नागपूर, दि.10 : शेतीसोबतच पूरक उद्योग म्हणून शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादन घेण्यासाठी महारेशीम अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावर जावून रेशीम तंत्रज्ञानाची माहिती देण्यासोबतच जिल्हयातील पाचशे शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून महारेशीम अभियानाअंतर्गत ‘रेशीम रथा’ला जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाय, रेशीम संचालनालयाचे सहायक संचालक आर.टी. जोगदंड, उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी, रेशीम विकास अधिकारी राम हरी धुळडे आदी उपस्थित होते.
पारंपारिक शेती करतांना येणाऱ्या अडचणी तसेच उत्पादनावर होणारा विपरित परिणाम यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी रेशीम शेती हा उत्तम पर्याय असून शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगतांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रेशीम शेती करणे अत्यंत सुलभ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही शेतीसोबत रेशीम शेतीचा पयार्य निवडावा असेही त्यांनी सांगितले.
नरेगा अंतर्गत मागील वर्षी 156 शेतकऱ्यांनी 156 एकरावर शेतावर तुतीची लागवड केली होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत 40 हजार 850 अंडीपुंज वाटप करुन 23.900 मेट्रीक टन कोश उत्पादन करण्यात आले आहे. कोश उत्पादनाच्या विक्रीची व्यवस्था असल्यामुळे व बाजारपेठेतही मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळत आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत मनरेगा अंतर्गत 25 हजार 911 मनुष्यबळ निर्मित झाले असून 49 लक्ष 75 हजार रुपयाचे अनुदानही वाटप करण्यात आले आहे.
महारेशीम अभियानाअंतर्गत रेशीम जागृती रथ कुही, भिवापूर, पारशिवनी आदी पाच तालुक्यात जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच तांत्रिक प्रात्याक्षिकही करुन दाखविणार आहे. या अभियानामध्ये पाचशे एकर शेतीवर तुतीची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. हे अभियान 25 मार्च पर्यंत राबिण्यात येणार असल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी राम हरी धुळडे यांनी दिली. यावेळी रेशीम क्षेत्र सहायक कृष्णा डामरे, बी.जी. कडुकर, लिना लाडिकर आदी उपस्थित होते.
000000

No comments:
Post a Comment