* ऊर्दू लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन
* विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
* ऊर्दू लोकराज्याचे प्रदर्शन
नागपूर, दि. 1 : ऊर्दू भाषिक नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मिळण्यासोबतच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले करिअर घडवितांना ऊर्दू लोकराज्याचे नियमित वाचन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे यांनी केले.
आशीनगर झोन अंतर्गत असलेल्या एम. के. आझाद ऊर्दू शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे ऊर्दू लोकराज्य मेळावा व ऊर्दू लोकराज्य मासिकाचे प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण सभापती श्री. दिवे यांच्य हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या मेडपल्लीवार, नगरसेवक जमाला अहमद, मुख्याध्यापक निखद रेहाना खान, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, अशोक कोल्हटकर, निजामुद्दीन आदी उपस्थित होते.
‘ऊर्दू लोकराज्य’ या मासिकाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी हे मासिक नियमित वाचन करतांना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा. असे सांगतांना श्री. दिवे पुढे म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत-जास्त वापर करतानाच भविष्यातील संधीचा वेध घेण्यासाठी ऊर्दू माध्यामातील विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य मासिक हे व्यासपीठ आहे.
ऊर्दू लोकराज्य मेळाव्याला मार्गदर्शन करतांना श्रीमती संध्या मेडपल्लीवार म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुस्तकांना मित्र बनवावे. वाचाल तर, वाचाल हे आपल्या आयुष्याचे ध्येय असायला हवे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपले शिक्षणच आपल्याला मार्गदर्शन करते. आज आयोजित करण्यात आलेल्या ऊर्दू लोकराज्य मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना वर्तमान काळातील शासकीय धोरणे, भविष्यकालीन योजना तसेच विद्यार्थ्यांना उपयोगी शैक्षणिक धोरणांबाबत यथासांग माहिती मिळाली आहे. लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र आहे. हे ऊर्दूसोबतच मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित होत असते. भविष्य काळात ऊर्दू लोकराज्य मेळाव्याप्रमाणे विविध भाषांची लोकराज्य मेळावे आयोजित करुन याचा प्रसार आणि प्रचार जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत करण्यात यावा. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नगरसेवक जमाल अहमद यांनी ऊर्दू भाषिक विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी ‘ऊर्दू लोकराज्य’ हे महत्त्वाचे माध्यम असून या मासिकामधील विविध योजनांसंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांनी सर्व ऊर्दू भाषिकांपर्यंत पोहचावी. ऊर्दू लोकराज्याचे वार्षिक वर्गणीदार होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी केले.
‘ऊर्दू लोकराज्य’बाबत बोलतांना जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर म्हणाले की, ऊर्दू विद्यार्थ्यांसाठी ऊर्दू लोकराज्य अत्यंत उपयुक्त आहे. स्पर्धा परीक्षांची अद्ययावत माहिती शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, कौशल्य विकास आणि स्वयं रोजगार योजनांची परिपूर्ण माहिती लोकराज्यमध्ये आहे. शासनाच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचे भविष्य आहे. ऊर्दू लोकराज्य अंकामध्ये प्रकाशित होणारी माहिती शाळेच्यावतीने रोज होणाऱ्या परिपाठाच्यावेळी वाचन करावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
ऊर्दू माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांसाठी यावेळी सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण सभापती दिलीप दिवे, नगरसेवक जमाल अहमद, शिक्षणाधिकारी श्रीमती मेडपल्लीवार यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन निरीक्षक निजामुद्दीन तर आभार श्रीमती तमर अफरोज सिद्दीकी यांनी मानले.
****

No comments:
Post a Comment