- जागतिक महिला दिनाचे आयोजन
- बालव्याख्याती सुमेधा त्रिफळेचा
सावित्रीबाई फुले एकपात्री प्रयोग सादर
नागपुर दि.8 : महिलांनी ‘चूल आणि मूल’ सांभाळण्यापलीकडे जाउन आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या तोडीस तोड आपला ठसा उमटविला आहे.बदलत्या काळानुरुप स्वत:मध्ये बदल करुन त्या आपले कर्तृत्व सिद्ध करित आहेत. यामुळे स्त्रियांच्या कार्याचा लौकिक वाढत असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी केले.
विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था नागपुर आणि महाराष्ट्र राज्य पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटना यांच्या समन्वयाने जागतिक महिला दिन वैनगंगा नगर येथील जलसंपदा विभागामध्ये आज पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सचिव नानाभाऊ महल्ले, धरमपेठ महिला को.आपरेटिव्ह सोसायटिच्या अध्यक्षा निलिमा बावणे, मृद सर्वेक्षण अधिकारी शुभांगी जुनघरे, सहाय्यक अभियंता श्रीमती अनिता पराते, समाजसेविका डॉ.संध्या पवार तसेच श्रीमती मंगला समर्थ यांची उपस्थिती होती.
महापौर पुढे म्हणाल्या की, कार्यकुशलता, तत्परता व धाडस यांचा योग्य समन्वय साधल्यास आवडीच्या क्षेत्रामध्ये सहज यशस्वी होता येते.तसेच इप्सित ध्येयापर्यंत पोहचणे सुलभ होते. महिलांनी स्वत:ला कमी न लेखता आत्मविश्वासाने व दृढ निश्चयाने वाटचाल करावी.यामुळे मार्गात कुठलाही अडसर निर्माण होत नाही उलटदिशी सहकार्यच मिळते. असे सांगुन, नारीशक्ती कमजोर नसुन तिने समाजकारण,राजकारण,उद्योग, शिक्षण यासह अनेक क्षेत्रामध्ये लौकिक मिळविला आहे. महिला दिवस साजरा करणे ही महिलांसाठी गौरवाची बाब असुन कर्तृत्ववान महिलांच्या गुणांचा इतर स्त्रियांनी अंगीकार केल्यास या दिवसाचे सार्थक होईल.असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सुमेधा त्रिफळे या लहान मुलीने सावित्रीबाई फुलेंचे शैक्षणिक कार्याची महती सांगणारा एकपात्री प्रयोग उपस्थितांसमोर सादर केला. तसेच महिला सक्षमीकरणावर आधारित स्त्रीशक्तीगीत देखील सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका वंदना परिहार यांनी तर आभार पतसंस्थेचे सचिव नानाभाउ महल्ले यांनी मानले.
*****

No comments:
Post a Comment