Friday, 6 October 2017

राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील गावांमध्ये शंभर तलावाचे बांधकाम करणार- चंद्रशेखर बावनकुळे

Ø  रस्ते बांधकामाच्या सीएसआर निधीमधून जलसंधारणाची कामे
Ø  जिल्हयातील रस्ते बांधकामाची तात्काळ माहिती सादर करा
Ø  नाला खोलीकरणासह बंधाऱ्याची निर्मिती

नागपूर, दि. 6 : राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करताना महामार्गावर येणाऱ्या गावांमध्ये जलसंधारणाच्या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रत्येक गावात पाणी साठविण्यासाठी तलावाची निर्मिती तसेच पाचशे मिटरपर्यंत नाला खोलीकरण तसेच पाणी अडविण्याची सुविधा निर्माण करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात.
रविभवन येथे सभागृहात जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत रस्ता बांधकामाचा आढावा पालकमंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे बांधकाम करताना मंजूर असलेल्या निधीमधून अथवा सीएसआर निधीमधून  पाचशे मिटरपर्यंत नाला खोलीकरण तसेच बंधाऱ्याची निर्मिती करुन किमान  एक मिटरपर्यंत पाणी अडविण्याची सुविधा निर्माण करण्याच्या सूचना करतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे रिंग रोडसह चौपदरीकरणाचे काम मोठया प्रमाणात सुरु आहे. याच कामाअंतर्गत गावांमध्ये तलावाच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव मंजूर करुन नवीन तलावाची निर्मिती तसेच खोलिकरणाची कामे घ्यावीत, त्यासोबत येथील माती  रस्त्याच्या बांधकामालाही वापरता येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
जलसंधारणाअंतर्गत महामार्गावरील गावामध्ये घेण्यात येणाऱ्या कामासंदर्भात उपविभागीय महसूल अधिकारी यांनी तालुका व गावनिहाय माहिती संकलीत करावी. व त्यानुसार कामांना प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना करतांना रस्त्याच्या कामावरील साहित्य पांदण रस्त्याच्या बांधकामासाठी वापरता येईल का, या संदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला.
सिंचन प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करा
जिल्हयातील सिंचन प्रक्रल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने आरक्षण करुन उर्वरित पाणी सिंचनासाठी उपलब्ध करुन देताना शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी रोटेशन ठरवून देण्यात यावे. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाणी वाटपासंदर्भात नियंत्रण करावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
पेंच प्रकल्पासह इतर प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा आढावा घेतांना पालकमंत्री म्हणाले की, पाण्याचा काटकसरीने वापर करुन अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.
मध्यप्रदेश शासनाकडून पाणी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल. पेंच प्रकल्पाच्या दुरुस्तीसह इतर माध्यमाने पाणी अडवून साठवणूक करणे तसेच शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी उपलब्ध करुन देणे. या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


कृषिसाठी आठ स्वतंत्र सोलर ॲग्रो फिडर
        सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन  देण्यासाठी जिल्हयात आठ कृषी फिडर हे सौर ऊर्जेवर एक महिन्यात सुरु करण्याच्या दृष्टीने महाऊर्जा विभागाने नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.
            जिल्हयातील नवेगाव खैरी, कुही, भिवापूर येथे जागा उपलब्ध असून कळमेश्वर, गोंड खैरी, पारशिवनी आदी ठिकाणी सौर ॲग्रेा फिडरसाठी जागा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना महसूल अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. जिल्हयातील नळ पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणून वीज बिलाअभावी कोणतीही पाणीपुरवठा योजना बंद होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हयात 108 पाणी पुरवठा योजना सोलर पंपवर प्राधान्याने आणण्याचे नियोजन असून शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी सोलरपंप उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.

******

No comments:

Post a Comment