Thursday, 13 April 2017

संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ब्रिटीश कंपन्यांना सहकार्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


ब्रिटनच्या संरक्षण मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई, दि. 11 : ब्रिटनचे संरक्षण मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर डिफेन्स) मायकेल फालन यांनी आज शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रासाठी पोषक वातावरण व साधनसामुग्री असल्याने ब्रिटीश कंपन्यांनी येथे गुंतवणूक केल्यास राज्य शासन त्यास मदत करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. तर हवाई वाहतूक व सायबर सुरक्षा क्षेत्रातही गुंतवणुकीस ब्रिटीश कंपन्या उत्सुक असल्याचे श्री. फालन यांनी सांगितले.
            यावेळी राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, राजशिष्टाचार विभागाचे सचिव बाजीराव जाधव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी यावेळी उपस्थित होते. शिष्टमंडळात ब्रिटीश उच्चायुक्त डॉमिनिक ॲक्वॉथ, पर्मनंट सेक्रेटरी स्टिफन लव्हग्रेव्ह यांच्यासह उच्चाधिकाऱ्यांचा समावेश होता.
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे उद्योगांसाठी पोषक वातावरण असलेले राज्य आहे. जागतिक कंपन्यांनीही येथे गुंतवणुकीसाठी पसंती दर्शविली आहे. राज्यात संरक्षण उत्पादनाशी संबंधित विविध कंपन्या व आस्थापना असल्यामुळे आवश्यक वातावरण आहे. तसेच राज्याने या क्षेत्राला चालना देण्यासाठी संरक्षण उत्पादन निर्मिती धोरण तयार केले आहे. राज्यात संरक्षण वस्तूंच्या उत्पादनाच्या निर्मितीसाठी हे धोरण उपयुक्त ठरणार आहे.
            राज्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच महाराष्ट्र हे माहिती तंत्रज्ञान हब आहे. येथे मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. महाराष्ट्रात स्वतःची सायबर सुरक्षाविषयक यंत्रणा आहे. राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात सायबर सुरक्षा प्रयोगशाळा उभी केली आहे. सायबर क्षेत्रातील घटनांवरुन बोध घेऊन सायबर सुरक्षिततेसंबंधी राज्याने स्वतःचे मॉडेल उभे केले आहे. तसेच ही यंत्रणा अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ब्रिटीश शासन व तेथील कंपन्यांकडून होणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रक्रियेसाठी दोन्ही बाजूच्या लोकांची एक समिती करण्यात यावी जेणेकरून प्रत्यक्ष गुंतवणुकीस सहाय्य होईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी ब्रिटीश संरक्षण मंत्री श्री. फालन यांनी राज्यात विमान वाहतूक, संरक्षण उत्पादन निर्मिती तसेच सायबर सुरक्षा या क्षेत्रात ब्रिटीश कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. या माध्यमातून दोन्ही देशातील संबंध अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीस भागीदार होण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या माध्यमातून मेक इन महाराष्ट्र उपक्रमात सहभागी होता येईल. एरोस्पेस, संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रातील डिझाईन व  विकास यामध्येही गुंतवणूक करण्यास ब्रिटीश कंपन्या तयार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
            श्री. लव्हग्रेव्ह म्हणाले की, ब्रिटीश शासन व तेथील कंपन्या राज्यात गुंतवणुकीस तसेच येथील गुंतवणूक व खरेदी धोरणासंबंधी जाणून घेण्यास इच्छुक आहेत.   श्री. सेठी यांनी राज्यातील उद्योग वाढीसाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांबद्दल माहिती दिली.
०००

No comments:

Post a Comment