Tuesday, 1 August 2017

महसूल दिनी 24 हजार 255 खातेदारांना सातबारा वाटप - सचिन कुर्वे

v  जनतेला सेवा देत वेगळ्या पद्धतीने महसूल दिनाचे आयोजन
v  तालुका व तलाठी मुख्यालयात महसूल दिन साजरा
v  जनतेला विविध प्रमाणपत्रांचे वाटप  
नागपूर, दि. 1 :  महसूल विभागाशी संबंधित असलेले विविध प्रमाणपत्र मतदार ओळखपत्र, सातबारा तसेच कुटूंब अर्थसहाय्य योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून जिल्ह्यातील सर्व तालुका व तलाठी मुख्यालयात महसूल दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यात 45 हजार भूमीधारक भोटवटदार वर्ग 2 चे भूस्वामी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आले. त्यापैकी 24 हजार 255 खातेदारांना सातबारा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
महसूल दिनानिमित्त प्रत्येक तालुक्यात व तलाठी मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना यानिमित्त विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी महसूल विभागाशी संबंधित नागरिकांचे विविध कामे यामध्ये सातबारा वितरण, राशनकार्ड, मतदार ओळखपत्र, उत्पन्नाचे दाखले, रहिवाशी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, एैपत प्रमाणपत्र, कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत धनादेश आदिचे वितरण करण्यात आले आहे.
महसूल दिन हा नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित असलेल्या सेवा देऊन साजरा करावा, अशी संकल्पना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जिल्ह्यात राबविली. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात व तलाठी मुख्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. महसूल दिनी 24 हजार 255 खातेदारांना एकाच दिवशी सातबारा वाटप करण्याचा उच्चांक प्रथमच पूर्ण करण्यात आला आहे.
लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत सातबारामध्ये पतीसोबत पत्नीच्या नावाची नोंद करुन एकूण 32  सातबाराचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यात भूमीधारक (भोटवटदार वर्ग 2) च्या जमिनी भूस्वामी (भोगवटदार वर्ग 1) मध्ये रुपांतरीत करण्याच्या दृष्टीने 1 एप्रिल ते 19 मे या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 45 हजार 016 भूमीधारक (भोटवटदार वर्ग 2) चे भूस्वामी (भोगवटदार वर्ग 1) मध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. त्यापैकी 24 हजार 255 खातेदारांना एकाच दिवशी सातबारा वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
****  



No comments:

Post a Comment