Monday, 27 October 2025

अरहम ॲनिमल ॲम्ब्यूलन्स’ सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 


           नागपूर,दि 26: राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब जी यांच्या दिव्य आशीर्वादाने 'अरहम ॲनिमल ॲम्ब्यूलन्स’ सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. रामगिरी निवासस्थान येथे हा सोहळा झाला.

            यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत आपण केवळ माणसांचा नव्हे, तर सर्व प्राणीमात्रांचा विचार करतो. सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार आहे. याच सेवाभाव आणि करुणेच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाची सुरुवात होत आहे. ॲनिमल केअर हॉस्पिटलसाठी जागेची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सकारात्मक विचार करू असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

           'अरहम ॲनिमल ॲम्ब्युलन्स'सेवेशी जोडलेले राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब जी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आभार मानले.


                                                                                           00000

नवीन पाच पोलीस चौकीमुळे नागपुरच्या सुरक्षिततेला मिळणार बळ - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 



पाच पोलीस चौकीचे उदघाटन

 

      नागपूर, दि. 26 : नागपुरच्या वाढत्या विस्ताराला लक्षात घेऊन सुरक्षितता व सुरक्षा नियोजनाच्या दृष्टीने काही भागांसाठी पोलीस चौक्यांची आवश्यकता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेले निर्देश लक्षात घेऊन शहरातील पाच ठिकाणी पोलीस चौकींची उपलब्धता करण्यात आली आहे. यामुळे निश्चितच नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासह अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास महसूल मंत्री तथा  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

 

      पोलीस आयुक्त कार्यालय येथे आज त्यांच्या हस्ते या पाच पोलीस चौकीचे दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेद्र दाभाडे, शिवाजी राठोड, पोलीस उपायुक्त  लोहित मतानी, दिपक अग्रवाल व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. गणेश नगर कोराडी, कापसी, जामठा, गोंडखैरी, उमरगाव या ठिकाणी  पोलीस चौकी साकारण्यात आल्या आहेत.

 

     पोलीस विभागाच्या यु-टर्न ऑपरेशनमुळे वाहतुक सुरक्षित होणार असून अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. नागपूर शहर आता आंतराष्ट्रीय शहर म्हणून नावारुपास आले आहे. सुरक्षीत नागपूरसाठी युवकांचा सहभाग आवश्यक असून त्यासाठी पोलीस विभागाने युवकांना सोबत घेऊन सुरक्षीत नागपूर उपक्रमाला लोकसहभागाची जोड द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी केले. यु- टर्न ऑपरेशनमुळे कायदा व सुव्यवस्था सुरळीत होण्यास मोठा हातभार लागणार असून नागरिकांसाठी वाहतूक सोईची होईल, असे  त्यांनी सांगितले.

 

00000

खेळाडूंच्या जडणघडणीसाठी अंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह उत्तम पायाभूत सुविधा देण्यावर भर - मुख्यमंत्री देवेंद फडणवीस

 


75 व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन 

नागपूर,दि. 26 : महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने शासनाच्या क्रीडा विभागाअंतर्गत एक व्यापक धोरण आपण अंगिकारले आहे. खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्यात अधिक पारंगत होता यावे यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक व इतर पायाभूत सुविधा आपण व्यापक प्रमाणात उपलब्ध करुन देत आहोत. मिशन ऑलम्पिकची तयारी क्रीडा विभागामार्फत सुरु करण्यात आली असून गत काही वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्यातील खेळाडू आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यशाला गवसणी घालताना दिसत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. 

नागपूर येथे धरमपेठ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित 75 व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट राज्य बॉस्केट बॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य संदीप जोशी, आमदार विकास ठाकरे, अखिल भारतीय बास्केटबॉल संघटनेचे सचिव कुलविंदर गिल, राज्य बास्केट बॉल असोसिएशनचे सचिव गोविंद मुथुकुमार व मान्यवर उपस्थित होते.  

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कौशल्याला दाखविण्याची संधी मिळावी यादृष्टीने खेलो इंडिया हे व्यापक अभियान हाती घेतले. महाराष्ट्राने क्रीडा क्षेत्रात अलिकडच्या काही वर्षात जे सातत्यपूर्ण प्रयत्न केले त्या प्रयत्नांना आपल्या खेळाडूंनी खेलो इंडियामध्ये सार्थकी लावले. गत तीन वर्षात महाराष्ट्र हा खेलो इंडियातील विविध स्पर्धांमध्ये आघाडीवर राहीला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

नागपूर येथे आपण अधिकाधिक ठिकाणी खेळाडूंसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मानकापूर येथे अंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम असे भव्य क्रीडा संकुल साकारत आहोत. मोठया प्रमाणात स्पर्धांचेही आयोजन करीत आहोत. चांगल्या खेळाडूला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या उपलब्ध करुन देण्यावर आमचा भर असल्याचे ते म्हणाले. 

