Monday, 18 September 2017

धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा पिण्याचे पाणी व स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या -चंद्रशेखर बावनकुळे

                               * दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस व्यवस्थेचा आढावा
* भाविकांच्या सुविधेसाठी समन्वयाने काम करा

       नागपूर, दि.18 : दीक्षाभूमी येथे 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशाच्या विविध भागातील येणाऱ्या लाखो भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने विविध विभाग प्रमुखांकडे सोपविलेली जबाबदारी स्मारक समितीच्या  समन्वयाने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, अग्निशमन, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल आदी विभागातर्फे करावयाच्या सुविधेसंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            यावेळी माजी मंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे, नितीन राऊत, स्मारक समितीचे सदानंद फुलझेले, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, विलास गजघाटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र कुंभारे, निवासी उप जिल्हाधिकारी श्री. खजानजी, स्वागत अधिकारी प्रकाश पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
            दीक्षाभूमी येथे  धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनातर्फे करावयाच्या व्यवस्थेचा आढावा घेतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरविण्यासाठी टँकर तसेच नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून 24 तास पाणीपुरवठा करावा तसेच साफसफाई व स्वच्छता ठेवण्यासाठी फिरते शौचालयाची व्यवस्था, स्नानगृहे तयार करुन या परिसरात कायम स्वच्छता राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात सफाई कामगारांची नियुक्ती करावी.
            वाहतूक व्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागातर्फे आवश्यक नियोजन करताना भाविकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. यासाठी दीक्षाभूमी परिसरात नियंत्रण कक्ष तयार करुन या नियंत्रण कक्षात सर्व विभागांचे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नोडल अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार आवश्यक कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत या संदर्भात येत्या 25 सप्टेंबर रोजी आढावा घेण्यात येईल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
         आरोग्य विभागातर्फे औषोधोपचार तात्पुरते दवाखाने सुरु करावे तसेच सुसज्ज रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध राहील याची खबरदारी घ्यावी. वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय यंत्रणा सज्ज राहील याची खबरदारी घ्यावी. दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस येथे जाण्यासाठी शहर बस वाहतूक व एस. टी. महामंडळातर्फे आवश्यकतेनुसार बसेसची व्यवस्था करावी. अशी सूचनाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
            जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जिल्हा प्रशासनातर्फे दीक्षाभूमी तसेच ड्रॅगन पॅलेस येथे दरवर्षीप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील अशी माहिती बैठकीत दिली.

परिसर स्वच्छतेसाठी 500 कर्मचारी

        धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या व्यवस्थेसंदर्भात महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्यासाठी 220 अस्थाई नळ बसविण्यात आले असून  भोजनदान करणाऱ्या संस्थांसाठी टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्यात येणार असून पाच ठिकाणी पीव्हीसी टाकी बसवून पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परिसर स्वच्छतेसाठी 500 कर्मचारी 24 तास सेवा देणार आहे. हा परिसर स्वच्छ रहावा यासाठी विशेष पथक निर्माण करण्यात आले आहे.
            भाविकांसाठी मोबाईल शौचालयासोबत 780 तात्पुरते शौचालय बांधण्यात येत आहेत. या ठिकाणी स्नानगृहसुद्धा उभारण्यात येणार असल्याची माहिती देताना महापालिका आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले की, परिसरात 235 फ्लड लाईट लावण्यात येत असून दहा जनरेटरसुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहे. पोलिस व महानगरपालिकेतर्फे 64 ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज राहणार असून नियंत्रण कक्षामध्ये मुख्य अभियंत्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी 24 तास व्यवस्थेतर निययंत्रण ठेवणार आहे. वाहतूक व आवश्यक सुविधेसंदर्भात मुख्य ठिकाणी माहिती फलकसुद्धा लावणार असल्याचे यावेळी आयुक्त अश्विन मुदगल यांनी सांगितले.
            आरोग्य विभागातर्फे ॲम्बुलन्ससह प्राथमिक उपचाराची तात्काळ सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 18 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमा दरम्यान पाऊस आल्यास परिसरातील शाळा खाजगी इमारतीत अधिग्रहित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
            माजी मंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी दीक्षाभूमीप्रमाणेच ड्रॅगन पॅलेस येथे प्रशासनतर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्यावी. दीक्षाभूमीवर येणारे भाविक हे ड्रॅगन पॅलेसलासुद्धा भेट देणार असल्यामुळे त्यांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यावेळी स्मारक समितीच्या वतीने विलास गजघाटे तसेच संकल्पचे अनिल नगराळे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आयोजित करताना संपूर्ण भारतातून येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी सूचना यावेळी केली.
            स्मारक समितीचे सदानंद फुलझेले यांनी दरवर्षीप्रमाणे दीक्षाभूमी परिसरात आवश्यक सुविधा लवकर पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करताना स्मारक समितीतर्फे करण्यात येत असलेल्या कामाबाबतही यावेळी सांगितले.
****


No comments:

Post a Comment