रस्त्याने जथ्थेच्या जथ्थे चालत मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकूलाच्या दिशेने येतच होते. स्टेडिअमच्या आत मोठा जनसागर आधीच गोळा झालेला. प्रत्येकालाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघायची आणि ऐकण्याची इच्छा. नागपुरात मुख्यमंत्रीपद आल्यापासून राज्याचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाचा झपाटा आणि आपलं शहर नेतृत्व करतय याचा अभिमान प्रत्येक चेहऱ्यावर विलसत होता.
निमित्त आज पंतप्रधान मोदी यांच्या नागपूर दौऱ्याचे अपेक्षेप्रमाणे मोदी यांनी मराठीत भाषणाला आरंभ केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला व सभागृहात बाहेर मोदी-मोदी नारे सुरु झाले.
डिजिटल इंडियात पुढचे पाऊल ठरलेले भिम हे ॲप 26 डिसेंबर 2016 रोजी सादर झाले. या ॲपसाठी मोबाईल आवश्यक होता याचं पुढचं पाऊल उचलत आज भिमआधार ची सुरुवात या ठिकाणी झाली. दुकानदाराचा मोबाईल त्यावर भिम हे अप यात ग्राहकाने आपला आधार क्रमांक आणि अंगठा वापरुन पैसा अदा करता येतील अशी सोय यात आहे.
8 नोव्हेंबर रोजी निश्चलीकरणाचा निर्णय घेण्यात आला त्यातून रोखविरहीत व्यवहाराकडे देशाची वाटचाल सुरु झाली. भिम ॲप आतापर्यंत 2 कोटींहून अधिक जणांनी वापरायला सुरुवात केली आहे. आता आधार आधारित भिम ची सुरुवात आज झाली. सोबतच रेफरलचा शुभारंभ आज झाला. ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. याचा लाभ थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचावा यासाठी 14 एप्रिल ते 14 मे या एक महिन्याच्या कालावधीत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीत ही प्रणाली असणारी POS यंत्रे पोहचवू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच कार्यक्रमात सांगितले.
मुख्य सोहळा ज्या ठिकाणी होता तेथे सर्वांना बसणे शक्य नाही याची जाणीव ठेवून निती आयोगाने येथे दोन स्वतंत्र पेंडॉलमध्ये 25 बाय 50 फूट आकाराचे एलईडी स्क्रीन उपलब्ध करुन दिले. लोकांना सावलीत बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी अशी उत्तम व्यवस्था केली होती.
मुख्य सोहळ्यासोबतच येथे वित्तीय सेवा देणाऱ्या सर्व बँकेचे स्टॉल्स तसेच कॅशलेसची माहिती देणारे इतर व्यावसायिक बचत गट आदींचे 72 स्टॉल्स असणारे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन सकाळी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आर. पी. मराठे यांच्या हस्ते झाले
या प्रदर्शनात जिओ, पेटीएम आदी खाजगी कंपन्यांसह आधार नोंदणी, आधार दुरुस्ती तसेच आरटीओ, मुद्रांक नोंदणी आदींचेही स्टॉल्स होते.
या कार्यक्रमाचे आकर्षण ठरला तो भाग्यवान ग्राहक पुरस्कार वितरण सोहळा. रु पे कार्डचा वापर करुन कॅशलेस व्यवहार करणाऱ्या ग्राहकांमधून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ड्रॉ द्वारे याचे विजेते निवडण्यात आले आणि योगायोगाने महाराष्ट्राच्या लातूरमधील श्रद्धा मोहन मेंगशेट्टी हिला 1 कोटी रुपयांचा पहिला पुरस्कार मिळाला.
श्रद्धा पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेते. तिच्या वडिलांचे लातूरमध्ये खंडोबा गल्ली भागात किराणा दुकान आहे. श्रद्धाला मोबाईल घ्यायचा होता. एकदम पैसे देणे शक्य नसल्याने तिने ईएमआय वर तो घेतला याचा ईएमआय केवळ 1590 रुपये तिने रुपे कार्डामार्फत भरला होता.
मी पैशांचे काय करणार असे पंतप्रधान मोदी यांनी मला विचारले त्यावेळी अजून काहीच ठरवलेले नाही असे आपण सांगितले असे श्रद्धा म्हणाली. मी यातून नक्कीच काहीतरी चांगलं करणार आहे, असे ती सांगत होती. पुरस्कार विजेते आणि चॅनेलवाल्यांनी घेतलेल्या मुलाखती याचा चकमकाट आता सुरु झाला त्यातही माझ्याप्रमाणे सर्वांनी डिजिटल पेमेंट करावं असं मी सर्वांना सांगेन असं श्रद्धाचं वाक्य लक्षात राहिलं.
मोदींच्या रुपाने नव्या पिढीचं नवं नेतृत्व आलय. तरुण पिढीला नवीन बदल रुचले आहेत. आम्हाला स्वातंत्र्य लढ्यात लढता आलं नाही याची खंत न बाळगता भ्रष्टाचारमुक्त असा नवा डिजिटल भारत उभा करण्याच्या लढाईत प्रत्येक जण सामील होवू शकतो हे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन मनात घेऊनच मी कार्यालयाकडे निघालो.
--- प्रशांत दैठणकर

No comments:
Post a Comment