राष्ट्रीय कारागीर
पंचायतचे उद्घाटन
नागपूर, दि. 6 : भारताची ओळख संस्कृती, कला आणि परंपरेने नटलेला
देश म्हणून आहे. जुन्या काळी येथे बारा बलुतेदारी पद्धत अस्तित्वात होती. ज्यामध्ये
वडीलोपार्जित कला, व्यवसायाचे ज्ञान, कसब, जुन्या पिढीकडून नवीन पिढीकडे
हस्तांतरित व्हायचे परंतु खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये
परंपरागत व्यवसाय संकटात सापडले आहेत. यासाठी आता भारतीय संस्कृती आणि यांचा वारसा
टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रीय कारागीर पंचायतच्या माध्यमातून करण्यात येणारे
प्रयत्न प्रशंसनीय आहे. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी कारागीरांनी तयार
केलेल्या वस्तू प्राधान्याने खरेदी कराव्यात जेणेकरून त्यांचा आर्थिक स्तर
उंचवायला मदत होईल आणि देशातील चलनाचा देशातच विनियोग होईल. कारागीरांच्या हाताला
काम मिळेल. या योगे कारागीरांच्या कलागुणांना सन्मान प्राप्त होईल. कारागीर आणि
शेतकरी यांचा विकास हाच खऱ्या अर्थाने आपल्या देशाची आर्थिक उन्नती साधू शकतो. असे
प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले.
दीनदयाल शोध संस्थान, नवी दिल्लीचे इंदिरा गांधी कला
केंद्र, मेळघाटचे संपूर्ण बांबू केंद्र, ग्राम ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
राष्ट्रीय कारागीर पंचायतचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंतकुमार हेगडे बोलत
होते.
यावेळी खा.डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री श्रीमती शोभा
फडणवीस, इंदिरा गांधी कला केंद्राच्या सचिव श्रीमती डॉ. मौली कौशल, राष्ट्रीय
कारागीर पंचायतचे अध्यक्ष डॉ. महेश शर्मा, प्रमुख सुनील देशपांडे, पंच आनंद वल्लभ
जोशी, किसनभाई गामीत उपस्थित होते.
प्राचीन काळापासून देशामध्ये अनेक शोध लावून कृषीपासून ते
अंतरिक्षातील ज्ञानाचा शोध येथील तत्वज्ञानांनी लावला. भारतीयांच्या शोधामुळे
प्राचीन काळी माणसांचे जीवन सुकर व्हायला मदत झाली. परंतु जग दुसऱ्या
महायुद्धानंतर जागतिकीकरणाकडे वळले. परंपरागत व्यवसाय तुलनेत मागे पडू लागले.
यासाठी कारागीरांच्या हस्तव्यवसायाला पुनर्जीवित करण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. कारागीरांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्य
विकास विभाग सकारात्मक असल्याचे अनंतकुमार
हेगडे यांनी यावेळी सांगितले.
खा. डॉ. विकास महात्मे म्हणाले की, कारागीरातील कलागुणांना राष्ट्रीय कारागीर
परिषदेच्या माध्यमातून वाव मिळतो. कारागीरांनी तयार केलेली वस्तू खरेदी करुन
नागरिकांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच कारागीरांनी परंपरागत पद्धतीने
वस्तू तयार न करता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपली कला प्रदर्शित करावी. कला
म्हणजे ज्ञान आणि कौशल्यासोबतच निसर्ग आणि सौंदर्याचा सुंदर संगम होय. ही कला
पुढील पिढीकडे हस्तांतरित झाल्यास त्यात नाविण्य प्राप्त होऊ शकते. ज्ञान आणि कौशल्याला ‘हुनर खोज
यात्रा संवादा’ च्या माध्यमातून ग्राम ज्ञानपीठ उपलब्ध करून
देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देशाला नवी चालना कारागीरांची कलाच देऊ शकते. त्यामुळे कारागीरांच्या
कलेला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करुन देणे,
प्रशिक्षण देणे तसेच आधुनिक शहर आणि कारागीर या विषयावर ‘हुनर खोज
यात्रे’ च्या माध्यमातून संवाद साधतो आहे. कारागीरांना त्यांच्या
व्यवसायासाठी कच्ची साधन सामुग्री अल्प दरात उपलब्ध करून देण्यात यावी तसेच बांबू
कारागीरांना बांबू अल्प दारात उपलब्ध करून देण्यात यावे, नवीन आर्थिक
व्यवस्थेनुसार, कारागीरांना मालाचा मागणीनुसार पुरवठा करता यावा यासाठी त्यांच्या
व्यवसायाशी निगडीत नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. कौशल्य विकास कार्यक्रम व
मुद्रा लोनच्या माध्यमातून कारागीरांना सक्षम बनवावे, अशी मागणी देखील श्रीमती
शोभा फडणवीस यांनी यावेळी केली.
हस्तकलेतून वस्तू साकारणाऱ्या प्रत्येक कारागीरांच्या कलेचा
सन्मान व्हायला हवा. ‘हुनर खोज यात्रा संवाद’ म्हणजे सामाजिक क्रांती होय.
परंतु कारागीरांच्या समस्येविषयी केवळ मंथन न करता कारागीरांचे नोंदणीकरण करावे.
तसेच सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे इंदिरा गांधी कला
केंद्राच्या सचिव श्रीमती डॉ. मौली कौशल यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय कारागीर पंचायतचे अध्यक्ष डॉ. महेश शर्मा म्हणाले
की, तळागळातील कारागीरांसोबत संवाद साधण्यात राष्ट्रीय कारागीर पंचायत अग्रेसर
आहे. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे अंत्योदय विचार
कारागीरांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे. आधुनिकीकरणामुळे कारागीरांची अवस्था
अत्यंत बिकट झाली असली तरी, त्यांच्यातील कलाच त्यांना जीवन जगायला शिकवते. कौशल्य
विकासाच्या माध्यमातून कारागीरांचा विकास साध्य करणे हाच राष्ट्रीय कारागीर
पंचायतचा हेतू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक राष्ट्रीय कारागीर पंचायतचे प्रमुख सुनील
देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन इंद्रायणी शेंबेकर यांनी तर, आभार
प्रदर्शन आशिष गुप्ता यांनी केले.
******



No comments:
Post a Comment