- हागणदारी मुक्तीसाठी गावनिहाय सर्वेक्षण
- एकही कुटुंब सुटणार नाही याची दक्षता घ्या
नागपूर, दि. 27 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नागपूर जिल्ह्यात हागणदारी मुक्त करतांना प्रत्येक गावातील शौचालय नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करुन ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही अशा सर्व कुटुंबांना सामाजिक दायित्व निधीमधून आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारी मुक्त उपक्रमाचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती नीशाताई सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती श्रीमती आशा गायकवाड, श्रीमती पुष्पा वाघाडे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. श्रीमती कादंबरी बलकवडे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा हागणदारी मुक्त करताना प्रत्येक गावात वास्तव्यास असलेले कुटुंब तसेच वाढीव कुटुंबांची गावनिहाय यादी तयार करुन वाढीव कुटुंबांना व ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही अशा कुटुंबांची एकत्रित यादी गट विकास अधिकारी यांनी 15 दिवसांत सादर करावी, अशी सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, गावनिहाय आवश्यक असलेल्या सर्व कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यानुसार तालुकानिहाय प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचनाही त्यांनी बैठकीत दिली.
नागपूर जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार मार्च 2017 अखेरपर्यंत हागणदारी मुक्तीच्या दिशेने जिल्हा परिषदेतर्फे बेसलाईन सर्वेनुसार 89.69 टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 766 ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागातून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध उपक्रमांतर्गत यावर्षी 69 हजार शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहेत.
मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधकामासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच उद्योग व्यवस्थापनांकडे असलेल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ज्या कुटुंबांना योजनेमधून लाभ मिळू शकत नाही अशा कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी सहाय्य उपलब्ध होईल.
प्रारंभी उप मुख्य कार्यपालन अधिकारी प्रशांत थोरात यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी उपलब्ध निधी तसेच आवश्यक असलेल्या निधीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार दिनेश माथुरकर यांनी मानले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य, लोक प्रतिनिधी, विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी,गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
****

No comments:
Post a Comment