Thursday, 23 April 2020

कोरोनापासून मुक्त झालेल्या रुग्णाला मेयोमधून सुट्टी


*डॉक्टर व नर्सनी टाळ्या वाजवून केले स्वागत

नागपूर, दि. 23 :  एम्प्रेस सिटी येथे कोरोना बाधित रुग्णाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दिनांक 28 मार्च रोजी तेलंगणा एक्सप्रेसने नागपुरात दाखल झालेल्या या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना मेयो हास्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.  
एम्प्रेस सिटी येथे राहणाऱ्या कोरोनायोद्धा याला आज हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली. यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच कोरोना मुक्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन सुद्धा केले.  इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय  केवलिया, डॉ. सागर पांडे, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. पराते, कोविडच्या प्रमुख डॉक्टर राखी जोशी, डॉ. रवि चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णावर उपचार करण्यात आले.
कोरोना मुक्त झालेला रुग्ण दिनांक 17 मार्च  रोजी वृंदावन (दिल्ली) येथून तेलंगणा एक्सप्रेसने नागपुरात दाखल झाला होता. त्यांना कोरोना विषाणूचे लक्षणे आढळून आल्यावर दिनांक 28 मार्च रोजी कोरोना चाचणी घेण्यात आली.  त्यामध्ये पॉझिटिव्ह विशेष वॉर्डात भरती करण्यात आले. चौदा दिवसानंतर पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 14 व 18 एप्रिल रोजी सुद्धा पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर 21 एप्रिल व 22 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये निगेटिव्ह आढळून आल्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती डॉ. सागर पांडे यांनी दिली.
कोरोनावर उपचार घेत असताना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त करताना कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या रुग्णांनी न घाबरता डॉक्टरांना सहकार्य केल्यास कोरोना मुक्त होवू शकतो. त्यामुळे उपचारासाठी बाधित रुग्णांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोरोना मुक्त झालेल्या व आज सुट्टी  मिळालेल्या व्यक्तीने केले.
****

पाणीटंचाई आराखड्याची अंमलबजावणी करा - डॉ. नितीन राऊत


    * 909 गावांसाठी 31 कोटी 55 लक्ष रुपयांचा आराखडा
* दोन गावांत तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु
* टंचाईग्रस्त गांवामध्ये विहीर अधिग्रहणाला प्राधान्य
* पाणी टंचाई कृती आराखड्याचा आढावा

नागपूर, दि. 23 :  पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना अपूर्ण पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात याव्यात. तसेच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात तीन टप्प्यात पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत असून यासाठी 31 कोटी 55 लक्ष 90 हजार रुपयांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये 909 गावांमध्ये  प्रस्तावित केलेल्या 1 हजार 488 योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यात कामठी तालुक्यात बिडगाव व तरोडी खुर्द या दोन गावांत तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी बैठकीत दिली.
बचत भवन सभागृहात पाणीटंचाई आराखडा अंमलबजावणी आढावा बैठक पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. गृह मंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री समीर मेघे, आशिष जैस्वाल, टेकचंद सावरकर, राजू पारवे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, नगर परिषदांचे अध्यक्ष तसेच विविध अंमलबजावणी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणाऱ्या संभाव्य गांवामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने तात्काळ अंमलबजावणी करण्याची निर्देश देताना पालकमंत्री म्हणाले की, अपूर्ण पाणीपुरवठा योजना प्राधान्याने दुरुस्त कराव्यात. तसेच नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरणाने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन करावे. तसेच विंधन विहिरींची दुरुस्ती व देखभाल प्राधान्याने पूर्ण करावी.
काटोल व नरखेड तालुक्यात पाणी टंचाई आराखड्यानुसार तात्काळ उपाययोजना पूर्ण करण्यात याव्यात. तसेच नरखेड नगर परिषदेने पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या. पारशिवनी येथील वाढीव पाणीपुरवठा योजना, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करुन पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी बैठकीत दिले.
टंचाई आराखड्याचे अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करताना ज्या पाणीपुरवठा योजना वीजजोडणीअभावी प्रलंबित आहेत अशा योजनांना प्राधान्याने वीजजोडणी करावी, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील 909 गांवासाठी 1 हजार 448 उपाययोजना प्रस्तावित असून यामध्ये 381 नवीन विंधन विहिरी, 263 नळ योजनांची दुरुस्ती, संभाव्य पाणी टंचाई निर्माण होवू शकते अशा 87 गावांना टँकर व बैलगाडीने पाणी पुरवठा करणे, 212 विहिरी खोल करणे, गाळ काढणे, 503 खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.
पाणी टंचाई कृती आराखडा तीन टप्प्यात राबविण्यात येत असून एप्रिल ते जून या कालावधीत 332 गावांसाठी राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत 117 नवीन विंधन विहिरी, 36 विहिरींचे खोलीकरण 30 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, 258 गावांमध्ये खाजगी विहिरींचे अधिग्रहण अशा 441 उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी  8 कोटी 69 लक्ष 46 हजार खर्च येणार आहे. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेाजकर यांनी पाणी टंचाई कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात माहिती दिली.
*****


