Wednesday, 3 September 2025

विशेष लेख - हातमाग व विणकारांच्या विकासासाठी शासनाचे प्रयत्न

 


 

            राज्यात परंपरागत व्यवसाय व कलांच्या विकासासाठी व संवर्धनासाठी राज्य शासन संवेदनशीलपणे कार्य करीत आहे. वस्त्रोद्योग व यात कार्यरत सर्व हातमाग व विणकरांच्या विकासालाही शासनाने प्राधान्य दिले आहे. वस्त्रोद्योग विभागाद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून कापड स्पर्धा व विविध प्रकारे अर्थ सहाय्यही करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर स्थित आयुक्तालय यात अग्रेसर ठरले आहे.

वस्त्रोद्योग आयुक्तालयाद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून हातमाग क्षेत्राचा विकास साधण्यात येत आहे. केंद्र पुरस्कृत सर्वसमावेशक हातमाग विकास योजना ही यातील प्रमुख असून या योजनेमध्ये आतापर्यंत बऱ्याच योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा एक भाग म्हणून 30 मार्च 2017 पासून राज्यात पैठण, येवला, मोहाडी, पाचगांव व सोलापूर या पाच ठिकाणी ब्लॉक लेव्हल हॅण्डलूम क्लस्टर मंजूर करण्यात आले. या क्लस्टरद्वारे राज्यातील 540 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच 84 लाभार्थ्यांना लाईटींग युनिट तर 59 लाभार्थ्यांना वर्कशेड देण्यात आले.

केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्यामध्ये स्मॉल क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेखाली 5 क्लस्टर मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 4 विदर्भातील असून नागपूर जिल्ह्यातील 2 क्लस्टरचा यात समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात तांडापेठ येथे 1 कोटी 8 लाख 84 हजार किंमतीचे क्लस्टर मंजूर झाले असून या अंतर्गत 120 लाभार्थी येतात. नागपूर जिल्ह्यातीलच धापेवाडा येथे 1 कोटी 24 लाख 94 हजार किंमतीचे क्लस्टर मंजूर झाले आहे व यातंर्गत 93 लाभार्थी येतात. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे 1 कोटी 25 लाख 34 हजार किंमतीचे क्लस्टर मंजूर झाले असून 132 लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे 1 कोटी 16 लाख 29 हजार किंमतीचे क्लस्टर मंजूर होवून त्याचा 108 लाभार्थ्यांना लाभ होणार आहे.  नाशिक जिल्ह्यातील नागडे येथे 75 लाख 21 हजारांचे क्लस्टर मंजूर होवून 183 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.

राज्यात 3 हजार 509 विणकर तर 3 हजार 354 हातमाग

केंद्र शासनाने 2018-19 मध्ये देशभर केलेल्या चौथ्या हातमाग गणनेनूसार राज्यातील 4 प्रादेशिक उपायुक्त कार्यालयांतर्गत 3 हजार 509 विणकर तर 3 हजार 354 हातमाग असल्याची नोंद झाली आहे. नागपूर प्रादेशिक विभागात 317 हातमाग तर 401 विणकर आहेत. सोलापूर प्रादेशिक विभागात 473 हातमाग तर 548 विणकरांची नोंद झाली आहे.  छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक विभागात 262 हातमग तर 430 विणकर आहेत. मुंबई प्रादेशिक विभागात सर्वाधिक 2 हजार 302 हातमाग तर 2 हजार 130 विणकर असल्याचेही या गणनेतून दिसून येत आहे.

 सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर आयुक्तालयाच्यावतीने राज्यशासन अर्थसहय्यीत योजना राबवून हातमाग व विणकरांच्या विकासासाठी कार्य करण्यात येते. याअंतर्गत एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत विविध विकास योजना तसेच बक्षीस योजना अतिरिक्त अनुदान योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, हातमाग कापड स्पर्धा, जाहिराती व प्रसिध्दी योजना आदी प्रभावीपणे राबविण्यात येतात.

                                                            हातमाग कापड स्पर्धा

            राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकरांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट वाणाला वाव मिळावा या उद्देशाने सर्व गटातील हातमाग विणकरांकरिता नागपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर व मुंबई या चार ठिकाणी विभागीय हातमाग कापड स्पर्धा आयोजित करुन बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येते. विभागीय स्पर्धेतील बक्षीसपात्र नमुन्यासाठी राज्यस्तरीय हातमाग कापड स्पर्धा आयोजित करण्यात येते. आणि विणकरांना बक्षीसे व प्रशस्तीपत्र पदान करण्यात येते. वर्ष 2023-24 ची विभागीय स्पर्धा नागपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथे तर राज्यस्तीय स्पर्धा मुंबई येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना 4.50 लाखांची बक्षीसे प्रदान करण्यात आली.

