नागपूर, दि 26 : स्मार्ट शहराची संकल्पना राबविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून शहराच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून सहकार्य मिळेल, अशी ग्वाही केंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.
रामदासपेठ येथील सिटी सेंटर येथे सिटी डेव्हलपमेंट फोरम द्वारा इक्वि-सिटी प्रकल्पाअंर्तगत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या समारोपावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महानगरपालिकेच्या महापौर नंदा जिचकार, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तापक्ष नेता संदिप जोशी, गिरीष गांधी, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे व जयंत पाठक उपस्थित होते.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, शहरातील समस्यांचे निवारण करण्यासाठी विविध योजना करण्यात आलेल्या आहेत. या समस्या नष्ट करून शहराला सुंदर बनविण्यासाठी व प्रगतीकडे नेण्यासाठी नागरिकांच्या सहाय्याने सर्व संसाधनांना गतीमान करण्याचा प्रयत्न होत आहे. शहराच्या प्रगतीसाठी सर्व जनतेचे सहकार्य अपेक्षीत असून सिटी डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून सुरक्षीतता, सुरक्षा व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच सर्वांना समान नागरी सेवांची उपलब्धता निर्माण होण्यास मदत होईल. असे सांगून ते पुढे म्हणाले की, नागपूरच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून मुबलक निधी प्राप्त झालेला आहे. यापुढेही स्थानिक विकास कामे करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी सहकार्य प्राप्त होईल.
जनतेच्या अनेक समस्या व प्रश्न आहेत. त्या समस्या सिटी डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून सोडविता येतील व शहराला विकासाकडे नेणे शक्य होईल. स्थानिक प्रशासनाने शहराच्या विकासासाठी तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वातोपरी मदत करावी. सिटी डेव्हलपमेंट फोरमच्या आज झालेल्या चर्चेच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करुन शहर विकासासाठी सर्वातोपरी मदत करण्यात येईल, असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
आज आयोजित केलेल्या सिटी डेव्हलपमेंट फोरम या उपक्रमामध्ये विविध तज्ज्ञ, प्रतिनिधी तसेच महानगरपालिका अधिकारी यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीष गांधी तर आभार जयंत पाठक यांनी मानले.
********

No comments:
Post a Comment