नागपूर दि. 13 : मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील जन-धन मेळाव्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवार 14 एप्रिलला सहभागी होणार आहे. त्याकरिता सुरू असलेली तयारी पूर्ण झाली असून, संत्रानगरी प्रधानमंत्री यांच्या स्वागताकरिता सज्ज झाली आहे. आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नियोजित नागपूर येथील मानकापूर व दीक्षाभूमी या कार्यक्रमाच्या व्यवस्थेची पाहणी केली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती महोत्सवाच्या समारोह समारंभाकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दीक्षाभूमीला भेट देणार आहे. कोराडी येथील थर्मल पॉवर स्टेशन या राष्ट्रीय प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन करतील आणि जन-धन मेळाव्याला भेट देवून निती आयोगातर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहे. नागपूर शहराचे नाव स्मार्ट सिटी म्हणून देशाच्या नकाशावर कोरले जाणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा ऐतिहासिक दौरा ठरणार असल्याचे त्यांनी पाहणी दरम्यान सांगितले.
विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरात जन-धन मेळावा प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, येथे सुमारे दहा ते पंधरा हजार नागरिक बसू शकतील तसेच त्यांना क्रीडा संकुलातील कार्यक्रम थेट पाहता येईल अशी व्यवस्था केली आहे. तसेच दीक्षाभूमी परिसरात पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त अनूप कुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, सुधार प्रन्यासचे डॉ. दिपक म्हैसकर, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांच्या समवेत प्रत्यक्ष कार्यक्रम व्यवस्थेची पाहणी केली.
*****



No comments:
Post a Comment