गत आठ वर्ष बास्केटबॉलसाठी संघटनेतील राजकारणामुळे खेळाडूंना अनेक गोष्टींना मुकावे लागले. खेळातील राजकारणाला बाजूला सारून खेळाडूंसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी आमदार संदीप जोशी यांनी महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ते खेळाडूंसाठी अधिक तत्परतेने आपली जाबाबदारी पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

क्रीडा संघटनामधील आपसी हेव्यादाव्यांपेक्षा खिलाडूवृत्तीला सर्वोच्च स्थान असल्याचे ते म्हणाले. कोणताही खेळाडू या  खिलाडूवृत्तीच्या बळावरच आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात अखिल भारतीय पातळीवरील यश संपादन केलेल्या अंडर 18 व अंडर 13 स्पर्धेतील अनुक्रमांक   तिसरा क्रमांक व रनरअप ठरलेल्या खेळाडूंना रोख बक्षीसांचा धनादेश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट राज्य बास्केट बॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य संदीप जोशी यांनी केले. आठ वर्षानंतर प्रथमच या स्पर्धा महाराष्ट्रात होत असल्याचे त्यांनी सांगितले. खेळाडूंना प्रेरणा मिळावी यादृष्टीने आपण महाराष्ट्रात विजेत्या टिममधील खेळाडूंना रोख बक्षीसे देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार विकास ठाकरे व अखिल भारतीय बॉस्केट बॉल संघटनेचे सचिव कुलविंदर गिल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Sunday, 26 October 2025

संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

     सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस  प्रकल्पास मिहान येथे   २२३ एकर भूखंडाचे वितरण 

 नागपूर, दि. 23 : मिहान आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेंस अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी  233 एकर क्षेत्रात  अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादनात  प्रकल्प  उभारणार आहे. या प्रकल्पासाठी मिहान तर्फे 233 एकर भूखंडाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

            रामगिरी येथे आयोजित  कार्यक्रमात  मिहान संघ  प्रकल्पातील आजपर्यंतच्या सर्वात मोठया भुखंडाचे वितरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष श्री. सत्यनारायण नुवाल यांना करण्यात आले. या प्रसंगी संरक्षण उत्पादन कंपनीचे मनीष  नुवाल, राघव नुवाल, जे.एफ साळवे तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे  व्यवस्थपकीय संपादक तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर श्री. गौरव उपश्याम, संजय इंगळे आधी उपस्थित होते.

             सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी  राज्यात 12 हजार 80 कोटीची गुंतणूक करुन अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन  प्रकल्प  उभारणार आहे.  या प्रकल्पामुळे  6 हजार 800 प्रत्येक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच मिहान आर्थिक क्षेत्रात 680 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करुन विमान व संरक्षण उपकरण निर्मिती केंद्र स्थापन करणार आहे. या प्रकल्पामुळे 875 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

            प्रमुख संरक्षण एरोस्पेस उत्पादन केंद्र  सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्प  विकासासाठी   देशातील प्रमुख संरक्षण व एरोस्पेस  उत्पादन केंद्र  म्हणून  विकासासाठी मोठी मदत  होणार आहे. हा  उपक्रम महारास्ट्राच्या ‘ मेक इन इंडिया’ ‘आत्मनिर्भर भारत’ आणि औद्योगिक प्रगतीच्या  विकासाठी अधिक बळकटी देणारा ठरणार असल्याची  ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

            सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीला वितरीत करण्यात येते. मिहान सेझ प्रकल्पातील सर्वात मोठे भूखंड असून महाराष्ट्राच्या प्रगत, गुंतवणूकदार-अनुकूल धोरणांचा व अग्रगण्य उद्योगांचा वाढता विश्वास यावरून अधोरेखित होतो.असल्याचे  यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगीतले.

            या प्रकरणामुळे  संरक्षण उत्पादन उद्योग क्षेत्रात/ नागपूरला आंतरराष्ट्री स्तरावरील  नान्यता मिळणार असून यामुळे विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीत मोठी भर पडणार आहे.

शासन व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असून, उच्च-मूल्य गुंतवणूक आकर्षित करणे, प्रादेशिक रोजगारनिर्मिती वाढवणे आणि संरक्षण व उत्पादन क्षेत्रात राज्याचे नेतृत्व अधिक दृढ करणे हा त्यामागील हेतू  असल्याचे यावेळी एमएडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन ईटनकर यांनी सांगितले.

 

*****