नागपूर, दि.10 : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृद आरोग्य व्यवस्थापन योजना 2016-17 अंतर्गत मृद परिक्षक मिनीलॅबच्या माध्यमातून गावातच शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका उपलब्ध होण्याकरीता इच्छुक संस्था, वैयक्तिक लाभधारकांना मृद परिक्षक मिनीलॅब खरेदीसाठी केंद्र शासनाकडून 60 टक्के, तर राज्य शासनकडून 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत खताचा समतोल वापरास व एकात्मिक अन्नद्रव्य चालना मिळण्यासाठी मृद आरोग्य पत्रिका योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देणे हा प्रमुख उद्देश आहे. जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्याची पातळी व सुक्ष्म मुलद्रव्यांची पातळी व कमतरताची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते.
शासकीय मृद चाचणी प्रयोगशाळा, कृषी चिकित्सालय, कृषी विद्यापीठामार्फत संचालित कृषी विज्ञान केंद्र यांचेसाठी मृद परिक्षक मिनीलॅब खरेदीसाठी प्रति नग 86 हजार रुपये अधिक स्थानिक कर व जास्तीत जास्त एक लाख रुपये देय राहील. खाजगी संस्था, लाभधारकांना मृद परिक्षक मिनीलॅब खरेदीसाठी एकूण किंमतीच्या 60 टक्के जास्तीत जास्त 45 हजार रुपये अनुदान देय राहील.
मृद परिक्षक मिनीलॅबची मोका तपासणी कार्यरत झाल्यानंतर लाभार्थ्यांना डीबीटी मार्फत तांत्रिक मानकाच्या अधिन राहून अनुदान वितरीत करण्यात येईल. तसेच केंद्र शासनाच्या एमआयएस सॉफ्टवेअर मधून जमीन आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना मराठी भाषेतून उपलब्ध होण्याकरीता आवश्यक ती संगणक प्रणाली मृद परिक्षक मिनीलॅब यांचेकडे असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हयातील तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेचा जास्तीत जास्त इच्छुक संस्था, वैयक्तिक लाभधारक यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम.बी. शेंडे यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment