Friday, 31 March 2017

तासिका तत्वावरील अध्यापकांची वेळेत नियुक्ती करून अभ्यासक्रम पूर्ण करावा - विनोद तावडे

मुंबई, दि. 29 : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण अभ्यासक्रमासाठी सत्र पध्दत लागू करण्यात आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तासिका तत्वावरील अध्यापकांची नियुक्ती करावी. अशा अध्यापकांच्या नियुक्तीला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी तासिका तत्वावरील अध्यापकांची नियुक्ती करून अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे शिक्षणमंत्री  विनोद तावडे यांनी सांगितले.
राज्यातील 11 अकृषक विद्यापीठांमध्ये सर्व स्नातक व स्नातकोत्तर अभ्यासक्रमाकरिता सत्र पध्दत लागू करण्यात आली आहे. मात्र सत्र परीक्षा पध्दतीमुळे महाविद्यालयांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम विशिष्ट वेळेत पूर्ण होत नसणे, अध्यापक नसणे, तसेच यासर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितावर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासंदर्भात राज्य शासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबतची लक्षवेधी सूचना आज विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आली होती. विधानपरिषद सदस्य नागो गाणार, सतीश चव्हाण यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.
या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या निर्देशानुसार देशामध्ये सर्वच ठिकाणी सत्र पध्दत लागू करण्यात आली आहे. सत्र परीक्षा पद्धतीमुळे प्राध्यापकांना अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. तथापि, ज्या महाविद्यालयामध्ये सदरचे अध्यापकाचे  पद भरलेले नाही अशा ठिकाणी एकास तीन या प्रमाणात तासिका तत्वावरील अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते व अशा अध्यापकांकडून संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. अशा तासिका तत्वारील अध्यापकांना विद्यापीठाकडून मान्यता देण्यात येते. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्याची व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्याची जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे सत्र परीक्षा पद्धतीत बदल करण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पुरातन वस्तू आणि विष्णूकुंडीण नाणी गहाळ झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणाची कार्यवाही पोलिस यंत्रणेमार्फत सुरू आहे. तसेच यासंदर्भात सदर विद्यापीठाचे तत्कालीन विभागप्रमुख यानी कुलगुरु यांना अहवाल सादर केला असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.
०००००

No comments:

Post a Comment