Wednesday, 22 April 2020

'कोरोना’विरुद्धच्या युद्धावर विलगीकरणानेच मिळणार विजय


विभागीय आयुक्त संजीव कुमार : फेसबुक लाईव्हद्वारे साधला संवाद

नागपूर, ता. २२ : नागपूर शहर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दळणवळणाच्या सेवा असतानाही राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपूर शहर आणि विभागातही कोरोना रुग्णसंख्या अत्यंत कमी आहे. हे येथील सतर्क प्रशासकीय यंत्रणा, लॉकडाऊनदरम्यान लोकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवून दिलेली साथ यामुळेच शक्य झाले. यापुढेही लॉकडाऊनला प्रत्येक व्यक्तीने गांभीर्याने घेतले तर नागपूर विभागातील साखळी लवकरच तुटेल. विलगीकरणच कोरोनाविरुद्धच्या युद्धात विजय मिळविण्यासाठी प्रभावी शस्त्र आहे. त्याचा वापर प्रत्येक व्यक्तीने करावा, असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी केले.

‘कोरोनावरील उपाययोजना आणि नागपूर विभाग’ या विषयावर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी ‘फेसबुक’लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नागरिकांना विलग राहा, घरी राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन केले. केंद्र आणि राज्य शासनाने जे लॉकडाऊन घोषित केले आहे, ते तुमच्या-आमच्या सर्वांच्या पुढील आयुष्यासाठी फायदेशीय आहे. त्याचा आता प्रत्येक व्यक्तीला त्रास होत असेल तरी हा त्रास आपल्या सुरक्षित भविष्यासाठी सहन करावा लागेल. नागरिकांनी आतापर्यंत दिली तशीच साथ पुढेही दिली तर नागपूर विभागात कोरोनाच्या प्रसारावर प्रतिबंध घालता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी नागपूर विभागातील कोरोनाची स्थिती, प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना आणि भविष्यातील तयारी याबाबत विस्तृत माहिती दिली. नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण वगळता नागपूर विभागातील अन्य जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आहे. तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता प्रशासन पूर्णपणे तयारीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वारंवार भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी नियमित सुरु आहे. ऑक्सिजन सिलिंडर, बेडची व्यवस्था, औषधांचा साठा, मास्क व अन्य वस्तूंचा साठा सध्या मुबलक असून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची चमू दिवसरात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत कार्य करीत आहे. बहुतांश रुग्ण हे नागपूर शहरातील असल्यामुळे ज्या भागात रुग्ण आढळले तो भाग महानगरपालिका प्रशासनातर्फे तातडीने सील करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना लगेच क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाच्या प्रसारावर बऱ्याच अंशी अंकुश मिळविता आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलगा सावलीमध्ये आई तेलंगणात आणि मुलाच्या वडिलांचा मृत्यू अशा परिस्थितीत आईला गावाकडे आणण्याची व्यवस्था होईल का, या प्रश्नाच्या उत्तरात विभागीय आयुक्त संजीव कुमार म्हणाले की, संपूर्ण देशाची दैनंदिनी थांबविली आहे. ती साऱ्यांच्याच हिताची आहे. त्या माऊलीचे दु:ख आणि त्या मुलाची ओढ आम्ही समजू शकतो. मात्र, देशासाठी आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी हा त्याग करावाच लागेल. लॉकडाऊन संपेपर्यंत तसा विचारही करता येणार नाही, असे ते म्हणाले. याव्यतिरिक्त अन्य प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे देत नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. समुपदेशनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठांतर्गत असलेल्या समाजकल्याण महाविद्यालयांच्या प्राध्यापकांची मदत घ्यावी, या सूचनेचेही त्यांनी स्वागत केले. भाजीपाला बाजार आठवड्यातून तीन दिवस सुरू ठेवल्यास होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविता येईल, या सूचनेलाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, नक्कीच विचार करु, असे सांगितले.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही - मंत्री विजय वडेट्टीवार


कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना १७१ कोटींचा निधी

            नागपूर, दि. २२ : कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आतापर्यंत एकूण १७१ कोटी इतका निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
            कोवीड-१९ विषाणूचा राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणारा निधी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर खर्च करता येतो का याबाबतीत आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची श्री.वडेट्टीवार यांनी मुंबई येथे बैठक घेतली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी चर्चा करून विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून  विभागीय आयुक्तांना आतापर्यंत १७१ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली
            श्री.वडेट्टीवार म्हणाले, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे पसरलेला आजार नियंत्रित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आज ८१ कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला असून हा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले असून याबाबत दिनांक २१ एप्रिल रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी ४० कोटी, पुणे विभागासाठी १५ कोटी, नागपूरसाठी १० कोटी, अमरावतीसाठी ६ कोटी तर औरंगाबाद विभागासाठी १० कोटी, याप्रमाणे एकूण ८१ कोटींचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्यात कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागासाठी १५कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी, नाशिक विभागासाठी ५ याप्रमाणे ४५ कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या टप्यात कोकण विभागासाठी १५कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी,  नाशिक विभागासाठी ५ याप्रमाणे ४५ कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे.  असे एकूण ९० कोटी आणि तिसऱ्या टप्यात ८१ कोटी असे आतापर्यत एकूण १७१ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
            श्री.वडेट्टीवार म्हणाले, वितरित करण्यात आलेल्या निधीमधून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, Contact Tracing शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देत राज्यातील जनतेने काळजी घ्या, सतर्क राहा, आपल्याच घरी रहा असे आवाहन श्री.वडेट्टीवार यांनी केले आहे.
000