Saturday, 18 March 2017

कर्मचाऱ्यांमधील खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन द्या --- विकास पानसरे


  * शूटींग बॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन
          * महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे आयोजन
          * स्पर्धेत 99 संघांचा सहभाग

नागपूर,दि 18 : मैदानी खेळ खेळणे हा शारीरिक व्यायामासाठी उत्तम पर्याय आहे. मात्र, कार्यालयीन कामात व्यस्त झाल्यानंतर खेळाकडे आणि पर्यायाने आरोग्याकडे दुर्लक्ष होते. या समस्यांवर उपाय शोधून मैदानी खेळांना नवसंजीवनी देण्यासोबतच खेळाडूंच्या खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन द्या, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास पानसरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या शुटींग बॉल स्पर्धेचे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या क्रीडांगणात थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी विकास पानसरे बोलत होते. फीत कापून व आकाशात फुगे उडवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास पानसरे तर, प्रमुख अतिथी म्हणून मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी एस. एस. वारीक, महाव्यवस्थापक सचिन इंगळी, राजेंद्र अहिवर, मुख्य अभियंता एस.आर. वाघ, नागपूर-अमरावती सर्कलचे अधीक्षक अभियंता एम.पी. पुराणिक, एस. एस. आकुलवार, एमआयडीसी एम्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पेडणेकर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डी.बी. माळी, एम्प्लॉईज युनियनचे महासचिव आर.आर. मुननकर उपस्थित होते.
शूटींग बॉल स्पर्धेत महाराष्ट्रातील 99 संघ सहभागी झाले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला दर्शनीय सामना अग्निशमन विभाग कोकण विरूद्ध मुख्य अभियंता संघ, पुणे यांच्यात रंगला.  
कर्मचाऱ्यांमध्ये खेळाच्या माध्यमातून सांघिक भावना निर्माण व्हावी, हा औद्योगिक विकास महामंडळाचा उद्देश आहे. अशी महामंडळाच्या कार्याची प्रशंसा करताना एस.एस. वारीक म्हणाले की, महामंडळातील कर्मचारी-अधिकारी शूटींग बॉल स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात. खेळासोबतच त्यांच्यात आचार-विचारांची देवाण घेवाण होते. महामंडळाच्या कार्याची माहिती मिळते. सोबतच कामातून थोडासा विरंगुळा मिळतो. मैदानी खेळामुळे शरीराला चांगला व्यायाम मिळत असल्याने स्वत: व मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्या असेही  ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एम. पी. पुराणिक यांनी प्रास्ताविक केले. संचालन सहाय्यक अभियंता उदय घिसे यांनी केले.

                                                         ****


No comments:

Post a Comment