औरंगाबाद, दि.17महाराष्ट्र पोलीस हे कायदा सुव्यवस्थेच्या नियंत्रणासह आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करण्यात देशात अव्वलस्थानी असून मुंबई, पुण्याप्रमाणे लवकरच औरंगाबाद शहरातही सीसीटीव्ही नेटवर्कींग
करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
औरंगाबाद शहरातील वेदांतनगर व पुंडलिकनगर पोलीस ठाण्यांचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,
खासदार चंद्रकांत खैरे, आ. सर्वश्री संजय शिरसाठ, प्रशांत बंब, सुभाष झांबड,
अतुल सावे, नारायण कुचे, महापौर भगवान घडामोडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर,
विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महानगरपालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, विशेष पोलीस महानिरीक्षक
मिलींद भारंबे यांच्यासह संबंधित अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
शासनाने गुणात्मक पोलीसींगच्या दृष्टिने तंत्रज्ञान वापराला
प्रथम प्राधान्य दिलेले असून अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना पोलीस विभागात राबवल्या जात
आहेत. पोलीस तपास यंत्रणेत
महत्वपूर्ण असलेल्या सीसीटिव्ही नेटवर्कींगचा उपयोग हा कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच
आपत्कालीन परिस्थितीतही मोठ्या प्रमाणात सहाय्यक ठरणारा आहे,
हे मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसात वाहतूक
व्यवस्था नियंत्रण, आवश्यक ठिकाणी तत्काळ
मदत कार्य पोहचविण्यासाठी संबंधितांना कंट्रोलरुमद्वारे सूचना देणे,
समन्वय ठेवण्याच्या कामात ठळकपणे दिसून आले आहे.
पुण्यामध्ये सीसीटिव्ही नेटवर्कींगमुळे
70 मोठ्या विशेष गुन्ह्यांच्या तपासामध्ये मोठा फायदा
झाला आहे. हे लक्षात घेऊन
औरंगाबाद शहरातही सीसीटिव्ही नेटवर्कींग करण्यात येणार आहे.
माहिती तंत्रज्ञान
विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून लवकरच त्या कामाला सुरुवात करण्यात येईल,
असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्याच्या गृहविभागाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिने भरीव प्रयत्न
गेल्या तीन वर्षात करण्यात आले आहेत. देशात सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीसांनी क्राईम अँड क्रिमिनल नेटवर्क ड्रॅपिंग सिस्टीम
(सीसीएनडीएस) व्यवस्थेचे काम पूर्ण केले आहे. ज्याद्वारे सर्व पोलीस स्टेशन डिजीटल करुन सेंट्रल सर्व्हरशी
जोडून त्याठिकाणचे सर्व रेकॉर्ड्स किपींग, एफआयआर हे ऑनलाईन करण्यात आले आहेत. जुन्या सगळ्या दस्ताऐवजांचे डिजीटलायजेशन केले असून या सीसीएनडीएस
व्यवस्थेद्वारा गुन्ह्याचा शोध घेणे, गुन्हेगाराची मानसिकता, गुन्ह्याचे स्वरुप, भौगोलिक पार्श्वभूमी या बाबींची माहिती प्राप्त होते. ज्याद्वारे स्ट्रॅटेजीकल प्लॅनींग करणे शक्य होत आहे.
देशामध्ये महाराष्ट्र
हे सायबरलॅब असलेले एकमेव राज्य असून राज्यात वेगवेगळ्या 45 फॉरेंसिक लॅब सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात मोबाईल फॉरेंसिक
लॅबचाही समावेश असून घडलेल्या गुन्ह्यात तपास करुन या लॅबमुळे अपराध,
दोषसिद्धीचा दर 9 टक्क्यावरुन गेल्या दीड दोन वर्षात 52 टक्क्यांपर्यंत नेऊ शकलो आहे. गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा होण्यासाठी पुराव्यांचे विशेष महत्व असून तांत्रिक
पुरावा हा अधिकृत, विश्वसनीय ठरतो.
त्याचा वापर करुन विशेष गुन्ह्यात हे प्रमाण
38 टक्क्यांपर्यंत आणले आहे.
लवकरच सोशल मिडीयाचा गैरवापर करुन अनेकदा समाजकंटकाद्वारे सामाजिक
तणाव निर्माण करणाऱ्या चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात.
त्या तत्काळ डिलीट करणे गरजेचे असून त्यासाठी आवश्यक असलेली
यंत्रणा लवकरच महाराष्ट्रात सुरु करण्यात येणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
समाजामध्ये सौहार्दपूर्ण
वातावरण अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला जनेतेची साथ मिळणे गरजेचे असून जनसहभागातून
कायदा, सुव्यवस्थेचे काम
अधिक प्रभावीरित्या होऊ शकते. हे लक्षात घेऊन विशेष पोलीस अधिकारीही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
सुरक्षित समाजाच्या या शाश्वत मॉडेलचा शुभारंभ औरंगाबादमधून
होत आहे. या विशेष पोलीस
अधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन देशासाठी, समाजासाठी योगदान देण्याची संधी या माध्यमातून आपणा सर्वांना उपलब्ध झाली आहे.
पोलीस प्रशासनासह सहकार्य करत विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तम
काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री
श्री. फडणवीस यांनी केले.
प्रास्ताविकात पोलीस
आयुक्त यशस्वी यादव यांनी ड्रोन पोलीस युनीटसह आयुक्तालयाच्या अद्यावत तंत्रज्ञानात्मक
कार्यशैलीबाबतची माहिती देऊन गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था पूर्ण वातावरणात संपन्न
होण्यात या विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे उल्लेखनीय सहकार्य मिळाले असल्याचे सांगितले.
यावेळी औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या ड्रोन कॅमेऱ्यांचे लोकार्पण
तसेच जीपीएस सिस्टमचे उद्घाटन तसेच विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते करण्यात आला.
0000
No comments:
Post a Comment