मुंबई, दि. 21 : मुरबाड तालुक्यात सह्याद्रीच्या पायथ्यालगत आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहातो. हा समाज आपल्या उदरनिर्वाहासाठी बहुतांशी निसर्गावर अवलंबून असून तो बांबूच्या टोपल्या आणि इतर वस्तू तयार करून विकण्याचे काम करतो. या वस्तू विकण्यासाठी त्यांना नेहमीच जागेची अडचण येत असे. यावर तोडगा म्हणून मुरबाड तालुक्यातील नाणेघाट प्रवेशद्वाराजवळ वन विभागाकडून आदिवासी बांधवांना त्यांनी जंगलातून जमा केलेला रानमेवा, वनौषधी आणि बांबूंच्या टोपल्या विकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. भूमाता वनधन विक्री केंद्र या नावाने एका छताखाली हा बाजार भरत असल्याने वन विभागाने आदिवासींच्या रोजगाराची बिकट वाट सोपी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
नाणेघाटाच्या प्रवेशद्वारावर वैशाखरे येथे दर शुक्रवारी भरणाऱ्या या बाजारात परिसरातील केव्हारवाडी, बनाचीवाडी, भांगवाडी, वाडाचीवाडी अशा अनेक आदिवासी पाड्यांमधील आदिवासी समाज बांबूपासून टोपल्या बनवून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणत आहेत. घोटी, इगतपुरी, वेल्हे, जुन्नर, ओतूर, आळेफाटा अशा विविध ठिकाणाहून व्यापारी आणि लोक येऊन या टोपल्या किंवा इतर सामान घेऊन जात आहेत. टोकावडे बाजारपेठेत आदिवासींना त्यांच्या वस्तू विकण्यासाठी आतापर्यंत हक्काची जागा नव्हती त्यामुळे रस्त्याच्या कडेला बसून ते आपले सामान विकत असत. आता टोकावडेपासून काही अंतरावर नाणेघाट प्रवेशद्वारासमोर वैशाखरे येथे भूमाता वनधन विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. सामुहिक वनहक्क प्राप्त गावांमधील पारंपरिक वननिवासींनी वनोपजावर आधारित तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी वन विभागाने वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक सुंदर पाऊल टाकले आहे. खास आदिवासींनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी येथे हक्काची जागा तसेच गाळे उपलब्ध करून दिले आहेत.
००००

No comments:
Post a Comment