             वस्त्रोद्योग आयुक्तालयातर्फे विविध अर्थसहाय योजनांद्वारे विणकर व रेशीम उद्योग विकास   

राज्यातील विणकर, रेशीम उद्योग व हातमागाच्या विकासासाठी वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 जाहीर केले आहे. तसा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिने वस्त्रोद्योग आयुक्तालयाने केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. ‘अर्बन हाट केंद्र’ ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील विणकर आणि हस्तकलांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणारी योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  राज्यात प्रमुख ठिकाणी ‘अर्बन हाट केंद्र’ स्थापीत करण्यासाठी प्रकल्प किंमतीच्या 80 टक्के हिस्सा केंद्र शासनाकडे तर उर्वरित 20 टक्के हिस्सा राज्य शासन वहन करणार आहे.  महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर येथे अर्बन हट उभारणीसाठी राज्य शासनाने 11 जुलै 2025 अन्वये मान्यता दिली आहे. मंजूरीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

200 युनिट पर्यंत हातमाग विणकरांना मोफत वीज, कच्चा माल पुरवठा योजनेंतर्गत हातमाग विणकरांना अतिरिक्त अनुदान देण्यात येते. या योजनेमध्ये केंद्र व राज्याकडून प्रत्येकी 15 टक्के सवलत देण्याची तरतूद आहे. सदर अनुदान हे कॉटन हँक धागा, घरगुती रेशीम, लोकरी आणि लीनन धागा आणि नैसर्गिक तंतुच्या मिस्त्रीत धाग्यावरच देण्यात येते. वर्ष 2024-25 मध्ये 1037 लाभार्थ्यांना 96 लाख 37 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले.

 केंद्राप्रमाणे राज्य शासनाकडूनही हातमाग विणकर, रेशीम उद्योग विकासासाठी योजना तयार करण्यात आल्या असून वस्त्रोद्योग आयुक्तालय व रेशीम संचालनालयाच्याकडून त्याची अंमलबजावणी करण्यात येते. हातमाग विणकर कुटुंबांना प्रती महिना 200 युनिटपर्यंत मोफत वीज अनुदान देणारी ‘मोफत वीज अनुदान योजना’ आयुक्तालयाच्यावतीने राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत एकूण 1063 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. वर्ष 2023-24 मध्ये 660 लाभार्थ्यांच्या वीज अनुदानापोटी महावितरण मुंबईला वस्त्रोद्योग आयुक्तालयातर्फे 1 कोटी 30 लाख रुपये अदा करण्यात आले. तर वर्ष 2024-25 मध्ये 403 नवीन लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

राज्यातील हातमागाच्या 5 पारंपरिक वाणांमधील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता गणेश चतूर्थी उत्सव भत्ता पुरुष विणकर 10 हजार रुपये तर महिला विणकरांना 15 हजार रुपये देण्यात येतो. वर्ष 2024-25 मध्ये 185 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून 219.50 लाख रूपये वितरीत करण्यात आले. राज्यातील पैठणी साडी, हिमरु शाल, करवत काटी, घोंगडी व खणफॅब्रीक या पाच पारंपरिक क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट डिझाईनला ‘पारंपरिक हातमाग विणकरांना बक्षीस योजना’ अंतर्गत राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त बक्षीस वितरीत करण्यात येते. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी अनुक्रमे 20 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपयांचे रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येते.

हातमाग व विणकरांच्या विकासाकरिता राज्य व केंद्र शासनाच्या योजना आणि धोरणांची अंमलबजावणी करण्याचे कार्य वस्त्राद्योग आयुक्तालय निष्ठेने पार पाडत आहे. हातमाग व विणकरांच्या सकारात्मक वाटचालीसाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरत आहे.

 

रितेश मो. भुयार,

माहिती अधिकारी,

माहिती व जनसंपर्क, नागपूर.

0000

 

 

 


Tuesday, 2 September 2025

मुख्यमंत्र्यांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

 


 नागपूर, दि.२ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या ‘राजयोग’ या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त भेट दिली. तसेच श्री गणेशाचे पूजन करुन आरती केली.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. श्रीमती शालिनी आशरी इटनकर यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना पुष्पगुच्छ देवून यावेळी स्वागत केले. यावेळी कुमारी आरना इटनकर हिने श्री गणेशाच्या आरतीमध्ये सहभाग घेतला.

