Monday, 18 September 2017

महापारेषणच्या भौगोलिक माहिती प्रणालीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

          नागपूर दि. 18 :- आज आपला देश आधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन आत्मनिर्भर बनत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन इंडियाच्‍या माध्यमातून देशाच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. याच माध्यमातून महापारेषणने विकसित केलेली  भौगोलिक माहिती प्रणाली हा मैलाचा दगड आहे. सन 2030 पर्यंत 25 हजार मेगावॅट वीज महापारेषणच्या वतीने निर्मित करण्याचा मानस असल्याचे मत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
            अमरावती रोडवरील रिजनल रिमोट सेंसींग सेंटर- सेंट्रल सेथे आज महापारेषणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महापारेषण भौगोलीक माहिती प्रणालीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
            महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या विशेष उपस्थितीत या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे, श्रीमती परिणिता फुके, श्रीमती रुतिका मसराम, नगरसेवक अमर बागडे, तसेच इस्रोचे महाप्रबंधक डॉ. एस. व्ही. सी. कामेश्वर राव, महापारेषणचे प्रकल्प संचालक रविंद्र चव्हाण, संचालक (संचलन) गणपत मुंडे, मुख्य अभियंता संजय शिंदे अधिक्षक, अभियंता महेश भागवत तसेच रिजनल रिमोट सेंसींग सेंटर- सेंट्रल आणि इस्रोचे पदाधिकारी उपस्थित होते.
            महापारेषण भौगोलिक माहिती प्रणालीचे उद्घाटन करतांना पालकमंत्री म्हणाले की, ही माहिती प्रणाली विकसित करण्यासाठी महापारेषण आणि इस्रोचे अभियंते यांनी अथक परिश्रम घेतले. याचीच फलश्रूती आज आपल्याला पहायला मिळत आहे. यासाठी महापारेषण आणि इस्रोच्या दरम्यान सामंजस्य करार जानेवारी 2017 मध्ये   करण्यात आला होता. यासाठी इस्रोच्या वतीने संपूर्ण सहकार्य महापारेषणला मिळाले. हा प्रकल्प महापारेषण कर्मचाऱ्यांसाठी आणि उच्चस्तरीय व्यवस्थापन, त्यांचे नियमित कामकाजात निर्णय घेण्याच्या प्रक्रीयेत महत्वाची भूमिका बजावणार आहे. अशा उपयुक्त माहिती प्रणालीचे संपूर्ण देशभर जाळे विणण्यात यावे. आज महापारेषण कंपनीचे नाव देशात अग्रगण्य कंपन्यांमध्ये घेतले जाते. महापारेषण मध्ये वीजेचे नियोजन हा महत्वपूर्ण घटक आहे. येत्या सन 2030 पर्यंत या कंपनीला 25 हजार मेगावॅटची वीजेची निर्मिती करावयाचे उद्दीष्ट आहे. महापारेषणचे टिमवर्क असेच कायम राहिल्यास वीज निर्मितीचा टप्पा ते सहज गाठू शकतील, असा  विश्वास आहे. महापारेषण कंपनीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने चोख सुरक्षा व्यवस्थेची गरज आहे. यासाठी येथील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापारेषणच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात यावी. याबाबत राज्य शासनाच्या वतीने महापारेषण कंपनीला योग्य ती मदत शासनाच्या वतीने करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

            मुख्य अभियंता संजय शिंदे यांनी यावेळी महापारेषण भौगोलिक माहिती प्रणालीची रितसर माहिती दिली. ते म्हणाले की, महापारेषण ही भारतातील सर्वात मोठी पारेषण कंपनी आहे. यामध्ये 44 हजार पेक्षा जास्त सर्किट कि.मी. ट्रान्समिशन वाहिनी आहे. महापारेषणचे विद्युत जाळे संपूर्ण देशभर पसरलेले असून वैयक्तिक कार्याशिवाय तत्पर संवाद आणि हाताशी असलेली माहिती हाच महापारेषणच्या यशाचे मूळ आहे.भौगोलिक माहिती प्रणाली विकसित करण्याचे काम सुरु असतांना असे लक्षात आले की,  इस्रोने भुवन- प्लॅटफॉर्म नावाचा स्वत:चा भौगोलिक प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. यावेळी महापारेषणने इस्रोशी चर्चा करुन त्यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आणि या प्रकल्पाची अंलबजावणी सुरु झाली. यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले. या प्रकल्पामध्ये उपकेंद्र व वाहिन्यांची माहिती आणि त्यांचे मॅपींग महापारेषणच्या अभियंत्यांनी अल्पावधीत प्रत्येक कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष जावून गोळा केली. या माहितीचे मॅपींग सुध्दा करण्यात आले आहे. ही प्रणाली सर्व महापारेषण उपकेंद्रे आणि 500 केव्ही आणि एचव्हीडीसी, 400 केव्ही आणि 220 केव्ही वाहिन्यांचे  (मनोऱ्यांसह)  मॅपिंग पूर्ण करुन कर्मचारी व व्यवस्थापनाच्या वापरण्यासाठी तयार झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
            यावेळी महापारेषण आणि इस्रोच्या पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीमती विभावरी बाविसकर यांनी तर आभार अधीक्षक अभियंता महेश भागवत यांनी मानले.

                                                                        *****

No comments:

Post a Comment