नागपूर,दि.18:-
पक्षकांरांमधील विसंवादाचे रुपांतर सुसंवादामध्ये घडवून आणण्यासाठी मध्यस्थी
जनजागृती कार्यक्रमाव्दारे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळेच मध्यस्थीच्या
माध्यमातून प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा होत आहे. प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा
मध्यस्थी केंद्र, विधीज्ञ व न्यायाधीश सुसंवादकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडत
असल्याचे प्रतिपादन प्रधान व जिल्हा मुख्य न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे यांनी केले.
जिल्हा मध्यस्थी केंद्र व जिल्हा बार असोसिएशन यांच्या
समन्वयाने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे जिल्हा न्यायालयामध्ये आयोजन करण्यात
आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव
न्या. कुणाल जाधव, ॲङ श्रीमती शर्मिला चरलवार, अॅङ डब्ल्यू. व्ही. गुघाने उपस्थित
होते.
मध्यस्थी केंद्राच्या माध्यमातून अलीकडच्या काळात 550
ते 600 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. मिटविण्याजोगी आणखी बरीच प्रकरणे असून
त्यांचा निपटारा करण्यासाठी ट्रेण्ड मिडीएटर विधीज्ञामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे.
मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाची माहिती ग्रामीण
भागापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. जनतेनी आपल्या
समस्या मध्यस्थी केंद्रामार्फत सोडवून घ्याव्यात. तसेच नागरिकांनी आपल्या
प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मध्यस्थी केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या विधीज्ञांची मदत घेण्याचे आवाहन न्या. व्ही. डी.
डोंगरे यांनी यावेळी केले. तसेच मध्यस्थी शब्दाऐवजी सुसंवादक शब्द उपयोगात आणण्याचेही
त्यांनी यावेळी सुचविले.
यावेळी कॅटेगिरी ऑफ केसेस व्हेअर मेडीएशन इज ॲपॉप्रिएट
ॲन्ड इट्स प्रोसेस या विषयावर न्या. कुणाल जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच बेसिक
ऑफ मेडिएशन, इट्स नेसेसिटी ॲण्ड बेनेफिट्स या विषयावर अॅङ शर्मिला चरलवार यांनी तर
रोल ऑफ जज, लॉयर्स, मेडिएटर्स ॲण्ड लिटीगंट्स या विषयावर ॲङ डब्ल्यु. व्ही. गुघाने
यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच पक्षकार मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
***
No comments:
Post a Comment