Thursday, 13 April 2017

‘महामानव’ : आपला आदर्श, आपली प्रेरणा

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे पुस्तक प्रकाशित

मुंबई, 13 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर तसेच विविधांगी पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या ‘महामानव: आपला आदर्श, आपली प्रेरणा’ हे पुस्तक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केले आहे.

शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकात वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी विविध तज्ज्ञांनी लिहीलेले अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. बाबासाहेबांच्या 126 व्या जयंतीदिनी हा दुर्मिळ ठेवा एकत्रितरीत्या वाचकांसाठी उपलब्ध व्हावा, या दृष्टीने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या पुस्तकात लेखक, संशोधक, प्राध्यापक, संपादक, पत्रकार यांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. बाबासाहेबांची चतुरस्त्र प्रतिभा, त्यांचे जीवनकार्य यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या लेखांतून करण्यात आला आहे. बाबासाहेबांची पत्रकारिता, शेती व कामगारविषयक विचार व कार्य, अर्थशास्त्र व सामाजिक विचार, संविधान, सुरक्षाविषयक मूलभूत संकल्पना, सांस्कृतिक चळवळ, धम्मक्रांती आदींविषयीच्या माहितीपूर्ण लेखांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
आठवणीतले बाबासाहेब, बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत पंचतीर्थे यावरही माहिती या पुस्तकात समाविष्ट आहे. डॉ. आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा ठेवाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे पुस्तक अभ्यासक, संशोधक आणि सामान्य वाचक या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. बाबासाहेबांचे श्रेष्ठत्व आणि त्यांचे चौफेर व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तक सहाय्यभूत ठरेल. या पुस्तकाचे मूल्य 50 रुपये आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टीम लोकराज्य’ने हा ठेवा वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.


No comments:

Post a Comment