Monday, 18 September 2017

उद्योग सुरू करण्यासाठी शासनाचे संपूर्ण सहकार्य - मुख्यमंत्री

मुंबई दि. 18 : देशातील आणि जगातील उद्योगपतींनी महाराष्ट्रात उद्योग सुरु करावेत, त्यांना शासनाचे संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी केले .
            हॉटेल ताज येथे फिक्कीतर्फे आयोजीत पाचव्या प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र२०१७ परिषदेत उद्योगपतींना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल उपस्थित होते.                
            श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात उद्योग वाढीसाठी चांगल्या सोयीसुविधा आहेत. कुशल मनुष्यबळ आहे. दळणवळणाच्या चांगल्या सोयी आहेत. गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण देशामध्ये उद्योग क्षेत्रात आपण नंबर एक आहोत. दिल्ली, कर्नाटक या राज्यांना आपण मागे टाकले आहे. जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात आहे. या कुशल तरुणांचा उपयोग उद्योग वाढीसाठी होत आहे. तीन वर्षापासून इज ऑफ डुइंग बिझनेसराबवीत आहोत. महाराष्ट्राच्या उद्योग भरारीची  आणि उंचावत चाललेल्या आर्थिक वाढीची दखल जागतिक बँक आणि नीती आयोगाने घेवून राज्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
               विविध विकासकामांची माहिती देताना मुख्यमंत्री यांनी सांगितले, मुंबईत मेट्रो रेल्वेचे काम चार वर्षात पूर्ण केले. आणखी २०० कि.मी. लांबीचे मेट्रोचे जाळे पुढच्या चार वर्षात पूर्ण होईल. एलिव्हेटेड कॉरीडोर, ट्रान्स हार्बर लिंकचे काम लवकरच सुरु होईल. सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने सुरु होत आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत ते पूर्ण होऊन पहिले विमान आकाशात झेपावेल. नागपूर मुंबई हा समृद्धी महामार्ग भारतातील सर्वात मोठा, आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात येणारा महामार्ग आहे. या महामार्गावर उद्योग उभारण्यासाठी जगातील अनेक देश उत्सुक आहेत. राज्यातील २४ जिल्हे या महामार्गाने जोडले जाणार असून उद्योगासाठी लागणारा कच्चामाल, आणि तयार माल परदेशात पाठविण्यासाठी जलद वाहतुकीच्या दृष्टीने जेएनपीटीपर्यंत हा महामार्ग जोडला जाणार आहे. या महामार्गावर २२ नोड्स असणार असून कृषिपूरक उद्योग उभारले जाणार आहेत. राज्याचे औद्योगिक धोरण उद्योग उभारणीसाठी पूरक असून अनेक संधी उपलब्ध आहेत, असे सांगून मुख्यमंत्री शेवटी म्हणाले, मेकिंग महाराष्ट्रासाठी उद्योगपतींनी उद्योग सुरु करावेत. फिक्की आणि राज्यसरकार एकत्रपणे मिळून उत्तम काम करू.
              प्रारंभी सकाळच्या सत्रात उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी पाचव्या प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र२०१७ या परिषेदेचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले, उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्याला जगाशी मैत्री करायची आहे. येथे उत्तम पायाभूत सुविधा आहेत. उद्योग उभारणीसाठी नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे चांगली जागा आहे. एकाच छताखाली उद्योगांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या मिळतात. राज्यात टेक्सटाइल प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. सेन्द्रा हे ठिकाण उद्योगासाठी रोल मॉडेल आहे. कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी उद्योगांनी सहकार्य केले पाहिजे, असेही ते शेवटी म्हणाले.

          प्रारंभी फिक्कीचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी प्रास्ताविकात या परिषदेची भूमिका मांडली. याचवेळी फिक्कीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. शेवटी फिक्कीचे मुंबई येथील अध्यक्ष जसपाल बिंद्रा यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment