नागपूर, दि.23 : शहरातील वास्तू जतन करण्याच्या उद्देशाने गठित करण्यात आलेल्या हेरिटेज संवर्धन समितीची बैठक महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नीरीचे संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी स्ट्रक्चरल अभियंता पी. एस. पाटणकर, एल.ए.डी. महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उज्वला चक्रदेव, सदस्य श्रीमती डॉ. शुभा जोहरी, वास्तुविशारद अर्बन डिझायनर अशोक मोखा, नागपूर वस्तू संग्रहालयाचे क्युरेटर डॉ. विराग सोनटक्के, नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक सुप्रिया थुल, नगररचनाकार प्र.प्र. सोनारे आदी उपस्थित होते.
बैठकीत सर्वोच्च न्यायालयात आदेशान्वये हेरिटेज संवर्धन समितीने 204 इमारतीमधून वगळण्यात आलेल्या 49 वास्तुंबाबत नागरिकांकडून आक्षेप मागविले होते. त्यामध्ये मौजा-सिताबर्डी तसेच कस्तुरचंद पार्क या जागेवर प्रदर्शनीकरिता जागा मिळविणे, विजयादशमीला रावण दहन करण्याकरिता परवानगी देणे, कस्तुरचंद पार्कचे पुनरूत्थान अथवा सौंदर्यीकरणाच्या कामांना मान्यता देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
हेरिटेज संवर्धन समितीने 49 वास्तुंबाबत नागरिकांकडून मागविण्यात आलेल्या आक्षेपांवर निर्णय घेण्याकरिता प्राचार्य श्रीमती उज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली. उपसमितीने नागरिकांच्या आक्षेपांवर निर्णय घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
कस्तुरचंद पार्कवर विविध संस्थांनी प्रदर्शनीकरिता जागा उपलब्ध करून देण्याकरिता अर्ज सादर केले होते. तसेच विजयादशमीला कस्तुरचंद पार्कवर रावन दहनासाठी परवानगी मागितली होती. परंतु हेरिटेज संवर्धन समितीने दोन्ही प्रस्ताव बैठकीत नामंजूर केले.
कस्तुरचंद पार्क सौदर्यीकरणाच्या दृष्टीने नागरिकांकरिता करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, फुड पार्क, सार्वजनिक शौचालये, पार्किंग व्यवस्था आणि राष्ट्रध्वज उभारण्याकरिता परिघीय सौंदर्यीकरण प्रकल्प संकल्पनेबाबतचे सादरीकरण स्टाईड शोच्या माध्यमातून करण्यात आले. या संदर्भात विकासात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी उपसमितीकडे सोपविण्यात आली. तसेच कस्तुरचंद पार्कच्या बाहेर असलेला पुतळा आतील भागात स्थानांतरीत न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सिव्हील लाईन्स येथील विधान भवन परिसरात जुन्या हेरिटेज इमारतीला लागून दोन मजली नवीन इमारतीचे बांधकाम करण्याकरिता सविस्तर माहिती व नकाशे सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 च्या कार्यकारी अभियंता यांना यावेळी देण्यात आले.

No comments:
Post a Comment