००००००


झुलेलाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजी संस्थेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

  


श्री गणेश उत्सवानिमित्त आरती

          नागपूर, दि.२ :-  गोधनी येथील झुलेलाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजी या संस्थेतर्फे श्री गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संस्थेस भेट देवून श्री गणेशाचे पूजन करुन आरतीत सहभाग घेतला.

यावेळी आमदार परिणय फुके, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, संस्थेचे अध्यक्ष महेश साधवानी, विरेंद्र कुकरेजा, नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटचे प्रमुख शैलेश जोगळेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, तसेच घनशामजी कुकरेला, जयप्रकाश गुप्ता, गिरीष साधवानी, असरानी, संस्थेचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी, उपाध्यक्ष एस.ई. चौधरी आदी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गणेश उत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. संस्थेचे प्रमुख महेश साधवानी यांनी स्वागत करुन संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.

००००००

 


जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रिकार्डमध्ये मेट्रोच्या

कामठी मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलाची नोंद

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्ल्ड रेकार्डचे प्रमाणपत्र

 

          नागपूर, दि.२ :-  महामेट्रोने अल्पावधीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास केल्यामुळे नागपूर या शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. महामेट्रोने कामठी मार्गावरील सर्वात लांब डबल डेकर पुलाची निर्मिती केली असून या डबल डेकर पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद घेतली आहे. जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूर हे जगातील उत्कृष्ट पायाभूत शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाली असल्याचे गौरवउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या जागतिक पुरस्काराबद्दल महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

         रामगीरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत गिनिज वर्ल्ड रेकार्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गिनिज वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्रदान केले.

       कामठी मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) हा जगातील डबल डेकर व्हायाडक्ट आहे. मेट्रो व हायवे वाहतुकीसाठी ५.६३७ कि.मी. लांबीचा सिंगल कॉलम पिल्लरवर उभा असून हा स्थापत्य कलेचा अदभूत उदाहरण आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन बांधलेल्या या उड्डाणपुलाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डतर्फे नोंद घेतली आहे. यापुर्वी छत्रपतीनगर येथील ३.२ कि.मी. लांबीच्या डबल डक्ट उड्डाणपुलाची निर्मितीसाठी जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली होती. वास्तुकलेच्या या निर्मितीमुळे संत्राच्या शहरासोबतच पायाभूत सुविधांचे शहर म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. या पुरस्काराने नागपूरचा गौरव जागतिक स्तरापर्यंत पोहचला आहे. या डबल डेकर पुलाच्या निर्मितीसोबतच कामठी मार्गावर रेल्वे, महामार्ग वाहतूक तसेच मेट्रो वाहतुकीसाठी जागात प्रथमच अशा प्रकारच्या उड्डाणपुल तयार करण्यात आला आहे. हे जगातील प्रमुख अभियांत्रिकीमधली आश्चर्य आहे. या पुलासाठी १ हजार ६५० टन स्टिलचा वापर करण्यात आला आहे.

     जगातील पहिल्या सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट या पुलाचे सर्व देशांना आकर्षन आहे. प्रत्यक्ष निर्मितीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी अभियांत्रिकी व वास्तुकलेतील तज्ञ भेट देवून पाहणी करत आहे. अशा प्रकारच्या डबल डेकर पुलांची निर्मिती करणारे महामेट्रो व नागपूर हे पायोनिअर असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

        प्रारंभी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर महामेट्रोतर्फे बांधण्यात आलेल्या भारतातील सर्वात लांब डबल डेकर मेट्रो व्हायाडक्ट या पुलाच्या निर्मितीसंदर्भातील चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. तंत्रज्ञानाचा अतुलनिय वापर करुन उड्डाणपुलावर गड्डीगोदाम, कडबीचौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटीव्ह चौक या पाच मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहे. हा उड्डाणपुल चार पदरी असून पहिल्या स्तरावर महामार्ग, दुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमिन स्तरावर आधीच असलेला महामार्ग आहे. या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी छत्रपती चौकाचा समावेश असलेल्या उड्डाणपुलाला देखील गिनिज वर्ल्ड रेकार्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.

       यावेळी महामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे , प्रकल्प संचालक राजीव त्यागी, कार्यकारी संचालक नरेश गुरबानी, महाव्यवस्थापक यतिन राठोड,  मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एन व्ही पी विद्यासागर , प्रकल्प संचालक प्रकाश मुदलियार आदी अधिकारी तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

००००००