाठी पर्यायी खतांची उपलब्धता वाढविण्यात आली आहे तसेच त्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात डीएपी, एमओपी, एनपीकेएस, एसएसपी आणि युरियाच्या १२ लाख ६० हजार ३०५ बॅग उपलब्ध आहेत. सुमारे ३३२५ कृषी सेवा केंद्रांची माहितीही विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. विभागातील इतरही जिल्ह्यांची माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी सुमारे २० हजार ४६८ मेट्रिक टन विविध रासायनिक खतांचा साठा उपलब्ध (सुमारे १ हजार ९०० केंद्र) असल्याची माहिती देण्यात आली आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानुसार जिल्ह्यासाठी खतांच्या १ लाख १ हजार २५७ बॅग उपलब्ध आहेत. विभागाने त्यासाठी २८५ कृषी सेवा केंद्रांची माहितीही उपलब्ध करुन दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी विविध रासायनिक खतांच्या ८ लाख ९ हजार ६१३ बॅग उपलब्ध आहेत. कृषी विभागाने जिल्ह्यातील २३९० कृषी केंद्रांची माहितीही दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध रासायनिक खतांच्या २ लाख ५२ हजार २७४ बॅग उपलब्ध असल्याची आणि त्यासाठी ९५७ कृषी सेवा केंद्रांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. तर वर्धा जिल्ह्यात विविध रासायनिक खतांच्या ६ लाख ८२ हजार ७४० बॅग उपलब्ध असून २३७४ कृषी सेवा केंद्रांची माहिती जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खतांच्या उपलब्धतेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी थेट कृषी सेवा केंद्रांशीही संपर्क साधता येणार आहे. यासंदर्भात अडचणी असल्यास स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 0000

No comments:

Post a Comment