Tuesday, 5 September 2017

कुष्ठरोग निर्मूलनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे - महापौर

 कुष्ठरोग शोध मोहिमेस आजपासून सुरुवात

          नागपूर दि. 5 :- कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम  2017-18 ला आजपासून सुरुवात झाली आहे. आज कुष्ठरोग शोध मोहिमेच्या रथाला  हिरवी झेंडी दाखवून महापौर नंदा जिचकार यांनी उपसंचालक कार्यालय, येथे उद्घाटन केले.
            कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरोग दूरीकरणाचे ध्येय साध्य करायचे आहे. याकरीता समाजातील कुष्ठरुग्णांना शोधून त्यांना बहूविध औषधोपचाराने बरे करायचे आहे. याकरीता आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबविण्यात येत आहे. कुष्ठरोग शोध मोहिमेअंतर्गत तपासणी करीता येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी स्वत:मध्ये कुष्ठरोग आजाराविषयी लक्षणे वाटल्यास रुग्णालयामध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले.
            यावेळी महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त रविंद्र कुंभारे, उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिवाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हेमंत निंबाळकर, महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी  डॉ. विजय जोशी,  वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मानेकर, डॉ. अनंत हजारे, डॉ. हेमलता वर्मा, उपस्थित होते.
            प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत दिनांक 5 ते 20 सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. यादरम्यान नागपूर शहरातील दीड लाख घरातील 7 लाख 58 हजार व्यक्तींचा 424 चमूंच्या साहाय्याने सर्व्हे करण्यात येणार आहे. या शोध मोहिमेदरम्यान संशयित कुष्ठरुग्णांच्या शरीराच्या  60भागाची तपासणी करण्यात येणार आहे. कुष्ठरोग रुग्ण आढळल्यास त्यावर मोफत औषधोपचार करण्यात येणार असून कुष्ठरोग निर्मूलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्यात येतील.
            या सर्व्हेसाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी यासारख्या 848 जणांना तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार असून कुष्ठरोग शोध मोहीम यशस्वी करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment